Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, May 9
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » कोर्टकचेरी करण्यापेक्षा…, वकिलांनी प्रशांतला दिला मोलाचा सल्ला
    ललित

    कोर्टकचेरी करण्यापेक्षा…, वकिलांनी प्रशांतला दिला मोलाचा सल्ला

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 26, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठी कथा, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, प्रशांतची जमीन, डॉक्टर प्रशांत घार्गे सर, सहा एकर जमीन, प्रशांत घार्गे मैत्री, नियत फिरणे, विश्वासघात, मित्राकडून फसवणूक, काशिनाथ आण्णाचा करार, शेतजमिनीचा करार,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    ॲड. कृष्णा पाटील

    भाग – 2

    डॉ. प्रशांतने नेहमीप्रमाणे इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मूळ विषयाला हात घातलाच. “सर, आता आम्ही नाशिकला कायमचे शिफ्ट झालो आहोत. म्हणून इथली जमीन विकायचा निर्णय घेतला आहे. तुम्ही आता ती जमीन करीतच आहात. तुम्हीच ती जमीन घ्यावी, अशी आमची विनंती आहे.”

    क्षणभरच घार्गे सर गोंधळून गेले. त्यांना काही बोलावे सुचत नव्हते. परंतु ते सावध झाले आणि म्हणाले, “डॉक्टर, मला ती जमीन परवडणारी नाही. तुम्ही ती कुणालाही विका.”

    प्रशांत म्हणाला, “ठीक आहे. समजा मी जमीन कुणाला विकली तरी तुमच्या बागेचे पीक जाईपर्यंत त्या जमिनीचा विकत घेणाऱ्या नवीन मालकाला ताबा घेऊ देणार नाही. शिवाय, तुमचे जे पण काही पुढील एका वर्षाचे नुकसान झाले असेल, ते पण मी द्यायला तयार आहे.”

    घार्गे सर म्हणाले, “ठीक आहे. मी माझ्या बायका, मुलांना विचारतो आणि तुम्हाला दोन दिवसांत भेटायला येतो.”

    पाच-सहा दिवस झाले. रविवार होता. वेळ सकाळची होती. डॉक्टर प्रशांत आपल्या केबिनमध्ये बसला होता. एवढ्यातच त्याला घार्गे सर आणि त्यांची दोन्ही मुले येताना दिसली. घार्गे सर नेहमीप्रमाणे आनंदाने आणि समाधानाच्या वृत्तीने आलेले दिसत नव्हते. त्यांचा चेहरा तणावग्रस्त झाला होता. डोळे पण तांबरलेले होते. त्यांनी केबिनमध्ये प्रवेश करताच घार्गे सरांचा थोरला मुलगा डॉक्टर प्रशांतला म्हणाला, “डॉक्टर तुम्ही आमच्याशी अशी दगाबाजी करायला नको होती. आम्हाला धोका देऊन तुम्ही काय मिळवले?”

    हेही वाचा – डॉ. प्रशांत, घार्गे सर अन् सहा एकर जमीन…

    डॉक्टर अवाक् होऊन त्यांच्याकडे पाहत राहिला. तो म्हणाले, “प्रमोद, अरे तुला नेमकं झालंय काय? मी कसली तुमच्याशी दगाबाजी केली?”

    एवढ्यातच धाकला मुलगा, प्रसाद म्हणाला, “तुम्ही तुमची जमीन अशी मधेच विकणार होता तर, आम्हाला ड्रॅगन बाग वगैरे लावत असतानाच तुम्ही सांगायला पाहिजे होतं. त्या जमिनीचा कोपरान् कोपरा आम्ही पिकवला आहे. ती संपूर्ण जमीन बागायत केली आहे. त्यामध्ये आम्ही कष्ट ओतले आहेत. त्यामध्ये पाइपलाइन केली आहे आणि आता तुम्ही ती जमीन विकायला लागला आहात.”

