दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 11 नोव्हेंबर 2026; वार : बुधवार
- भारतीय सौर : 20 कार्तिक शके 1948; तिथि : द्वितीया 15:52; नक्षत्र : अनुराधा 11:37;
- योग : अतिगंड 27:39; करण : तैतिल 28:58;
- सूर्य : तुळ; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:42; सूर्यास्त : 18:01;
- पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2083; युगाब्द : 5128
भाऊबीज
यमद्वितीया
चंद्रदर्शन
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
समाजसुधारक राजारामशास्त्री भागवत
टीम अवांतर
संस्कृत भाषेचे प्राध्यापक,भाषाभ्यास विषयाचे अधिव्याख्याता, समाज सुधारणांमध्ये विश्वास ठेवणारे विचारवंत राजारामशास्त्री भागवत यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1851 रोजी राजापूर तालुक्यातील कशेळी गावी झाला. शिक्षण मुंबईस झाले.
1867 साली मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर त्यांनी तीन वर्षें मेडिकल कॉलेजात घालविली. पण पुढे तो अभ्यासक्रम सोडून संस्कृतचा अभ्यास केला. ते कट्टर सुधारक आणि स्पष्टवक्ते होते. अस्पृश्य जातींच्या उन्नतीविषयी त्यांना मोठी कळकळ वाटे. राजारामशास्त्री भागवत हे एक चांगले अध्यापक होते. त्यांना विद्यार्थ्याबाबत विशेष आदर वाटे.
हेही वाचा – लग्नाळू लेक, पालक आणि सुजाण संवाद
1877 सालीं भागवत यांनी रॉबर्ट मनी स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी पत्करली. पुढे सेंट झेवियर महाविद्यालयामध्ये ‘शास्त्री’ म्हणून नेमणूक झाली. सेंट झेवियरमध्ये कॉलेजात त्यांची बढती होऊन तिथे शेवटपर्यंत ते संस्कृतचे प्राध्यापक होते.
1884 साली ‘बॉंबे हायस्कूल’ नावांची संस्था निघाली, तिच्या संस्थापकांपैकी ते एक होते; याशिवाय 1886 साली त्यांनी ‘मराठा हायस्कूल’ नावाची एक शाळा काढली आणि ती थोड्याच वर्षांत लौकिकाला आणली.
शेवटची पाचसात वर्षे मुंबई विद्यापीठात त्यांची संस्कृतचे परीक्षक म्हणून नेमणूक झाली होती. 1902 साली आचार्य भागवत हे विल्सन भाषाअभ्यास (फॉयलॉलॉजिकल) चेअरचे अधिव्याख्याते (लेक्चरर) होते.
दीनबंधू या सत्यशोधक समाजाच्या मुखपत्रात जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी अनेक लेख लिहिले, जे त्या काळातील विचारसरणीला मोठी चपराक देणारे होते. त्यानंतर त्यांनी लोकहितवादींच्या धारदार शतपत्रांत भर घातली. जोतीराव फुले आणि राजारामशास्त्री यांच्या काही प्रतिपादनांमध्ये तसेच कृतींमध्ये साम्य आढळते.
स्त्रियांची सुधारणा आणि सुशिक्षण यासंबंधानेही शास्त्रीबुवांनी प्रयत्न केले. संस्कृतचे विद्वान असूनही त्यांना मराठी बोलीभाषेचा विलक्षण अभिमान होता. अशा या प्रख्यात विद्वानाचे 4 जानेवारी 1908 रोजी निधन झाले.
भाषाशास्त्र, समाजशास्त्र, धर्मशास्त्र व्युत्पत्ती, इतिहास संशोधन, वेद-पुराणांची चिकित्सा यांसारख्या बहुविध ज्ञानक्षेत्रांमध्ये लीलया विहार केलेल्या आणि आपल्या लेखणी तसेच वाणीने महाराष्ट्रीय संस्कृतीचे सार मांडलेल्या राजारामशास्त्री भागवत यांच्या निवडक लेखनाचे सहा खंड लेखिका दुर्गा भागवत यांनी नंतर संपादित करून 1981 साली प्रकाशित केले होते. 2016 साली ते खंड नव्याने प्रकाशित करण्यात आले. राजारामशास्त्री भागवत यांच्याशीही दुर्गाबाईंचे कौटुंबिक नात्यापेक्षाही द्दढ आणि जवळचे असे वैचारिक नाते होते आणि त्यातूनच विद्याव्रती राजारामशास्त्र्यांचे चरित्र आणि त्यांच्या साहित्याचे संपादनकार्य संपन्न झाले.
