भाग – 2
कार्यालयात मी अग्रलेख लिहित असताना दुबईच्या अमला शेखचा मला फोन आला. ती कोल्हापुरच्या लिंगनूरला राहणारी गंगू होती. चार-पाच वर्षांची असताना गंगी निपाणीच्या उरूसमध्ये हरवली होती. तिला पळवून नेले होते. तिला आई-वडिलांचा शोध घ्यायचा आहे. मग मीच त्या शोधमोहिला निघालो. सोबत कार्यालयातील जुना कर्मचारी आणि एकदम विश्वासू असलेल्या भगवानला घेतलं होतं. निपाणीत लहानसे हॉटेल चालवणाऱ्या हरीभाऊंची मदत घेतली. ते कथा-कादंबऱ्या लिहिणारे लेखक होते. ते मला घेऊन लिंगनूरला आनंदरावांकडे आले.
हरीभाऊंनी ओळख करून देताना सांगितलं, “हे संपादक प्रवीण कागलकर…”
मी त्यांना अमला शेखची माहिती सांगितली. त्यांनी लगेच ओळखलं… “लक्षुमी आणि सद्या यांना गंगी नावाची लेक व्हती, लक्षुमी सारखी देखणी लेक तिची. पन लक्षुमी आणि सद्या या दोन पोरांना घेऊन उरूसमधी गेले व्हते. पन एक फुगेवाला की काय दिसला म्हणून गंगी हात सोडून धावली, आणि तेस्नी पळवील हो कोनी… एक पोरगा होता गुंडू, तो दारू आणि बहुतेक एड्सने गेल्यावर्षी मेला. सद्या चार वर्षांपूर्वी मेला. आता लक्षुमी हाय इकडं तिकडं फिरते… पर तिचं डोस्क जाग्यावर नाय…”
आम्ही तिच्याकडे गेलो, पण तिने गंगीला ओळखण्यास नकार दिला. त्यामुळे निराश होऊन आम्ही सर्वच परत आलो. सर्वांना सोडून मी आणि भगवान कोल्हापूरकडे निघालो. मी विचारलं, “भगवान काका, तुम्ही सकाळपासून माझ्याबरोबर आहात, आपण लक्ष्मीला भेटलो. आता लक्ष्मी, ‘मला कोण मुलगी नाही,’ असं म्हणून किंचाळली. याचं कारण काय असावं?”
“कसं असतं संपादक साहेब, तिची मुलगी उरूसमध्ये नाहीशी झाली, याचा तिच्या डोक्यावर खोलवर परिणाम झालाय. एवढी वर्षे झाली, जी मुलगी समोर आली नाही, ती समोर येणार हे ऐकता तिची चलबिचल झाली. तुम्हाला फोन आलेला त्या मुलीची ही आई हे निश्चित.”
“ते कसं काय?”
“मी तिच्या मागील भिंतीवर एक फोटो दिसला. त्यात लक्ष्मी, तिचा नवरा, खांद्यावर एक मूल आणि हात धरलेली एक मुलगी दिसते. तुम्ही बोलत असताना मी मोबाइलवर हा फोटो घेतला…”
“भगवान काका, म्हणून मी तुम्हाला माझ्याबरोबर घेतलं. माझ्या डोक्यात हे आलं नसतं… आता हा फोटो त्या अमला शेखच्या मोबाईल वर पाठवतो. म्हणजे, तिची खात्री होईल, आपण तिचं काम व्यवस्थित केलं याचं…”
आम्ही ऑफिसमध्ये पोहोचलो. सायंकाळी भगवानने घेतलेल्या लक्ष्मीच्या घरातला फोटो अमला शेखला पाठवला… रात्री नऊ वाजता प्रवीणच्या मोबाईलवर अमलाचा फोन आला… “प्रवीण भैया, तुम्ही एक दिवसात माझ्या आई-वडिलांचा पत्ता लावलात. तुम्ही पाठविलेला हा फोटो मला आठवला. ज्या उरूसमध्ये मला पळविले गेले, तिथेच दोन तास आधी हा फोटो काढला होता. माझ्या मायच्या हातातली मुलगी मीच आहे, मगर प्रवीण भैय्या, मेरी माय, बाबा, गुंडू कैसे आहे रे?”
