पल्लवी खरोसे आंबेकर
भाग – 8
शार्वी घरी येऊन उद्याची तयारी करत होती… त्याला काय बोलायचं आणि कसं बोलायचं. ती मनोमन त्याची उजळणी करत होती. तिला त्याला उद्या सरप्राइज द्यायचं होतं… त्याला आवडेल का सरप्राइज?
ती तिच्याच विचारात होती की तिची मॉम तिला जेवणासाठी बोलवायला आली. शर्वरी आली तेव्हा ती मधेच हसत होती, मधेच लाजत होती. शर्वरीला मागच्या काही दिवसांपासून तिच्याबाबत शंका यायला लागली होती. कारण छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडणारी ती आता शांत झाली होती. बघावं तेव्हा ती वेगळ्याच विचारात असायची… नक्की काय चाललंय हे समजायला मार्ग नव्हता; पण नक्कीच काहीतरी आहे, हे मात्र तिला कळायला लागलं होतं आणि ते नक्कीच प्रेम असू शकतं, असं तिला वाटत होतं. पण तिने तिला काही विचारलं नाही.
ती कोणतीही गोष्ट अगोदर तिच्या डॅडशी शेअर करायची… पण ही केली असेल का? बहुतेक नाही… कारण तसं असतं तर मला एव्हाना समजलं असतं. पण लवकरच कळेल, असं वाटते आहे. तिच्या स्वतःहून सांगण्याची वाट बघावी लागेल… शर्वरीने एक उसासा सोडला आणि शार्वीला आवाज दिला.
“शार्वीsss डिनर लावला आहे. चल बेटा येतेय ना?” शर्वरी तिच्याकडे बघत म्हणाली..
मॉमचा आवाज ऐकून भानावर येत शार्वीने विचारलं, “डॅड आले आहेत का?”
“हं… नाही त्यांची आज आऊटडोर मीटिंग आहे, सो ते बाहेरच डिनर करणार आहेत,” शर्वरीने स्पष्ट केले. कारण तिला माहिती होतं की, डिनरला तिला डॅड सोबत लागतो.
“ठीक आहे… येतेय मी…” शार्वी बारीक चेहरा करत म्हणाली.
‘ओह गॉड, आज डॅड नाहीत… त्यांच्याशी मला पार्थबद्दल बोलायचं होत. त्यांना सांगूनच प्रपोज केल असतं… जाऊदे आधी त्याला विचारते, त्याने होकार दिला तर डॅडना सांगते…’ ती विचार करत उठली आणि खाली जेवायला निघून गेली.
हेही वाचा – अग्रवाल इंडस्ट्रीमध्ये प्रेमाचा त्रिकोण!
जेवून आली तसं तिने स्वतःला बेडवर झोकून दिलं. ती झोपण्याचा प्रयत्न करत होती पण तिला झोप येत नव्हती… ती त्याचाच विचार करत होती. त्याच्याच विचारत ती कधीतरी झोपून गेली…
0000
“हं… आता तरी काही बोलणार आहेस की, अशीच शांत राहणार आहेस?” पार्थ गरिमाला शांत बसलेलं बघून म्हणाला.
“का मी बोलायची काय गरज आहे? तुला दिसलं नाही का की, शार्वी मॅमचं काय चालू आहे? की तू जाणूनबुजून हे सगळं इग्नोर करत आहेस…?” ती रागाने त्याच्याकडे बघत म्हणाली.
“म्हणजे, तुला काय म्हणायचं आहे… जे आहे ते स्पष्ट बोल,” तो गरिमाकडे बघत म्हणाला..
“हेच की, मला असं वाटत शार्वी मॅमना तुला आवडायला लागला आहेस…” तीही त्याच्याकडे बघत म्हणाली.
“हे तू कशावरून म्हणत आहेस..?” त्याने विचारलं.
“तुला समजत नसलं तरी मला समजतं. त्यांच तुझ्यापरी वागणं… तुझ्याकडे बघणं, हसून आणि लाजून, सतत तू सोबत हवा आहेस त्यांना… कदाचित त्या तुझ्यावर प्रेम करायला लागल्या आहेत आणि मला वाटतं की, त्यांचा काही गैरसमज होण्याअगोदर तुला त्यांच्याशी बोलायला हवं. उगीचच विषय वाढला तर, आपल्यालाच त्रास होईल! कारण त्यांचा स्वभाव किती हट्टी आहे, हे तर सगळ्यांना माहीत आहे… सो बेटर हेच आहे की, त्यांनी काही बोलण्याअगोदर तूच त्यांच्याशी बोल,” ती त्याला नीट समजावून सांगत म्हणाली.
“हं… येतंय त्यांचं वागणं माझ्या लक्षात. तू बरोबर बोलते आहेस…” तो काहीतरी विचार करत म्हणाला.
“बरं मग कधी बोलशील?” तिने अधीरतेने विचारलं.
“गरिमा त्यांना काही बोलण्यापेक्षा आपण एक काम करू…” तो तिच्याकडे बघत म्हणाला.
“कोणतं?” तिने विचारलं.
“हेच की, आपण आपल नातं ऑफिशियल करू! म्हणजे आपण आईशी बोलून घेऊ लग्नाबद्दल… काय म्हणतेस..?” त्याने तिचा हात हातात घेत विचारलं.
हेही वाचा – कन्स्ट्रक्शन साइटवर जे काही घडलं, त्याने गरिमा नाराज…
यावर ती लाजली…
“ओह… लाजता पण येत का मॅडमना! म्हणजे तुझा होकार आहे तर… मग मी आजच आईशी बोलून घेतो या विषयावर…” तो तिच्याकडे प्रेमाने बघत म्हणाला.
त्यांनी थोडा वेळ सोबत घालवला… मग त्याने तिला हॉस्टेलवर सोडलं आणि तो घरी निघून गेला.
0000
शेवटी खूप शोधाशोध करून तिला तो फोटो सापडला.
‘बरं झाल देवा सापडला… जर हाच फोटो पार्थला सापडला असता तर, त्याने हजार प्रश्न विचारले असते आणि त्याचे उत्तर त्याला मिळाल्याशिवाय तो शांत बसला नसता… आणि शेवटी त्याला ते सत्य कळलं असतं, ज्याने आमचं जीवन पूर्ण बदलवून टाकलं! पण ठीक आहे… आता त्याला काही नाही कळणार आणि मी कळूही देणार नाही. त्या वाईट भूतकाळाची छायाही नको आहे, माझ्या पार्थवर! या फोटोची विल्हेवाट लावते आधी…’ त्या मनातच विचार करत होत्या. त्यांनी तो फोटो घेतला आणि जाळून टाकला… तेव्हा कुठे त्यांना शांती मिळाली.
पण फक्त फोटो जाळून हे सत्य लपून राहणार होतं का? त्या जेवढं लपवायचा प्रयत्न करत होत्या, तेवढ्याच लवकर ते सत्य पार्थ समोर येणार होतं…
क्रमश:
काय आहे हे सत्य जाणून घेण्यासाठी वाचा पुढचा भाग…