आजचे राशिभविष्य
मेष – आज नोकरदारांना प्रगतीच्या तर व्यावसायिकांना नफ्याच्या नवीन संधी मिळतील. तुमची बुद्धिमत्ता आणि कार्यक्षमता यामुळे तुम्ही कामाच्या ठिकाणी इतरांपेक्षा पुढे जाल. वरिष्ठांकडून आदर आणि प्रशंसा मिळेल. सुरक्षित भविष्यासाठी आतापासूनच अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असेल. व्यावसायिकांना एक महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर करार मिळेल. तुमच्या वैवाहिक जीवनात समन्वय राखा कारण क्षुल्लक बाबींवरून वाद होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यांकडे तुमचा कल वाढेल. संध्याकाळ कुटुंबासोबत मौजमजेत आणि आनंदात घालवाल.
वृषभ – आजचा दिवस मध्यम फल देणारा असेल. भावनेच्या भरात घाईघाईने निर्णय घेणे टाळा, कारण चुकीच्या निर्णयामुळे नंतर पश्चात्ताप होऊ शकतो. वैवाहिक जीवनात काही विषयांवर मतभेद शक्य असले तरी, परस्पर प्रेम आणि सलोखा टिकून राहील. विवाह ठरलेल्यांना होणारा जोडीदार आणि कुटुंबासोबत अविस्मरणीय आणि आनंदी क्षण घालवण्याची संधी मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर पुढे जाऊ शकता.
मिथुन – आजचा दिवस व्यस्त आणि धावपळीचा आहे. महिलांचा बराचसा वेळ संततीच्या शिक्षण आणि त्यांच्या करिअर बाबतच्या चर्चांमध्ये जाईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना एखाद्या कंपनीकडून सकारात्मक बातमी मिळू शकते. व्यवसायात कोणतीही नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी, अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. अचानक मिळालेल्या लाभामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल. ऑफिसमधील कामात हलगर्जीपणा टाळा, अन्यथा वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. भाऊबीजेनिमित्ताने घरी नातेवाईकांचे आगमन होईल. त्यांच्यासोबत बाहेर जेवायला जाण्याचा बेत आखाल.
कर्क – आजचा दिवस यशाने भरलेला असेल. व्यावसायिकांनी कोणत्याही व्यवहारात अत्यंत सावधगिरी बाळगावी. दीर्घकाळापासून चाललेला एखादा कौटुंबिक वाद आज संपुष्टात येण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील. चैनीच्या वस्तू, नवीन कपडे किंवा एखाद्या गॅझेटवर पैसे खर्च होऊ शकतात. संततीच्या महत्त्वपूर्ण यशामुळे कुटुंबाची प्रतिष्ठा वाढेल. भाऊबीजेनिमित्ताने बायकोच्या माहेरी जाण्याचा योग येईल.
सिंह – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि सकारात्मक असेल. तुमच्या नियोजित कामांमध्ये मिळणाऱ्या यशामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. एखादा शुभ किंवा धार्मिक सोहळा कुटुंबात सुखद वातावरण निर्माण करेल. कुटुंबाकडून मिळणाऱ्या अपेक्षित पाठिंब्यामुळे तुमचे नातेसंबंध अधिक दृढ होतील. आज एखाद्या गरजूला मदत करण्याची संधी मिळू शकते. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुकूल संधी निर्माण होतील. तुम्ही परदेशी कंपन्यांमध्ये काम करत असाल किंवा आयात-निर्यात व्यवसायात गुंतलेले असाल, तर तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल.