“सब अच्छे हैं, तुम्हारा इंतजार कर रहे हैं…”
मी आधीच ठरवलं होतं, तिला काही सांगायचं नाही, ती येऊन दे आणि प्रत्यक्ष बघून दे.
“आभारी हूं भैया, मैं 21 तारीख को मिलती हूं,” असं म्हणून तिने फोन ठेवला.
21 जुलै… आज अमला शेख येणार आहे, हे माझ्या लक्षात होतं… दुपारी 11 वाजता ऑफिसमध्ये दोन स्त्रियांनी प्रवेश केला. एक अमला शेख होती आणि दुसरी तिची मुलगी आयेशा होती. अमलाने “प्रवीणभैय्या”, असं विचारून माझ्या केबिनमध्ये प्रवेश केला. अमला सडपातळ उंच, गोरी, सरळ नाकाची आणि तिची मुलगी पण तशीच. मला चटकन लिंगनूरला पाहिलेली लक्ष्मी आठवली.
“प्रवीण भैय्या, मैं आ गयी, यह मेरी बच्ची आयेशा…”
मी त्यांना बसायला सांगितलं अन् म्हणालो, “कसा झाला प्रवास?”
“एकदम मस्त, कल रात हम पूना पहुंचे. वहां आयेशाने होटल बुक करके रखा था और सुबह होटल से टैक्सी लेकर यहां पहुंचे… प्रवीण भैया आप के घर में कौन कौन हैं?”
“माझी पत्नी आणि एक मुलगा… बारा वर्षांचा…”
“अच्छा!” म्हणत ती बाहेर गेली आणि पुन्हा ड्रायव्हरसह आत आली. ड्रायव्हरच्या हातात एक मोठी करंडी होती.
“प्रवीण भैया, मैं ड्रायफ्रुट्स लायी, तुम्हारे बच्चे के लिए और यह है भाभी के लिए…” असं म्हणत तिने एक सोन्याचा नेकलेस माझ्या हातात दिला.
“यह क्या है अमला, यह तो मैं नहीं ले सकता…”
“तुझे तो लेना ही पडेगा, तू मेरा भैया हैं ना, ना नहीं बोलने का!”
माझी स्थिती अवघडल्यासारखी झाली… पण काही केलं तरी ती ऐकणार नव्हती. शेवटी नाईलाजाने त्याचा स्वीकार केला. त्यामुळे अमलाला बरं वाटलं.
“भैय्या जाऊया का निपाणीला? मला कधी एकदा घरी जाते, असं झालंय.”
“हो, हो जाऊ या ना…”
आम्ही बाहेर आलो.. एक भारी मोठी गाडी उभी होती. मी भगवान काकांनाही बरोबर घेतले. गाडी कोल्हापूर शहरात फिरताना अमला भिरभिरत्या नजरेने बाहेर पाहात होती. बहुदा तिला थोडं थोडं आठवत असावं. गाडी बेळगाव रस्त्याला लागल्यावर अमला म्हणाली, “भैय्या, तुमने मेरी मां और बाबा को देखा होगा… और मेरा छोटा भाई गुंडू, अब बडा हुआ होगा!”
हेही वाचा – निपाणीच्या उरुसात हरवलेली गंगी…
मी अवांढा गिळला. कितीतरी वर्षांनी आपल्या घरच्यांना भेटायला ती उत्साहात आली होती. अशावेळी तिला दु:खी करणे योग्य वाटत नव्हते.
“अम्मा माझी वाट बघत असेल… कितना प्यार करती थी मुझे वह… और मेरा बाबा मुझे कंधे पर उठाकर घुमता था, सब याद है मुझे…” अमला भूतकाळात रमली. तोपर्यंत गाडी निपाणी हद्दीजवळ आली. निपाणी आल्यावर मी हरीभाऊंना गाडीत घेतले आणि तिथून लिंगनूरला जाऊन आनंदरावांना सोबत घेतलं. आनंदरावाच्या घराकडे गाडी उभी राहिल्यावर अमलाखाली उतरली. तिने आनंदरावांना आणि त्यांच्या पत्नीला नमस्कार केला.
आनंदराव म्हणाले, “गंगे केवढी मोठी झालीस गं तू. एवढीशी असताना बाबाच्या खांद्यावर बसून इथे येत होतीस!”
