डॉ. किशोर महाबळ
प्रत्येक विद्यार्थ्यातील बुद्धिमत्तेचा प्रकार ओळखणे आणि त्याबद्दल त्या विद्यार्थ्याला सांगणे, हे महत्त्वाचे असले तरीही तेवढेच पुरेसे नसते. बुद्धिमत्ता ही निसर्गदत्त असते. मात्र, बुद्धिमत्तेचा कधीच आपोआप विकास होत नाही. वर्षानुवर्षे सातत्याने, चिकाटीने, निष्ठापूर्वक, ज्ञान मिळवून, अनुभव घेऊन, प्रयोग करून, वाचन, चिंतन, मनन करून, अनुभवसंपन्न बुद्धिमान व्यक्तींचे मार्गदर्शन घेऊन आणि वेळप्रसंगी स्वयंअध्ययन करून बुद्धिमत्तेचा विकास करता येतो. हा विकास घडवून आणण्यात पालक, शिक्षक, शाळा किंवा मार्गदर्शक हे एका विशिष्ट टप्प्यापर्यंतच मदत करू शकतात. त्यानंतरचा विकास मात्र पूर्णतः स्वतःचे प्रयत्न, स्वयंप्रेरणा आणि तपश्चर्येवर अवलंबून असतो, हे सर्व विद्यार्थ्याना समजावून सांगणे आणि पटवून देणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे आपल्या प्रगतीसाठी सतत कोणाची तरी मदत मागण्याची किंवा कोणावर अवलंबून राहण्याची त्यांना सवय लागणार नाही.
साहित्य, संगीत, कला, विज्ञान, सामाजिक शास्त्रे अशा विषयांत प्राविण्य मिळविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता आवश्यक असते आणि तिचा विकास व्हावा लागतो. प्रत्येक प्रकारच्या बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा उपयोग करावा लागतो. म्हणूनच विद्यार्थ्याला फक्त त्याच्या बुद्धिमत्तेचा प्रकार सांगणे पुरेसे नाही तर, ती विकसित करण्यासाठी त्याने काय काय केले पाहिजे, हेही सांगितले पाहिजे.
हेही वाचा – Education : शिक्षकांचा दृष्टिकोन सकारात्मक हवा
आपल्या बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी सांगितीक बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना काय सांगता येईल, याचा आता विचार करूया. संगीत शिकण्याची इच्छा, आवड आणि क्षमता असलेल्या विद्यार्थ्याने संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यास प्राधान्य दिले पाहिजे. त्यासाठी संगीताची जाण असणाऱ्या शिक्षकाकडून नियमितपणे संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली पाहिजे. जितके जास्तीत जास्त शिकता येईल, तेवढे शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संगीताच्या वर्गात शिकविलेल्या सर्व गोष्टींची नियमितपणे उजळणी केली पाहिजे. उत्तम संगीत शिकण्यासाठी संगीताबद्दलची मूलभूत स्वरूपाची माहिती मिळविण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. संगीत शास्त्राची माहिती देणाऱ्या ग्रंथांची नावे, संगीतातील विविध घराणी, संगीताचे प्रकार, विविध वाद्यांची माहिती अशा संगीतविषयक विविध पैलूंवर माहिती गोळा करण्यास सांगता येईल. त्यामुळे संगीतासंबंधी आवश्यक अश सारी माहिती मिळेल.
जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा थोर गायकांचे, वाद्यवादकांचे, संगीतकारांचे, जास्तीत जास्त उत्कृष्ट संगीत पूर्ण लक्ष देऊन ऐकावे. त्यामुळे उत्तम संगीताची ओळख होईल. असे संगीत कसे सादर करावे, हे कळेल. कलाकारांनी आपली कला कशी सादर केली आहे, त्यांच्या सादरीकरणात कोणते वेगळेपण आहे, त्यांचे कोणते वैशिष्ट्य आहे हे समजून घेण्याचा तसेच आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. उत्तम संगीत ऐकण्याचा संस्कार हा उत्तम दर्जाचे संगीत शिकण्यासाठी आणि सांगितीक बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी आवश्यक आहे, हे विद्यार्थ्याला समजावून द्यावे लागणार आहे. संगीताच्या क्षेत्रात लक्षणीय कार्य केलेल्या नामवंत गायक, वादक, संगीतकारांची चरित्रे, आत्मचरित्रे, पुस्तके, लेख, आठवणी याबद्दलची शक्य तेवढी माहिती विद्यार्थ्यांना गोळा करण्यास सांगता येईल. त्यामुळे या व्यक्तींनी गुरूंकडून कसे शिक्षण घेतले. उत्तम संगीत येण्यासाठी किती वर्षे, किती आणि कशी साधना केली, विविध अडचणींवर कशी मात केली हे विद्यार्थ्यांना कळेल. हे वाचन त्यांना अत्यंत प्रेरणादायी ठरेल. याशिवाय कला शिकण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात, हे लक्षात येईल.
हेही वाचा – ‘वेगळ्या’ चित्रकारांचा शोध
शालेय विद्यार्थ्यांना उपरोक्त सर्व गोष्टी करणे कठीण जाईल, असे वाटण्याची शक्यता आहे. काही प्रमाणात ते खरेही आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यात सांगितीक बुद्धिमत्ता असेल तो यापैकी अनेक गोष्टी आनंदाने करायला तयार होईल. त्यासाठी या गोष्टी त्याला सुचविणे, समजावून सांगणे, पटवून देणे आणि प्रोत्साहन देणे एवढेच शिक्षकांना करावे लागणार आहे. जसजशी विद्यार्थ्यांची प्रगती होत जाईल, तसतसे उपरोक्त उपक्रम त्याला सुचवायचे एवढेच शिक्षकांनी करायचे आहे. विद्यार्थी हा त्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न करतोय की नाही, याकडे मात्र बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. बुद्धिमत्तेचा विकास करणे, ही एक प्रदीर्घ चालणारी प्रक्रिया आहे याची त्याला नेहमीच जाणीव करून द्यायची आहे. थोडेसे शिकण्यात समाधान मानणे योग्य नव्हे, हेही नेहमी सांगितले पाहिजे. प्रामाणिकपणे, निष्ठेने असा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्याला नेहमीच प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. त्यामुळे त्याची अधिकाधिक शिकण्याची इच्छा वृद्धिंगत होईल आणि तो अधिक उत्साहाने, आपली साधना चालू ठेवेल.