कन्या – कुटुंबात नवीन आनंद आणि उत्साह घेऊन येणारा आजचा दिवस असेल. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा जास्त आर्थिक फायदा होईल, ज्यामुळे आनंद द्विगुणित होईल. जे जातक नोकरीसाठी प्रयत्नशील आहेत, त्यांना एक उत्तम संधी मिळू शकते. तुमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे प्रलंबित प्रकल्प लवकर पूर्ण होतील. जमीन, घर किंवा इतर स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमची ही इच्छा आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. भाऊबीजेच्या निमित्ताने आवडीच्या, स्वादिष्ट अशा पारंपरिक जेवणाचा आनंद घेण्याची संधी मिळेल.
तुळ – तुमच्या कौटुंबिक जीवनात आजचा दिवस सुख आणि शांती घेऊन येणारा असेल. कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. आर्थिक व्यवहारांमध्ये कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका; यामुळे आर्थिक नुकसान किंवा विश्वासघात होऊ शकतो. वाहन चालवताना वेग नियंत्रित ठेवा आणि सावधगिरी बाळगा. अचानक झालेल्या आर्थिक लाभाने तुमच्या चेहऱ्यावर हास्य येईल. एखाद्या नातेवाईकासोबत जुन्या विषयावरून विनाकारण वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शांत रहा आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक – आजचा दिवस सर्वसाधारण असेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी त्यांच्या कठोर परिश्रमाने, उत्कृष्ट निकाल मिळवतील. धार्मिक आणि दानधर्माच्या कार्याकडे तुमचा कल अधिक असेल, ज्यामुळे तुम्हाला मनःशांती मिळेल. आज जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळेल, ज्यामुळे अनेक कौटुंबिक समस्या सोडवणे सोपे होईल. संततीच्या संदर्भात एखादी चांगली बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी एखाद्या योजनेबद्दल तुम्ही गोंधळून गेला असाल, तर वरिष्ठ सहकारी किंवा अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन घेणे फायदेशीर ठरेल.
हेही वाचा – भाऊबीज
धनु – आजचा दिवस आनंद आणि उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी एखादा नवीन प्रकल्प किंवा पद तुमच्यावर सोपवले जाऊ शकते, मात्र तुमच्या प्रगतीमुळे काही सहकाऱ्यांमध्ये मत्सर निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सहकाऱ्यांशी वागताना जरा सांभाळून रहा. व्यावसायिकांना अपेक्षेपेक्षा जास्त आर्थिक लाभ होईल, त्यांच्या व्यावसायिक योजनांना गती मिळेल. पूर्वी कोणाला पैसे उधार दिले असतील, तर ते तुम्हाला परत मिळू शकतात. वडिलांच्या पाठिंब्यामुळे विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे.
मकर – घरगुती आणि सामाजिक कामे हातावेगळी करण्यात आजचा दिवस जाईल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली घरगुती कामे पूर्ण करण्यात व्यस्त असाल. एखादा नवीन प्रकल्प किंवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस उत्तम आहे. आरोग्याची काळजी घ्या; खाण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष केल्यास पोटदुखी किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो. अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधल्याने आर्थिक परिस्थिती मजबूत होईल.
कुंभ – आजचा दिवस संमिश्र असेल. कोणत्याही अप्रिय परिस्थितीत किंवा वादात आपल्या रागावर आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा, अन्यथा परिस्थिती चिघळू शकते. कठीण परिस्थितीत संयम बाळगणे शहाणपणाचे ठरेल. सासरच्या मंडळींकडून काही आर्थिक लाभ किंवा मदत मिळण्याची दाट शक्यता आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून प्रेम आणि भावनिक आधार मिळेल. राजकारणात असलेल्यांना आपला प्रभाव वाढवण्याची संधी मिळेल.
मीन – आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या खूप फायदेशीर ठरेल. वडिलोपार्जित मालमत्ता किंवा वारसा हक्काशी संबंधित जुने वाद मिटण्याची शक्यता आहे आणि निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतो. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांवर आंधळा विश्वास ठेवणे टाळा, कारण तुमची फसवणूक होऊ शकते. लहान व्यवसाय आणि दुकानदारांना अपेक्षित विक्रीतून आर्थिक समाधान मिळेल. वैवाहिक जीवन रोमांचक राहील. जोडीदारासोबत एका अत्यंत महत्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा कराल.


