“बाब्याSSS!! लक्ष कुठे आहे तुझे? तो तीन नंबर टेबलवाला कधीपासून पाणी मागतोय… दे त्याला लवकर…” काऊंटरवर बसलेला मालक त्याच्यावर खेकसला तेव्हा तो भानावर आला.
‘तृप्ती’ हॉटेलमध्ये नेहमीप्रमाणे गर्दी होती. त्यात आजचा दिवाळी सण… खरेदी करायला आलेले बरेचसे लोक त्या हॉटेलातच घुसत होते. त्याचे मात्र आज कामात लक्ष नव्हतेच… तसेही कामात चूका घडल्या तरी, फारसा फरक पडत नव्हता. बोलूनचालून टेबलवर फडके मारणार पोऱ्या तो…
पण आज त्याला राहून राहून तिची आठवण येत होती. कधी नव्हे, तर तिने यावेळी त्याच्याकडे काहीतरी मागितले होते…
“दादा, घरात बसून बसून कंटाळा येतो रे… छोटासा मोबाइल आण ना… गेम खेळायला! नाहीतरी बाहेर जायला मिळतच नाही आपल्याला…”
तिची मागणी ऐकून तो मनातून हलला… काय चुकीचे होते तिचे? जन्मतः पायात काहीतरी प्रॉब्लेम झाला तेव्हापासून लंगडत चालते. जास्त चालले की, त्रास होतो म्हणून इतरवेळी घरातच बसून असते. शाळेत जाणे हेच तिचे बाहेर पडणे… हा हॉटेलमध्ये कामाला… कधी सुट्टी नाहीच… इतर दिवशी वेळेत घरी यायचा, पण सण आले की, याचे काम वाढले… त्यात टीप जास्त मिळायची म्हणून सुट्टी न घेता काम करायचा.
हेही वाचा – पुण्यकर्म
आई-वडील लवकरच गेले, तेव्हापासून बहिणीची जबाबदारी याच्यावरच. रोजचा खर्च निघताना मुश्किल तर मोबाइल कुठून घेणार आणि गरजच काय? तरीही त्याने मित्रांजवळ मोबाइलची चौकशी केली आणि परवडणार नाही म्हणून गप्प बसला. आतापासून पैसे बाजूला काढले, तर पुढच्या दिवाळीत नक्की घेऊ, असा विचार करून तो कामात गुंतून गेला.
पण काही म्हणा… बहिणीवर जीवापाड प्रेम होते. हॉटेलमध्ये काही उरले की, स्वतः न खाता बहिणीसाठी बाजूला काढून ठेवायचा. सहकारी वेटर त्याची टर उडवायचे… हा हसून सहन करायचा. पण काल अचानक तिने अशी मागणी केली आणि तो विचारात पडला…
मालकालाही समजले याचे लक्ष नाही. त्याने पुन्हा त्याला बोलावले आणि सहा नंबर टेबलवर पाठविले. तिथे दोन तरुण बसले होते. याने पाणी ठेवताच त्यांनी दोन चहाची ऑर्डर दिली. नुकतीच खरेदी केलेली दोन-तीन पॅकेट्स त्यांच्याजवळ दिसत होती.
“लवकर आण मित्रा, आम्हाला निघायचे आहे…”
याने मान डोलावली आणि ताबडतोब दोन चहा घेऊन आला. त्यांनी ताबडतोब बिलही दिले आणि ‘बाकी ठेव’ असे बोलून उठले आणि घाईघाईने बाहेरही पडले. हा त्यांचे कप उचलायला गेला तेव्हा त्या टेबलवर एक बॉक्स राहिल्याचे लक्षात आले. आजूबाजूला पाहून त्याने तो बॉक्स उचलला. त्या बॉक्समध्ये नवीन मोबाइल आहे, हे त्याच्या लक्षात आले.
काय करावे?
बहिणीचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला. हा मोबाइल तिला दिला तर, किती खूश होईल. पण दुसरे मन ऐकेना… काही न बोलता तो काऊंटरवर गेला आणि बॉक्स मालकाच्या हाती दिला.
“सहा नंबर टेबलवर कोणीतरी विसरून गेलाय…”
हेही वाचा – गोष्ट दोन प्रवाशांची…
मालकाने काही न बोलता तो बॉक्स ठेवून घेतला थोड्या वेळाने ते दोघे घाईघाईने पुन्हा हॉटेलमध्ये शिरले आणि मालकाशी बोलू लागले.
“बाब्याSS!” मालकाने आवाज देऊन त्याला बोलावले.
“हेच का ते?”
त्याने होकारार्थी मान डोलावली. तसे मालकाने बॉक्स त्यांच्या हाती दिला. बॉक्स पाहाताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.
“आहो… यावर्षी बहिणीने मोबाइल मागितला. दहावी पास झाली ना ती! म्हणून कर्ज काढून हा नवीन मोबाइल घेतला आणि इथेच विसरून गेलो. नशीब सापडला नाहीतर नुकसान झाले असते हो… खूप खूप आभार तुमचे…” असे बोलून त्याने शंभर रुपये पुढे केले. त्याने मान डोकावून घेण्यास नकार दिला. मालकही ‘नको’ म्हणाला.
दिवाळीच्या शुभेच्छा देऊन ते दोघे निघून गेले.
“चला निघा….”
मालक त्याच्यावर खेकसला. रात्री घरी निघताना मालकाने त्याला जवळ बोलावले. हातात मिठाईचा बॉक्स दिला आणि ड्रॉवरमधून आपला जुना मोबाइल काढून त्याच्या हातात दिला…
“जा बहिणीला दे… चार नवीन गेम टाकलेत त्यात… खूश होईल ती. तिला गेम खेळायला मोबाइल हवाय ते कळले होते मला. अरे, तुम्ही माझी माणसे आहात… आज तुझा प्रामाणिकपणा पाहिला आणि त्याचेच हे बक्षीस समज… शुभ दीपावली!”
त्याने तो मोबाइल घेतला. घरी लवकर जाण्यातही किती आनंद असतो, ते आज कळले त्याला.


