मागील तीन लेखांत आपण लेखन, वाचन आणि संवाद यातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण विपश्यनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ याबाबत जाणून घेणार आहोत.
विपश्यनेविषयी थोडक्यात…
विपश्यना ध्यानपद्धती ही एक भारतीय पुरातन शास्त्रोक्त विद्या आहे. विपश्यना या संस्कृत शब्दाचा अर्थ विशेष दृष्टी किंवा अंतर्दृष्टी असा आहे. विपश्यना म्हणजे स्वतःच्या आत डोकावणे होय. सोप्या भाषेत विपश्यना म्हणजे गोष्टी जशा आहेत तशाच स्पष्टपणे पाहणे.
विपश्यना प्रक्रिया
मन आणि श्वासोच्छ्वास यातील निकटचा संबंध लक्षात घेऊन विपश्यनेच्या अगोदर आनापानसती हे पूर्वकर्म केले जाते. आनापान म्हणजे श्वासोच्छ्वास आणि सती म्हणजे सजगता. श्वासोच्छ्वास नैसर्गिकरीत्या होऊ देणे आणि त्याचा जाणीवपूर्वक अनुभव घेणे म्हणजे आनापानसती होय.
हेही वाचा – लेखनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ
विपश्यनेच्या प्रक्रियेत संपूर्ण मौन पाळावयाचे असते. मौन म्हणजे केवळ शांत राहणे किंवा न बोलणे एवढेच नव्हे तर, बाह्य वातावरणापासून दूर जाऊन आंतरिक शांतता अनुभवणे.
थोडक्यात सांगायचे झाल्यास, विपश्यनेत साधकाने एकांतवासात असल्याप्रमाणे वागणे अपेक्षित असते.
विपश्यनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ
विपश्यना या संज्ञेचा अर्थ आणि प्रक्रियेतील समाविष्ट आनापानसती आणि संपूर्ण मौन या बाबी विचारात घेतल्यानंतर विपश्यनेतून साधकास मिळणारे पुढील मानसिक आरोग्य लाभ सहजी लक्षात येतील –
- विपश्यनेतून आत्मसंवाद सहजसाध्य होतो. यामुळे आत्मपरीक्षण शक्य होते, परिणामी आत्मशुद्धी प्रक्रिया सुकर होते.
- मन अत्यंत स्थिर आणि प्रसन्न होते.
- चित्ताची एकाग्रता साधली जाते.
- आंतरिक समाधान आणि शांतीची अनुभूती येते.
- अंतर्मनाचा आवाज ऐकण्याची संधी मिळते.
- मानसिकतेत सकारात्मक परिवर्तन होते.
- विचारांमध्ये अधिक स्पष्टता येते.
- मनात विधायक विचार येतात.
- मानसिक चिंता आणि ताणतणाव कमी होतात.
- मानसिक विकार दूर करण्यात साहाय्य लाभते.
- विपश्यना निरामय मानसिक आरोग्यासाठी प्रभावी उपयुक्त साधन आहे.
विपश्यनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ लक्षात आल्यावर आपणास विपश्यना केंद्रात निसर्गाच्या सान्निध्यात विपश्यनेचा अनुभव घ्यावासा नक्कीच वाटेल.
हेही वाचा – वाचनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ
या संदर्भात इथे आवर्जून नमूद करावेसे वाटते की, निरामय आरोग्य संकल्पनेतील माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ आणि ‘निरामय मानसिक आरोग्य’ या पुस्तकांत संबंधित विषयांवर उपयुक्त सर्वसमावेशक सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
आपण पुढील लेखात आरोग्यावर सुपरिणाम करणाऱ्या अशाच एका विषयाबाबत जाणून घेणार आहोत.
हेही वाचा – संवादातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ
नम्र निवेदन
गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9850856774 यावर 🙏/👌/👍 / 👏 / तत्सम चिन्हाने व्हॉट्सॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.


