अध्याय पंधरावा
एऱ्हवीं दानशीळु पुरुषु । वेंचकपणेंचि संचकु । तैसा व्ययेंचि हा रुखु । अव्ययो गमे ॥122॥ जातां वेगें बहुवसें । न वचे कां भूमीं रुतलें असे । रथाचें चक्र दिसे। जियापरी ॥123॥ तैसें काळातिक्रमें जे वाळे । ते भूतशाखा जेथ गळे। तेथ कोडीवरी उमाळे । उठती आणिक ॥124॥ परी येकी केधवां गेली। शाखाकोडी केधवां जाली । हें नेणवे जेवीं उमललीं । आषाढअभ्रें ॥125॥ महाकल्पाचां शेवटीं । उदेलिया उमळती सृष्टी । तैसेंचि आणिखीचें दांग उठी । सासिन्नलें ॥126॥ संहारवातें प्रचंडें । पडती प्रळयांतींचीं सालडें । तंव कल्पादीचीं जुंबाडें । पाल्हेजती ॥127॥ रिगे मन्वंतर मनूपुढें । वंशावरी वंशांचे मांडे । जैसी इक्षुवृद्धी कांडेंनकांडें । जिंके जेवीं ॥128॥ कलियुगांतीं कोरडीं । चहुं युगांची सालें सांडी । तंव कृतयुगाची पेली देव्हडी । पडे पुढती ॥129॥ वर्ततें वर्ष जाये । तें पुढिला मुळहारी होये । जैसा दिवसु जात कीं येत आहे । हें चोजवेना ॥130॥ जैशा वारियाचां झुळकां । सांदा ठाउवा नव्हे देखा । तैसिया उठती पडती शाखा । नेणों किती ॥131॥ एकी देहाची डिरी तुटे । तंव देहांकुरीं बहुवी फुटे । ऐसेनि भवतरु हा वाटे । अव्ययो ऐसा ॥132॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : आतां याचा हाचि विस्तारु, हाचि यया पैसारु
अर्थ
एरवी जसा दान करणारा पुरुष दानधर्मात खर्च करतो असे जरी दिसले तरी, तो खर्च करीत नसून, त्या खर्चाच्या रूपानेच द्रव्यसंचय करतो, तसा हा संसारवृक्ष नाश पावत असताही अविनाश असा भासतो. ॥122॥ अथवा रथाचे चाक अति वेगाने फिरत असतांना, ते फिरते असे न दिसता, जमिनीत रोवलेले आहे, असे ज्याप्रमाणे दिसते ॥123॥ त्याप्रमाणे कालाच्या अतिशय गतीने, या संसारवृक्षाची जी प्राणीरूपी फांदी वाळते व त्या योगाने, त्या ठिकाणी गळून पडते, त्या ठिकाणी आणखी कोट्यावधी अंकुर या संसारवृक्षास फुटतात. ॥124॥ ज्याप्रमाणे आषाढ महिन्यातील उत्पन्न झालेल्या ढगात, एक ढग नाहीसा झाला केव्हा व त्या ठिकाणी दुसरे अनेक ढग आले केव्हा हे जसे कळत नाही, त्याप्रमाणे या संसारवृक्षाची एक फांदी केव्हा नाश पावली व त्या ठिकाणी कोट्यावधी (शरीररूपी) शाखा केव्हा उत्पन झाल्या, हे कळत नाही. ॥125॥ उत्पन्न झालेली चतुर्दश भुवने, कल्प संपण्याच्या वेळी उन्मळून पडतात व पुन्हा कल्प सुरू झाला म्हणजे भरास आलेले तितकेच जगताचे अनेक समुदाय तयार होतात. ॥126॥ संहारकारक प्रचंड वार्याने महाप्रलयकाळाच्या अखेरीची जीर्ण झालेली (संसारवृक्षाची) साल वगैरे गळून जाते न जाते तोच कल्पाच्या आरंभास (ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभास) सृष्टीचे समुदायच समुदाय उत्पन्न होतात. ॥127॥ कांड्यामागून कांडे उत्पन्न होऊन जसा ऊस वाढत जातो, त्याप्रमाणे एका मनूच्या काळापुढे दुसर्या मनूचा काळ येऊन, एका वंशामागून दुसरा वंश, असा वंशवृद्धीचा विस्तार होतो. ॥128॥ कलियुगाच्या अखेरीस चार युगांची जीर्ण झालेली सालपटे वगैरे गळून पडतात न पडतात इतक्यात कृतयुगाची पहिली अशी मोठी साल उत्पन्न होण्यास लागते. ॥129॥ चालू जे वर्ष जाते ते पुढच्या वर्षास मूळ (बोलावणे) होते. ज्याप्रमाणे दिवस जातो की येतो ते कळत नाही. ॥130॥ ज्याप्रमाणे वार्याच्या झुळुकांमागून झुळुका वाहत असल्यामुळे त्यांचा जोड कोठे आहे ते कळत नाही, त्याप्रमाणे या संसारवृक्षाच्या उत्पन्न होणार्या व नाश पावणार्या फांद्यांचा आदि व अंत न समजल्याने त्या किती आहेत, हे कळत नाही. ॥131॥ या संसारवृक्षाचा शरीररूपी एक शेंडा गळून पडतो, तो अनेक देहरूपी अंकुर त्याला (संसारवृक्षाला) फुटतात, अशातर्हेने हा संसारवृक्ष अव्यय, (अविनाश) आहे असा वाटतो. ॥132॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : एऱ्हवीं पिंपळु म्हणतां विखीं, मियां गति देखिली असे निकी


