राज हा एका छोट्याशा गावात राहणारा अल्पभूधारक शेतकरी. त्याच्या कुटुंबात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि शाळेत जाणारी दोन मुलं. अवघी दोन एकर शेती. गेली दोन वर्षं पावसाने दगा दिल्यामुळे शेतीतून म्हणावं असं उत्पन्न नव्हतं. घेतलेलं कर्ज फेडणं तर दूरच, व्याजही वाढत चाललं होतं. घरातलं थोडंफार सोनं विकूनही हातात काही उरलं नव्हतं. सावकाराने घर जप्त करण्याची धमकी दिल्यामुळे राज पूर्णपणे खचून गेला होता.
एकीकडे कुटुंबाची काळजी आणि दुसरीकडे कर्जाचा डोंगर. या विवंचनेतून बाहेर पडण्याचा मार्ग त्याला दिसत नव्हता. मनात निराशेचे विचार थैमान घालू लागले होते. आयुष्य संपवण्याची कल्पना वारंवार मनात डोकावत होती. मात्र, कुटुंबाचा विचार येताच तो स्वतःला सावरत होता.
गावाबाहेरच्या स्मशानभूमीजवळ एक जुनं वडाचं झाड होतं. रात्रीच्या वेळी तिथे कुणी फिरकत नसे. राज काही दिवसांपासून रात्री उशिरा तिथे जाऊन बसू लागला. आत्महत्या कधी करावी? कशी करावी? कुठे करावी? हाच विचार त्याच्या मनात असायचा.
अशीच एक रात्र, अमावस्येची. सर्वत्र अंधार पसरलेला. रात्रीचे बारा वाजले होते. झाडाच्या पानांची सळसळ आणि दूरवरून येणाऱ्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज वातावरणात एक वेगळीच भीती निर्माण करत होता… अचानक राजला समोरून कुणीतरी येताना दिसलं. पांढरा शर्ट आणि पांढरा लेंगा घातलेली एक आकृती हळूहळू त्याच्याच दिशेने येत होती. राजच्या अंगावर भीतीने काटा आला. तो उठून उभा राहिला.
हेही वाचा – मुलगा राज रातोरात बदलल्याने सदानंद आणि सावित्रीबाई विचारात पडले…
“घाबरू नकोस. मी तुला काहीही करणार नाही,” त्या आकृतीने सांगितलं.
“तू… तू कोण आहेस? इतक्या रात्री इथे काय करतोस?” राजने भीतभीत विचारलं.
“मी वरद. तुझ्यासारखाच मीही एक शेतकरी होतो.”
“हो… तो…?” असं विचारताना राज घामाघूम झाला.
“हो, आता मी या जगात नाही,” वरद म्हणाला.
वरद काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला,
“मी या स्मशानासमोरच्या गल्लीत राहायचो. इथून दोन मैलांवर माझी दोन एकर शेती होती. घरात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि एक शाळकरी मुलगी. शेती हेच आमच्या उदरनिर्वाहाचं एकमेव साधन होतं. पण सलग दोन-तीन वर्षं पावसाने दगा दिला. पीक हाती येईना. आधीच घेतलेलं कर्ज वाढत चाललं होतं. व्याजाचा डोंगर उभा राहिला होता. सावकाराचा तगादा सुरू होता. घर जप्त करण्याची धमकीही त्याने दिली होती.
“या सगळ्यामुळे मी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून गेलो होतो. कुणाशी मन मोकळं करावं, मदत कुणाकडे मागावी, हेही सुचत नव्हतं. परिस्थितीशी दोन हात करण्याऐवजी मी चुकीचा निर्णय घेतला.”
“म्हणजे, काय केलंस तू?” राजने धास्तावून विचारलं.
“मी आत्महत्या करून माझं आयुष्य संपवलं…” वरद क्षणभर थांबला. त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप स्पष्ट दिसत होता, “पण माझ्या जाण्याने प्रश्न सुटले नाहीत. उलट माझ्या कुटुंबाच्या अडचणी आणखी वाढल्या. माझ्या मृत्यूनंतर पोलीस तपास आणि चौकशीमुळे घरच्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. आई-वडिलांना उतारवयात मोलमजुरी करावी लागली. माझी पत्नी आणि लहान मुलगीही दुसऱ्यांच्या शेतात कामाला जाऊ लागल्या. घरात कर्ता पुरुष नाही म्हणून त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. माझ्या निर्णयामुळे माझ्या माणसांचं आयुष्य अधिकच कठीण झालं, ही खंत मला आजही सतावते.
पहिलं वर्ष तर त्यांच्यासाठी खूप कठीण होतं. त्यानंतर अचानक परिस्थिती बदलली. माझ्या पत्नीला लॉटरीचं पाच लाखांचं बक्षीस लागलं. काही महिन्यांनी रेल्वेमार्गासाठी आमच्या शेतातली काही जमीन संपादित झाली आणि त्याचाही चांगला मोबदला मिळाला. त्यामुळे कर्ज फिटलं आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही सुधारली. आता ते बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाले आहेत. काळजी मिटली आहे. घरात आनंद आहे. पण त्या आनंदात सहभागी होण्यासाठी मी त्यांच्यासोबत नाही.