    डॉक्टर प्रशांत म्हणाला, “अरे, परंतु आपला करारच मुळात पाच वर्षाचा होता. ती पाच वर्षे सुद्धा आता संपत आली आहेत. शिवाय तुम्ही एकाही वर्षाचं भाडं दिलेलं नाही. त्यामुळे मी दगाबाजी करण्याचा प्रश्न येतो कुठे? तुझे वडील आणि मी एका ताटात जेवलो आहे… असे शब्द तुझ्या तोंडात शोभतात का तरी?”

    थोरला मुलगा खुर्चीवर बसला आणि कागदाचे भेंडोळे डॉक्टरांच्या पुढे पसरले. म्हणाला, ‍”हा घ्या हिशोब. एवढे पैसे द्या आणि तुम्ही कुणालाही जमीन विका. आमची काहीही हरकत नाही. पण आमचा हिशोब भागवत नाही, तोपर्यंत तुम्ही कुणी त्या जमीनीत पाऊल ठेवायचं नाही.”

    डॉक्टर प्रशांतने हिशेबाचा तो कागद बघितला आणि त्याला भोवळच आली. थोडा वेळ त्याला काहीच समजत नव्हते. त्या कागदावरचा हिशेब आणि ते आकडे पाहिले अन् प्रशांतला घाम फुटला. रुमालाने त्याने कपाळावरचा घाम पुसला. संतापाने तो म्हणाले, “तोंडी ठरल्याप्रमाणे तुम्ही पाच वर्षे जमीन करणार होता. आता चार वर्षे पूर्ण झाली आहेत. एक वर्ष राहिले आहे… आता तुम्ही माझ्याकडे ऐंशी लाख रुपयांची मागणी करायला लागलेला आहात! हा कोणत्या प्रकारचा हिशोब आहे? मला काही समजत नाही. एक काम करा. तुम्ही अजून एक वर्ष जमीन करा. मी पुढच्या वर्षी जमीन विकीन.”

    एवढ्यातच घार्गे सर म्हणाले, “डॉक्टर, आता एकदा आपल्या दोघांच्या नात्यांमध्ये मिठाचा खडा पडला तो पडला. आता काही झालं तरी तो भरून निघणार नाही. तुम्ही जमीन आज विका किंवा पुढच्या वर्षी विका. आमची मुलं म्हणतायेत, त्या पद्धतीने पासष्ट लाख रुपये द्या आणि आम्हाला मोकळे करा.” 

    शब्दाला शब्द वाढत गेला. डॉक्टर प्रशांतचा बीपी पण वाढत गेला. एका ताटात जेवणारा माणूस असा बदलू शकतो? ज्याच्यासाठी एवढे केले तो इतका स्वार्थी होऊ शकतो? डॉक्टर प्रशांतचं डोके गरम झाले. तळपायाची आग मस्तकाला गेली. परंतु आता बोलूनही काही उपयोग नव्हता. तो खाली मान घालून विचार करीत होता. त्याचं संपूर्ण शरीर कंप पावत होतं. पुन्हा एकदा घार्गे सर निर्दयपणे म्हणाले, “तुम्ही विचार करा आणि आम्हाला काय ते लवकरात लवकर कळवा.”

    घार्गे सरांनी धाडकन् केबिनचे दार उघडलं आणि तिघेही ताडताड चालत केबिनच्या बाहेर निघून गेले.

    प्रशांतने टेबलवरची पाण्याची बाटली घेतली. त्यांनी शांतपणे तीन चार घोट पाणी घेतले. दोन मोठे दीर्घ श्वास घेतले आणि पत्नीला हाक मारली. आवाजातला बदल जाणून पत्नी धावत पळत आली. डॉक्टर प्रशांत म्हणाला, “आताच घार्गे सर येऊन गेले…” आणि त्यांनी पत्नीला सर्व हकीकत सांगितली. यावर ती बिचारी सर्द झाली. तिला आश्चर्य वाटले… तिला ही गोष्ट पटेनासी झाली.

