मनीषा गोगटे
साटोरीमध्ये दोन भाग असतात, एक असते पारी (वरचे कव्हर) आणि दुसरे असते सारण.
पारीसाठी साहित्य
- मैदा – 2 वाट्या
- एकदम बारीक रवा – 1 वाटी
- साजूक तूप अथवा तेल – दोन ते अडीच टेबलस्पून
- मीठ – चवीनुसार
- दूध – पारी किंवा कणीक भिजण्यासाठी
सारणासाठी साहित्य
- खवा – 200 ग्रॅम
- एकदम बारीक रवा – 100 ग्रॅम
- पिठीसाखर –दीड ते पावणेदोन वाटी (आवडीनुसार / हवं तेवढ्या गोडीनुसार)
- भाजलेली खसखस – 2 ते अडीच टेबलस्पून
- वेलची पावडर – एक टीस्पून
- साजूक तूप – 2 टेबलस्पून
- साटोरी भाजायला किंवा तळण्यासाठी तूप
पुरवठा संख्या : 20 ते 22 नग
हेही वाचा – Recipe : हरतालिका विशेष ‘निनाव’… अन् बाप्पासाठी रोझ मोदक
तयारीस लागणारा वेळ
- पारीची कणीक भिजवून मुरण्यासाठी 2 तास
- खवा किसून घेण्यासाठी – 5 मिनिटे
- खवा भाजण्यासाठी – 7 ते 8 मिनिटे
- खसखस भाजण्यासाठी – 5 मिनिटे
शिजवण्याचा वेळ : साटोरी भाजण्यासाठी किंवा तळण्यासाठी – 7 ते 8 मिनिटे
एकूण वेळ : साधारणपणे 2 तास 30 मिनिटे
कृती
पारी
- परातीत किंवा एखाद्या बाऊलमध्ये पारीसाठी लागणारा मैदा, रवा आणि चवीनुसार मीठ घालून एकत्र करून घ्या.
- साधारणपणे 2 ते अडीच टेबलस्पून साजूक तूप किंवा तेल गरम करून मग रवा, मैद्यावर थोडंथोडं घालत चमच्याने सगळीकडे लागेल अशाप्रकारे एकत्र करत जा. तूप किंवा तेल थोडंसं गार झालं की, ते रवा, मैद्याला छानपैकी चोळून घ्या. मिश्रणाचा हाताने गोळा किंवा मुटका झाला याचा अर्थ तूप किंवा तेलाचे मोहन बरोबर आहे.
- नंतर या मिश्रणात दूध घालून ती सैलसर भिजवून छानपैकी मळून घ्या. आता पारीची कणीक थोडी सैलसरच ठेवा. यात असलेला रवा मुरला की फुलतो आणि कणीक घट्ट होते.
- मळून झालेली कणीक दोन तास झाकून बाजूला ठेवून द्या.
साटोरीचे सारण
- एका जाड बुडाच्या कढईत खसखस खमंग होईपर्यंत भाजून घ्या. खसखस लगेच करपण्याची शक्यता असते. त्यामुळे सतत ढवळत ती रंग बदलेपर्यंत भाजून घ्या. साधारणपणे 5 मिनिटांमध्ये खसखस भाजली जाते. ती गार करायला ठेवा.
- नंतर त्याच कढईत अर्धा ते पाऊण टेबलस्पून साजूक तूप पातळ करून घ्या. मग त्यावर किसून घेतलेला खवा खमंग आणि गुलबट रंगाचा होईपर्यंत भाजून घ्या. नंतर एका डिशमध्ये गार करायला ठेवा.
- परत त्याच कढईत 1 ते दीड टेबलस्पून साजूक तूप घाला. तूप गरम झाले की त्यावर बारीक रवा घाला. हा रवा देखील खमंग गुलाबी रंग येईपर्यंत भाजा. भाजलेला रवा गार करायला ठेवा.
- खसखस गार झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घ्या.
- खवा गार झाल्यावर हाताने मोकळा करून त्यात बारीक केलेली खसखस, भाजलेला रवा, वेलची पावडर आणि पिठीसाखर घालून हाताने सगळं सारण एकजीव करून घ्या. सारण जर कोरडं वाटलं तर त्यात थोडं साजूक तूप किंवा दूध घाला.
- या सारणाचे लिंबाएवढे लहान गोळे करा. एवढ्या सामग्रीत सारणाचे साधारणपणे 15 ते 16 गोळे होतील.
- दोन तासांनी पारीसाठी भिजवून ठेवलेली कणीक एकदा मिक्सर किंवा फूड प्रोसेसरमधून फिरवून घ्या. (पारंपरिकरित्या हा गोळा बत्त्याने कुटून घेतात.) मिक्सरमधून फिरवून घेतलेली कणीक परत एकदा छानपैकी मळून घ्या. मग मध्यम आकाराच्या लाट्या (गोळे) करून घ्या.
- या लाट्यांपैकी एक लाटी मैदा किंवा तांदळाच्या पिठीवर पुरीएवढ्या आकारात लाटून घ्या. मग त्यात सारणाचा एक गोळा ठेवून मोदकाप्रमाणे सगळीकडून लाटी बंद करून घ्या.
- सारण भरलेला गोळा परत एकदा मैदा किंवा तांदळाच्या पिठीवर लाटून घ्या. शेगाव कचोरी एवढ्या आकाराची आणि जरा मोठ्या जाडीएवढा त्याचा आकार ठेवा.
- अशा सगळ्या साटोऱ्या तयार करून गरम तव्यावर थोडेसे तूप घालून थोड्याशा भाजून घ्या.
- तुपावर भाजून घेतलेल्या साटोऱ्या गार झाल्या की मंद आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्या.
विशेष आहार माहिती : शाकाहारी
हेही वाचा – Recipe : नारळाच्या रसातील अळूवडी
टीप
- पारीसाठी कणीक भिजवून झाल्यावर ती चांगली मळून घ्या. यामुळे पारी छान खुसखुशीत होते.
- पारंपरिक पद्धतीने साटोरी ही तळूनच केली जाते. मात्र तळलेली साटोरी नको असेल तर साजूक तूपावर दोन्ही बाजूने
- खरपूस भाजून घ्यावे. किंवा एअर फ्रायरमध्ये बेक करावी. अर्थात तळलेली साटोरी अधिक खमंग लागते.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह त्या प्रसिद्ध केल्या जातील.