मला मनापासून वाटतं की मी संकटाशी लढण्याऐवजी पळवाट शोधली. म्हणूनच आता मी इथे भटकतोय. माझ्यासारखाच एखादा माणूस निराशेच्या गर्तेत सापडला असेल आणि चुकीचं पाऊल उचलण्याच्या विचारात असेल, तर त्याला थांबवावं, त्याला जगण्याची उमेद द्यावी, असं मला वाटतं. कदाचित एखाद्याचं आयुष्य वाचवण्यात मला यश आलं, तर माझ्या मनावरचं हे ओझं हलकं होईल आणि मला मुक्ती मिळेल.”
राजच्या डोळ्यांत पाणी आलं. त्याने आपली सगळी परिस्थिती वरदला सांगितली आणि आत्महत्येच्या विचाराबद्दलही सांगितले…
“मित्रा, कर्ज आहे म्हणून आयुष्य संपवायचं नसतं. कर्ज फेडण्यासाठी पुन्हा उभं राहता येतं; पण गेलेलं आयुष्य परत मिळत नाही. तुझ्या आई-वडिलांचा, पत्नीचा आणि मुलांचा विचार कर. त्यांना पैशांपेक्षा तुझी जास्त गरज आहे. संकट कितीही मोठं असलं तरी त्याला सामोरं जाण्याचा प्रयत्न कर. मदत मागायला लाजू नकोस. एकट्याने लढण्यापेक्षा सगळ्यांना सोबत घे.”
वरदचे शब्द राजच्या मनाला भिडले. त्याने मनाशी ठाम निर्णय घेतला. आता काहीही झालं तरी स्वतःचं आयुष्य संपवायचं नाही. परिस्थितीशी लढायचं आणि नव्याने जगायचं.
दुसऱ्या दिवशी त्याने आई-बाबांना आणि पत्नी नेहाला परिस्थिती समजावून सांगितली. आईने आणि नेहाने स्वखुशीने आपापलं मंगळसूत्र राजच्या स्वाधीन केलं. त्यांच्या डोळ्यांत भीती नव्हती, तर राजवरचा विश्वास होता. संकट कितीही मोठं असलं, तरी आता आपण सगळे मिळून त्याचा सामना करणार आहोत, ही भावना त्या दोघींच्या कृतीतून व्यक्त होत होती.
शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय सुरू करण्याचा त्याने निर्णय घेतला. सावकाराशी बोलून कर्जफेडीचं वेळापत्रक ठरवलं. काही मित्रांनी त्याला आर्थिक मदतीचा हात दिला. त्याने नव्या उमेदीने मेहनत सुरू केली आणि घरातील सर्वांनी त्याला मनापासून साथ दिली.
पावसानेही साथ दिली. शेतीतून चांगलं उत्पन्न मिळालं. दुग्धव्यवसायातूनही नियमित पैसे येऊ लागले. उत्पन्नाचा प्रत्येक रुपया जपून वापरत त्याने कर्जफेड सुरू ठेवली. परिस्थिती हळूहळू सुधारू लागली. अनेक दिवसांनी घरात पुन्हा आनंदाचं वातावरण निर्माण झालं.
हेही वाचा – कालाय तस्मै नमः
काही काळानंतर राज पुन्हा त्या वडाच्या झाडाजवळ गेला. वरदला भेटून त्याला त्याचे आभार मानायचे होते. पण बराच वेळ वाट पाहूनही वरद भेटला नाही. बहुतेक त्याला मुक्ती मिळाली असावी.
दुसऱ्या दिवशी राजने स्मशानासमोरच्या गल्लीत जाऊन एका वृद्ध माणसाकडे चौकशी केली.
“काका, इथे वरदचं घर कुठे आहे?”
“वरद? अरे, त्याला जाऊन तर पाच वर्षं झाली. तो या गल्लीतल्या शेवटच्या घरात राहायचा. कर्जाच्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली होती.”
राजच्या अंगावर काटा आला.
“पण काका, त्याचे आई-वडील, बायको आणि मुलगी… त्यांचं काय झालं?”
“सुरुवातीला खूप हाल झाले; पण आता ते स्थिरस्थावर झाले आहेत. हे सगळं पाहायला वरद असता, तर त्याला किती आनंद झाला असता!” वृद्ध पुढे म्हणाला, “वरदची बायको दोन-तीन महिन्यांपूर्वी मला सांगत होती की, वरद स्वप्नात आला होता. तो कुणाला तरी चुकीचं पाऊल उचलण्यापासून थांबवायचा प्रयत्न करतो आहे.”
राज स्तब्ध झाला. त्याला त्या रात्रीचा प्रसंग आठवला. पांढरा शर्ट, पांढरा लेंगा घातलेला वरद आणि त्याचे शब्द… सगळं काही डोळ्यांसमोर उभं राहिलं.
राजने स्मशानभूमीच्या दिशेने पाहिलं. तेवढ्यात वाऱ्याची एक जोरदार झुळूक आली. झाडाची पानं सळसळू लागली. त्या सळसळीतून अस्पष्ट आवाज ऐकू आला…
“धन्यवाद मित्रा, तू स्वतःचं आयुष्य वाचवून मला मुक्त केलंस!”
राजने हात जोडले आणि तो पुटपुटला, “वरद, तू मला जगण्याची उमेद दिलीस म्हणूनच मी तुला मुक्ती देऊ शकलो!”
कर्जापायी आत्महत्येचा मार्ग निवडला
अमावस्येच्या रात्री आशादीप पेटला
मरता मरता एक जीव वाचला
अन् भटकणारा आत्मा मुक्त झाला…
(कथेचा विषय सुचविल्याबद्दल श्री. गणेश भदाणे, चांदवड यांचे मनःपूर्वक आभार.)


