मागील लेखात आपण वाचनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण लेखनातून मिळणारे मानसिक आरोग्यलाभ याबाबत जाणून घेणार आहोत.
लेखनाविषयी थोडक्यात…
वास्तविक लेखनातूनच वाचन उदयास आले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. पुरातन काळापासून लेखनकार्य अविरत चालू असून ते असेच पुढे देखील कार्यरत राहणार आहे. कालपरत्वे लेखनाची व्याप्ती विशाल होत आहेच, पण त्याबरोबर लेखनाच्या साधनांमध्ये देखील आमूलाग्र बदल होत आहेत. लहानपणी मी बोटांमध्ये बोरू धरून लिहायला शिकलो, तद्नंतर लिहिण्यासाठी विविध साधनांचा उपयोग करत आलो आणि आता तर मोबाइलमुळे थेट बोटांनीच लिहितोय… कालाय तस्मै नमः।
लेखनाच्या विविधतेबद्दल लिहायचे झाल्यास पौराणिक, धार्मिक आणि ऐतिहासिक लिखाणाबरोबर आता आधुनिक जगतातील नानाविध अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तके, वर्तमानपत्रे, विविध विषयांवरील तसेच शास्त्रांशी निगडीत वाङ्मय, कथा, कादंबरी, कविता, नाटक, ललित साहित्य आदी आणि ते देखील विश्वातील अगणित भाषेत उपलब्ध आहे.
लेखनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ
लेखनातून लेखकाला पुढील मानसिक आरोग्य लाभ प्राप्त होतात :
- लेखनामुळे सर्जनशीलता तथा विचारशक्ती वृद्धींगत होते.
- लेखनातून मानसिक ताण हलका होतो.
- लेखनामुळे विचारातील गोंधळ दूर होऊन मनःस्वाथ्य मिळते.
- लेखन हा समस्या सोडविण्याचा प्रभावी उपयुक्त मार्ग आहे.
- लेखनामुळे सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.
- लेखनातून आत्मविश्वास वाढीस लागतो.
- लेखनातून मानसिक आरोग्य संपन्न होते, परिणामी व्यक्तिमत्त्व विकास साधण्यास सहाय्य लाभते.
लेखनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ लक्षात घेतल्यास वाचकांना लिहिते व्हावे, असे नक्की वाटेल. आपल्या दैनंदिन जीवनात आपण जसे जमेल तसे नित्यनेमाने काही तरी आवर्जून लिहिले पाहिजे. दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या गोष्टींची नोंद डायरीत करणे, हे देखील लेखनाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
स्वानुभव सांगायचा झाल्यास, मी बरीच वर्षे दररोज डायरी लिहित असे. निवृत्तीनंतर गेल्या तीन वर्षांत मी ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ आणि ‘निरामय मानसिक आरोग्य’ ही तीन पुस्तके लिहिली. पुस्तकलेखनातून माझा स्वान्त सुखाय हा हेतू साध्य झाला आणि मला विलक्षण मानसिक समाधान लाभून मनापासून आनंद मिळाला. तसेच ‘अवांतर वेबसाइट’ या मुक्त व्यासपीठावर आरोग्य सदरातील माझे लेखन मला निश्चितच मानसिक आरोग्य संवर्धनात सहाय्य करते, हे सांगणे न लगे…
आपण पुढील लेखात आरोग्यावर सुपरिणाम करणाऱ्या अशाच एका विषयाबाबत जाणून घेणार आहोत.
क्रमश:
नम्र निवेदन
गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9850856774 यावर 🙏/👌/👍 / 👏 / तत्सम चिन्हाने व्हॉट्सॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.