    तिने तिच्या भावाला फोन केला. तिचा भाऊ म्हणजे काशिनाथ आण्णा. नागपाडा या परिसरात आण्णांचा चांगला वट होता. आण्णा म्हणजे गरिबांच्या बाजूने कायम न्याय देणारा माणूस अशी त्यांची ख्याती होती.  डॉक्टरची पत्नी तिच्या भावाला म्हणाली, “एक तातडीचे काम आहे. असशील त्या परिस्थितीमध्ये निघून ये.”

    दुसऱ्या दिवशी काशिनाथ आण्णा डॉक्टरकडे आले. प्रशांतने त्यांना पूर्ण हकीकत सांगितली. आण्णांनी लगेचच आपल्या वकील मित्राला फोन लावला आणि घरी बोलावून घेतले.

    खरं म्हणजे डॉक्टर प्रशांत अजून त्या धक्क्यातून सावरला नव्हता. आपण ज्या माणसाला अठ्ठावीस वर्षे जीव लावला, तो हाच का माणूस, असा प्रश्न त्याला पडला होता. पैशासाठी, जमीन-जुमल्यासाठी माणूस कोणत्या थराला जातो, याचं त्याला आश्चर्य वाटत होतं. घार्गे सरांचं सोडा, निदान ते जमीनजपमल्याला भूलले… परंतु ज्या प्रसादला परदेशात नेऊन सेटल केला, त्याच्यासाठी इतका पैसा ओतला, पोटच्या मुलासारखा ज्याला जीव लावला, त्याने सुद्धा या थराला जावे? सेटल होईपर्यंत तो मला गुरू मानत होता, पण प्रॉपर्टीच्या मोहाने तोही पूर्ण बदलला…

    हेही वाचा – सुटका सावकारी पाशातून…

    प्रशांत असा विचार करीत होता, इतक्यात वकील साहेब घरी आले. डॉक्टरांच्या केबिमध्ये सर्वजण बसले. वकिलाला आण्णांनी सर्व हकीकत सांगितली. वकील म्हणाले, “घार्गे सरांचा आणि तुमचा तोंडी करार झाला आहे. त्याला कायद्यामध्ये कुठेही स्थान नाही. वास्तविक तुमची जमीन त्यांनी बेकायदेशीररित्या त्यांच्या ताब्यात ठेवली आहे. तोंडी करारपत्रानुसार जमीन त्यांच्या ताब्यात आहे, असे मानून आपण कोर्टात गेलो तर, ती जमीन परत मिळवण्यासाठी तुमची दहा-पंधरा वर्षे कुठे जातील समजणारही नाही. आपणास कोर्ट-कचेरीची पायरी न चढता वेगळ्या पद्धतीचा अवलंब करावा लागेल. मला असं वाटतंय तुम्ही सरळ काशिनाथ आण्णांना ती जमीन कसण्यासाठी दिली आहे असे एक करारपत्र करून द्या.”

    काशिनाथ आण्णाकडे बोट करून वकील म्हणाले, “…आणि आण्णा, तुम्ही सरळ ती जमीन मी करायला घेतली आहे. त्यामुळे येथे कोणी यायचे नाही असा पवित्रा घ्या. तरच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तोंडी करार असल्यामुळे घार्गे सर कोणत्याही पोलीस स्टेशनला किंवा कोर्टात गेले तरी काही फरक पडणार नाही.”

    दोन दिवसांनी करारपत्र तयार करण्यात आले. देणार घेणाऱ्यांच्या सह्या झाल्या. सोमवारी सकाळी काशिनाथ आण्णांनी ते करार पत्र बॅगेत टाकले. बॅग काखेला अडकवून ते सरळ शेतात गेले. त्यांच्या पाठोपाठ दोन ट्रॅक्टर, एक जेसीबी मशीन आले. बघता बघता कामाला सुरुवात झाली.

    इतक्यात घार्गे सर आणि त्यांची दोन्ही मुले तिथे आली. त्यांनी काशिनाथ आण्णांना विचारले, “तुम्ही कुणाला विचारून येथे ट्रॅक्टर घातला आहे. याचे परिणाम वाईट होतील.”