“किती वर्षांनी कुणीतरी गंगे म्हणून हाक मारली… काका, ओळखलं मी तुम्हाला. तुमचं घर बी तसंच हाय…” अमला हरखून गेली.
“गंगे खूप शोधलं तुला सद्यानं आणि लक्षुमीनं. पोलिसांत भी तक्रार दिली. पन कुठं काय पत्त्या लागणार… मग रडत गप बसले.”
त्या आठवणीने अमलाच्या डोळ्यात पाणी आलं. ती डोळे पुसत म्हणाली, “काका, मला मायला भेटायचंय… बाबाला भेटायचंय… गुंडूला बघायचंय… मोठ्ठा झाला असलं ना गुंडू?”
आनंदरावांनी चपापून माझ्याकडे पाहिलं. मी त्यांना शांत राहण्याची खूण केली.
आनंदराव गाडीत बसले आणि आम्ही लक्ष्मीच्या घराच्या दिशेने निघालो. अमला ऊर्फ गंगीला थोडं थोडं आठवत होतं… पहिली गावातली शाळा लागली, मग देऊळ लागलं, पायऱ्यांची विहीर लागली. गंगी आपल्या मुलीला कौतुकाने आपला गाव दाखवत होती.
हेही वाचा – एका संपाची कहाणी
गाडी झोपडपट्टीपाशी आली, गंगीला आठवत होते ते रस्ते तसेच होते. तशाच चाळी…, पण मोडकळीस आलेल्या! गाडी उभी राहिली… आनंदराव पुढे झाले आणि चालू लागले. त्यांच्यापाठोपाठ गंगी होती. बाकी सर्व आम्ही त्यांच्या मागे होतो. झोपडीजवळ आल्यावर आनंदराव थांबले. आता गंगीला काहीतरी आठवायला लागलं… ती पुढे झाली, “माय ए माय” अशा हाका मारत दारातून आत गेली. आत लक्ष्मी एका चिरकुटावर झोपली होती. तिचा आवाज ऐकून ती उठली…
“माय मला वळखलं का, मी गंगी. गंगीं गं!” अमला तिच्याजवळ जात म्हणाली.
“कोण गंगी? मी वळकत नाय…”
“अग माय, मी तुझी लेक न्हवं, उरुसत नाईशी झाल्ली!”
“मल्ला कोन लेक न्हाय, माजा एकच गुंडू… गुंडू रे… मायला टाकून गेलास गुंडू…”
मग आनंदराव पुढे झाले, “लक्षमे, उरुसात हरवली न्हवे तुझी लेक गंगीं, ती परत आलिया…”
“मी बोल्ले न्हवं, माजी कोन लेक न्हाय, माजा एकच गुंडू…, मला सोडून गेल्ला रे…”
लक्ष्मी धाय मोकलून रडू लागली. तिला रडताना पाहून गंगीही रडू लागली. मग गंगीने आनंदरावांना विचारलं, “गुंडू कुठं हाय? आनी बाबा?”
“गंगे तुझा बाबा पाच वर्षांपूर्वी देवाघरी गेला अन् गुंडू एका वरसापूर्वी..”
“मुझे मालूम नहीं था, मला माज्या बाबाला भेटायचं व्हतं, गुंडूला पन…”
अमला रडायला लागली. लक्ष्मी ‘गुंडू… गुंडू…’ करत आक्रोश करत होतीच. आजूबाजूची लोक जमा झाली होती. मग पटकन अमलाची मुलगी आयेशा पुढे झाली आणि तिने आपल्या अम्मीला सावरलं. मग गंगी डोळे पुसून आपली माय लक्ष्मीच्या शेजारी बसली. तिने मायला विचारले, “माय येते का माझ्याबरोबर? मी तुला न्यायला आले…”
त्याबरोबर लक्ष्मी एकदम उभी राहिली, “कोन आहेस तू? मी वळकत नाय, चालू पड… माझा धरम बाटवायला आली, म्या न्हाई धरम बदिलणार”
मग आनंदराव पुढे झाले, “लक्ष्मे, तुझी लेक हाय ती, तुला न्यायला आलिया…”
“मी न्हाई कूटं जनार, मी माज्या गुंडू बरोबर…” असं म्हणत पुन्हा ती आक्रोश करू लागली. गंगीने आनंदरावांकडे पाहिलं. तिने पर्समधून पैशांचं बंडल काढलं, “माय, हे तुझ्यासाठी ठेव” म्हणत लक्ष्मीच्या हाती दिलं. त्याच क्षणी लक्ष्मीने ते फेकून दिलं. “मले पैस देऊन इकत घेती भवानी! माजा धरम बाटवायला आलिया, चालू लाग, चालू लाग…” म्हणत कोपऱ्यातली मोठी काठी गंगेच्या डोक्यावर मारली.
