Saturday, August 2, 2025

banner 468x60

Homeअवांतरकात्रज ते सिंहगड...

कात्रज ते सिंहगड…

चंद्रशेखर माधव

साधारण 2001-2002मधील घटना असावी. आम्ही मित्रांनी कात्रज ते सिंहगड असा पौर्णिमेच्या रात्री ट्रेक करायचा ठरवलं. सुमारे आठ ते दहा लोक तयार झाले. आधी एकदा या मार्गावर येऊन गेलेला प्रशांत नावाचा आमचा मित्रही त्यामध्ये होता. रात्री आठच्या सुमारास कात्रज घाटाच्या वरच्या टेकडीवरून चालायला सुरुवात केली. साहजिकच प्रशांत पुढे झाला आणि त्याच्या मागोमाग एका ओळीत सर्वजण जाऊ लागले. आम्हा तरुणांबरोबर एक प्रौढ व्यक्ती होती. ते आमच्यापैकी एकाच्या ऑफिसमधील सहकारी होते आणि त्या ओळखीतून आमच्याबरोबर आले होते. ते सुरवातीपासूनच सतत सुपारी खात होते. आमच्यातील 2-3 जणांनी चालताना सुपारी न खाण्याबद्दल समजावण्याचा प्रयत्न केला; पण ते काही केल्या ऐकेनात. आम्ही त्यांचा नाद सोडून दिला अन् चालायला सुरुवात केली. एक तासभर चालल्यानंतर त्या व्यक्तीला दम लागतो आहे अन् सारखं थांबावं लागतं आहे, असं लक्षात आलं. हे होणारच होतं. अजून 10-15 मिनिटं चालण्याचा प्रयत्न केल्यावर त्या व्यक्तीने माघारी जाण्याचा निर्णय घेतला.

“मला वाटतं नाही, मी इतकं अंतर चालू शकेन. तुम्हाला उगाच त्रास नको. मी माघारी जातो,” असं त्यांनी सांगताच आम्ही लगेच त्याला होकार दिला. परत जाण्यापूर्वी, त्या व्यक्तीने सोबत आणलेले सर्व खाद्यपदार्थ आम्हाला दिले. त्यांचा निरोप घेऊन आम्ही पुढे निघालो. रात्रीचे साधारण 10 वाजले होते. या सर्व प्रकरणात उशीर झालेला असल्यामुळे आम्ही चालण्याचा वेग वाढवला. सुमारे दोन-अडीच तास आम्ही न थांबता बरंच अंतर कापलं.

नक्की आठवत नाही, पण साधारणपणे रात्री एक ते दीडच्या सुमाराची वेळ असेल. एके ठिकाणी प्रचंड झाडीच्या गर्तेत आणि काट्याकुट्यात आम्ही येऊन उभे राहिलो आणि असं लक्षात आलं की, आपण वाट चुकलेलो आहोत. जरी पौर्णिमा होती तरी प्रकाश बेताचाच होता.

हेही वाचा – कोराईगडचा ट्रेक

प्रशांत म्हणाला, “शेखर, वाट चुकलो बहुतेक! आता काय करायचं?” मी विचारलं, “पण आपल्याला जायचंय कुठे?” त्याने समोरच्या टेकडीकडे बोट दाखवलं. टेकडीवर एक झाड होतं. त्या झाडाकडे बोट दाखवून म्हणाला “तिथे जायचंय आपल्याला. तिथून पुढची वाट आपल्याला नक्की सापडेल.”

मी त्याला म्हणालो, “अरे, मग त्यात काय! काढ तो चाकू आणि कापायला सुरुवात कर ते काटे. आपण असेच सरळ त्यावरच्या टेकडीवरच्या झाडापर्यंत जाऊन पोहोचू.”

माझं हे वाक्य ऐकताच त्यालाही स्फुरण चढलं. आम्ही दोघेही पुढे झालो. तोपर्यंत मागून येणारे लोक आमच्याजवळ येऊन पोहोचले होते. ते थोडे मागे असल्यामुळे आमच्यातला संवाद त्यांनी नीटसा ऐकला नव्हता. त्यामुळे वाट चुकलो आहे, याची त्यांना कल्पना नव्हती. आम्ही आपापले चाकू काढून काटेरी झुडपं कापायला सुरुवात केली. असंच घायपात अन् काटेरी झुडपे कापत कापत आम्ही सुमारे 10-15 मिनिटांनी त्या डोंगरावरच्या झाडापाशी पोहोचलो. गेल्या गेल्या डाव्याबाजूने येणारी पायवाट सापडली.

क्षणभरच आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहून स्मितहास्य केलं आणि इतर कोणाला काही कळायच्या आत पायवाट पकडून पुढच्या मार्गाला रवाना झालो.

नंतरच्या आयुष्यात हा अनुभव खूप कामाला आला. जिथे जिथे अडचणी आल्या तिथे तिथे नवा मार्ग शोधून त्यातून बाहेर पडलो.

हेही वाचा – परतवून लावलेला दरोडा

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!