    काशिनाथ आण्णा शांत होते. त्यांनी बॅगेतून करार पत्राची झेरॉक्स काढली. ती घार्गे सरांच्या हातात दिली. घार्गे सरांनी ती वाचली आणि परत देत म्हणाले, “असले करारपत्र कुणालाही करता येईल. मी तुमच्या अगोदर ही जमीन घेतली आहे.”

    काशिनाथ आण्णा म्हणाले, “घार्गे सर, कदाचित तुम्हाला माहीत नसेल, म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतो. आज आला तेवढे बस्. उद्यापासून या जमिनीमध्ये पाऊल ठेवाल तर तुम्ही घराकडे परत जाऊ शकणार नाही. तुम्हाला पुन्हा यायचे असेल तर तुमच्या पत्नीला सांगून या.”

    आण्णांच्या रागाचा अवतार बघून घार्गे सरांनी आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी जमिनीतून काढता पाय घेतला. ते थोड्या अंतरावर गेले असतील. काशिनाथ आण्णांनी त्यांना परत बोलवून घेतले आणि एकदा सांगितले, “कुठे पोलीस स्टेशनला किंवा कोर्टात गेला तर त्याचा काही एक उपयोग होणार नाही हे तुम्हाला माहिती आहे. शेवटी तुम्ही शिक्षक आहात. परंतु तसा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा त्याचे परिणाम वाईट होतील, हेही ध्यानात ठेवा. आणखी एक गोष्ट. डॉक्टर प्रशांत हे माझे मेव्हणे आहेत. आता ऐंशी लाख काय त्यांच्याकडे ऐंशी रुपये जरी मागितले तरीसुद्धा व्हायचा तोच परिणाम होईल. त्यामुळे झालं गेलं विसरून आता या जमिनीचा आणि डॉक्टरकडून पैसे उकळण्याचा नाद सोडून द्या.”

    घार्गे सर आणि त्यांची दोन्ही मुले पाठीमागे न पाहता त्यांच्या घराच्या रस्त्याला लागली.

    काशिनाथ आण्णांनी शेतातूनच डॉक्टरला फोन केला. वकिलांनाही फोन केला. त्यांना शेतात बोलवून घेतले. एका मोठ्या संकटातून बाहेर पडल्यावर जे समाधान मिळते, त्या समाधानाने डॉक्टर प्रशांत शेतात आला. शेतात चाललेल्या मशागतीकडे शांतपणे पाहू लागला. प्रशांत वकिलांना म्हणाला, “वकील साहेब, माझे ठीक आहे. माझ्या पाठीमागे आण्णा तरी होते. परंतु गरीबावर असा प्रसंगा आला तर त्याने काय करायचे?”

    वकील साहेब म्हणाले, “डॉक्टर खरं सांगू का? आजकाल गरिबांनी कुणावर आंधळा विश्वास ठेवावा, असे दिवस राहिले नाहीत. त्यामुळे कोर्टकचेरी करण्यापेक्षा कुणावर आंधळा विश्वास न ठेवलेला बरा.”

    समाप्त


    मोबाइल – 9372241368

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026 ललित

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026 ललित

    सरकता जिना… दोन भावांच्या प्रगतीचा

    May 7, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    By प्रणाली वैद्यMay 8, 2026

    भाग – 24 समोर स्क्रीनवर प्रेझेंटेशन सुरू होतं आणि आराध्या ते लक्षपूर्वक ऐकत होती… कृत्तिकाने…

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    सरकता जिना… दोन भावांच्या प्रगतीचा

    May 7, 2026

    सहेला रे…

    May 6, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!

    May 8, 2026

    Dnyaneshwari : जी लोचना भाग्य उदेलें, जीवा सुखाचें सुयाणें पाहलें

    May 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 मे 2026

    May 8, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 291
    • अवांतर 185
    • आरोग्य 108
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 412
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 204
    • मैत्रीण 18
    • ललित 610
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.