गंगी कळवळली, आनंदरावांनी तिला हाताला धरून बाहेर आणलं. “माज्या मायने मल ओळखलं नाय, काठी मारली माज्या डोक्यावर…” म्हणत ती रडू लागली. आनंदरावांनी अमलाला गाडीकडे नेले. “गंगे, तिने तुला वळीकलं न्हाय, तिच्या डोस्क्यावर परिणाम झालाय, माग सा महिनं वेड्याच्या हास्पिटलात ठेवली व्हती तिला, पन काय उपेग न्हाय झाला…” आनंदराव म्हणाले.
गाडी त्या वस्तीतून बाहेर पडली. वाटेत आनंदरावाना सोडले तर, निपाणीत हरीभाऊंना सोडून गाडी कोल्हापूरच्या दिशेने धावू लागली.
अमला गप्प गप्प होती. गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहत होती. मीसुद्धा गप्प होतो. थोड्यावेळाने अमला बोलू लागली… “भैय्या, आज मेरे पास सबकुछ है, पैसा है, घर है, मगर क्या बोलते है, माँ के बिना…”
“आई विना भिकारी…” भगवान पटकन बोलले.
“हां भय्या, मैं भिकारी हूं, माय के बिना भिकारी… माँ जिस लडकी को गले नहीं लगाती ऐसी बदकिस्मत लडकी हूं मैं… भैय्या, पाच सालची होते तभी मुझे भगाया गया, क्या गलती थी मेरी? इतना ही की मैं लडकी थी! उरूस में खिलोना देखते ही मेरे अम्मा का हाथ मैंने छोडा, मुझे क्या मालूम था, वह हात हमेशा के लिए छुटा…”
“सच बोलू भैया, इतनी साल मैं जिंदा रही एक उम्मीद पर… एक ना एक दिन फिर स्वदेश जाऊंगी… अम्मा, बाबा, गुंडू को मिलूंगी… भैय्या, अम्मीने मुझे गले लगाया नहीं, मुझे पहचाना नहीं! ऐसी बदकिस्मत औरत हूं मैं…” गंगी बोलत होती… “भैय्या, मलाही वाटतं होतं माझ्या मायच्या कुशीत झोपावं, तिच्या हातची भाकरी खावी, शाळेत जावं, अभ्यास शिकावा, पण या माझ्या नशिबी काय… “मैं अपने देश में फिर नहीं आऊंगी भैय्या, कभी नहीं आऊंगी! मेरी माँ ने मुझे पहचाना नहीं… वह भी कितनी दिन देखेगी… उसे मेरे पैसे भी नहीं चाहिए! और क्या दे सकती थी मेरी माँ को?”
आम्ही माझ्या कार्यालयाजवळ आलो. गाडी थांबल्यावर मी आणि भगवान उतरत होतो… अमला म्हणाली, “मैं स्वदेश इतने बरस के बाद आयी तो मुझे तुम्हारे जैसा भाई मिला, मैं तुम्हे कभी नहीं भुलूंगी, भैय्या. कधी दुबईत आलास तर लक्षात ठेव तुझी बहीण तुझी वाट पहातेय, अलविदा…”
मी विष्णण अवस्थेत होतो, कंठ दाटून आला होता. दोघी गाडीत बसून हात दाखवत होत्या. डोळ्यात पाणी जमा झालं होतं. मी भगवान यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं, ते तर मुसमूसत होते. गाडी सुटता सुटता ड्रायव्हरने श्रीधर फडके यांचे गाणे लावले होते…
त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी
पैशात भावनेचा व्यापार पाहिला मी…
समाप्त
मोबाइल – 9307521152 / 9422381299


