सतीश बर्वे
एका प्रसिद्ध कबड्डी सामान्यांच्या स्पर्धेला मी उपस्थित होतो. मैदान खचाखच भरलेले होते. मला जेमतेम मुख्य दरवाज्याजवळ उभे राहण्यापुरती जागा मिळाली होती. आयोजक प्रमुख पाहुण्यांची वाट बघत होते. इतक्यात गलका झाला… “आले रे पाहुणे.” इतरांप्रमाणेच मी देखील पाय उंचावून पाहुणे कोण आहेत, ते बघत होतो. पाहुणे आत शिरता शिरता त्यांची आणि माझी नजरानजर झाली आणि मी चपापलो. कारण प्रमुख पाहुणे म्हणजे माझा नाईट कॉलेजचा विद्यार्थी होता प्रसाद राणे. त्याला काहीतरी बोलायचे होते, असे वाटले मला क्षणभर… पण आयोजकाच्या गराड्यात ते जमले नसावे त्याला! तो सगळा लवाजमा स्टेजच्या दिशेने जायला लागला आणि माझ्या नजरेसमोर पंधरा वर्षांपूर्वीचा काळ उभा राहिला.
सामाजिक बांधिलकीच्या कर्तव्यापोटी मी एका नाईट कॉलेजमध्ये शिकवत असे. तिथे येणाऱ्या सर्वांबद्दल मला खूप अभिमान वाटायचा, कारण जगण्यासाठी ती मुले नोकरी करायची आणि आयुष्यात कोणीतरी मोठे होण्यासाठी ती शिकायला यायची. त्यातलाच एक होता प्रसाद राणे. कोकणातून लालबागला आपल्या मामाकडे रहायला आलेला. इथे राहून चार पैसे कमावून आपल्या कुटुंबाला सांभाळण्याचे स्वप्न उराशी बाळगून कष्ट करणारा एक होतकरू मुलगा! शेअर बाजारातील एका ब्रोकरकडे काम करून रात्री शिकायला यायचा. हुशार, चुणचुणीत होता. आकलनशक्ती चांगली होती त्याची. वाणिज्य शाखेतून पदवीधर होऊन त्याला बँकेत नोकरी करायची इच्छा होती. बघता बघता तीन वर्षे निघून गेली आणि कॉलेज संपून बाहेरच्या जगात प्रवेश करायची वेळ आली. पुढील वाटचालीसाठी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या मी… आणि तोच होता आमच्या सगळ्यांच्या भेटीचा शेवटचा दिवस.
हेही वाचा – त्याची अन् माझी शेवटची इच्छा…!
त्यानंतर जवळपास तीन-चार वर्षांनी प्रसादसारखाच दिसणारा एक मुलगा मला चर्चगेट स्टेशनवर गाडीतून उतरताना दिसला. त्याच्या पोषाखावरून तो बहुतेक बऱ्यापैकी आयुष्यात स्थिरावलेला वाटला. मी त्याला हाक मारली. त्याने क्षणभर मागे वळून बघितले खरे, पण ओळख न देताच तो निघून गेला पुढे! कदाचित माझी ओळखण्यात चूक झाली असावी, असे समजून मी ही गोष्ट विसरून गेलो. पण त्यावेळी मी बरोबर होतो, हे मला त्या दिवसानंतर सहा महिन्यांनी कळले… जेव्हा एका मित्रांसोबत मी योगायोगाने नरिमन पॉइंटला एका बँकेत त्याच्या कर्जाच्या कामासाठी गेलो होतो. तिथे चक्क प्रसाद दिसला मला, पण का कोण जाणे त्याने ओळख नाही दिली. मला आश्चर्य जरूर वाटले, पण तो असा का वागतो आहे? ते कळत नव्हते.
त्या दिवसानंतर प्रसाद मला आज दिसला इतक्या वर्षांनी आणि ते देखील एका राजकीय पक्षाचा मोठा नेता आणि कबड्डी सामन्यांना आलेला प्रमुख पाहुणा म्हणून!
इतक्यात माझ्या पाठीवर कोणीतरी थाप मारली. मी मागे वळून बघितले. एक अनोळखी मुलगा मला म्हणाला, “पाहुण्यांना तुम्हाला भेटायचे आहे…” मी साधा बर्मुडा आणि टी शर्ट घातला होता. त्यामुळे मी त्या मुलाला म्हटले, “अरे, अशा कपड्यात मला त्यांना भेटायला लाज वाटेल. स्टेजवर सगळे मोठे लोक बसलेले आहेत. त्यांना जाऊन सांग मला जमणार नाही म्हणून.” तो मुलगा गेला आणि मी सुटकेचा नि:श्वास सोडला. पण प्रकरण एवढ्यावर थांबणारे नव्हते, हे मला पुढच्या पाच मिनिटांत समजले.
नाणेफेकीसाठी सर्व पाहुणे मैदानात आले. पण प्रसाद आयोजकांसोबत आणखी काही पावले पुढे चालत येऊन माझ्याजवळ आला आणि मला हात जोडून नमस्कार केला. त्याच्या या अचानक अशा वागण्याने सगळे आजूबाजूचे जमलेले माझ्याकडे बघायला लागले…
हेही वाचा – संसाराच्या आईस्क्रीमचे तीन फ्लेवर्स!
मीच मग बोलायला सुरवात केली “नंतर बोलू आपण. आधीच उशीर झाला आहे. सामने सुरू कधी होणार? सगळे खोळंबले आहेत. तुम्ही पाहुणे मंडळी आरामात येता. जा आधी नाणेफेक कर तू!”
असं मी म्हणताच प्रसादने मला हात धरून मैदानाच्या आत नेले, थोडे बाजूला आणि म्हणाला “तुम्ही दोनदा भेटलात, पण मी ओळख दिली नाही, त्याबद्दल माफ करा मला. मी असं का वागलो, तेच कळत नाहीये मला. नाईट कॉलेजमध्ये आयुष्याच्या मैदानावर उभं राहण्यासाठी ताकद दिलीत तुम्ही, ते नाही विसरलेलो मी. आता यशस्वीपणे जगण्याची नाणेफेक मला तुमच्या आशीर्वादाने जिंकायची आहे. मी एका राजकीय पक्षात जरूर मोठ्या पदावर आहे, पण तुम्हाला ओळख नाकारून मी माझ्याच नजरेतून उतरलो आहे. मला मोठ्या मनाने माफ करा आणि तुमचा मोबाइल नंबर द्या. आपण सवडीने भेटून बोलूया.”
“ठीक आहे. तुझी चूक तुला कळली यात सगळे आले…” असे म्हणून मी त्याला माझा नंबर दिला आणि आम्ही दोघे त्याच्यासाठी खोळंबून उभ्या असलेल्या कबड्डीच्या दोन्ही संघांच्या जवळ गेलो नाणेफेकीचा कौल करण्यासाठी…


