चंद्रशेखर माधव
लोणावळ्यापासून सुमारे आठ ते दहा किलोमीटर अंतरावर कोराईगड नावाचा एक किल्ला आहे. सुमारे 27-28 वर्षांपूर्वीची गोष्ट. मी आणि माझा मित्र नारायण कोराईगडला ट्रेकला जायचं ठरवलं. आम्ही शनिवारी तीनच्या लोकलने लोणावळ्याला जाऊन पोहोचलो आणि तिथे थोडसं खाऊन वगैरे चालायला सुरुवात केली. आम्ही पूर्ण रात्रभर चालून पहाटेच्या वेळी गडावर पोहोचणार होतो. साधारणपणे संध्याकाळी सात-साडेसात वाजता आम्ही चालायला सुरुवात केली. वाट माहीतच होती. रात्री एकच्या सुमारास आम्ही ज्या वाटेने चालत होतो, त्या वाटेच्याच कडेला एक चांगली अशी जागा बघून आम्ही जो डबा नेला होता, तो खाऊन जेवण वगैरे उरकून घेतलं.
थोडा वेळ विश्रांती घेऊन दोन अडीचच्या सुमारास पुन्हा चालायला सुरुवात केली. सुमारे पाच किलोमीटर अंतर उरलं होतं. कोराईगडच्या पायथ्याला जे गाव आहे, त्या गावात साधारणपणे पहाटे पाचच्या आसपास पोहोचायचा आमचा मानस होता. पहाटे चारच्या सुमारास लांबचे दिवे वगैरे बघून आम्हाला हा अंदाज आला की आम्ही गावाच्या जवळ पोहोचलो आहे. परंतु गावातून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. आम्ही दोघेच होतो आणि वयानेही लहान होतो. आमचं वय त्यावेळी सुमारे 20-21 होतं. त्यामुळे आमचा असा निर्णय झाला की, उजाडेपर्यंत गावाच्या अलीकडेच एक झोपडी होती त्या ठिकाणी थांबायचं आणि उजाडलं की गावात प्रवेश करायचा. गावात एक परिचित व्यक्तीचे घर होतं, तिथे आम्हाला जायचं होतं. आम्ही जिथे थांबलो होतो, त्या झोपडीत आम्ही बसून परत एकदा थोडंसं खाऊन घेतलं. थोडसं खाल्ल्यानंतर अजून वेळ आहे तर, आजूबाजूच्या परिसरात फिरू म्हणून जिथे बसलो होतो तिथेच बॅगा ठेवल्या आणि थोडं फिरायला गेलो. साधारण दोनशे ते अडीचशे मीटर अंतरावर एक ओढा वाहत होता. आम्ही ओढ्यावरील पुलावरून थोडेसे पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर थोडा आजूबाजूचा परिसर पाहिल्यावर परत माघारी फिरायचं ठरवलं.
हेही वाचा – माऊलीची चिक्की
माघारी परत येताना जेव्हा आम्ही त्याच ओढ्यापाशी आलो तेव्हा ओढ्याच्या परिसरातून आम्हाला रानडुकराच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. आमची पुढे जायची हिंमत होईना. आता आमची पूर्णपणे कोंडी झालेली होती. ओढ्याच्या पलीकडे आम्ही मधे ओढा वाहतोय आणि ओढ्याच्या पलीकडच्या झोपडीमध्ये आमच्या बॅगा. त्या बॅगांमध्ये आमच्याकडे काठ्या, बॅटऱ्या सर्व साहित्य होतं. पण आम्हाला त्याचा काहीही उपयोग नव्हता. आम्ही होतो तिथेच स्तब्धपणे उभे राहिलो. याच स्तब्धतेत किती वेळ गेला हे माहीत नाही. पण निश्चितच 40 ते 45 मिनिटे गेली असावी. जवळच एक बंगला होता, त्या घराबाहेरील दिवा अचानक पेटला आणि मुख्य दरवाजा उघडला. जसा मुख्य दरवाजा उघडलेला दिसला तसा नारायण त्या घराकडे धावला. घराच्या पायऱ्यांवरून खाकी पैंट घातलेला एक मनुष्य बाहेर आला. तो बाहेर आल्यावर आमच्या लक्षात आलं की, हा एक तर पोलीस तरी असावा किंवा वनविभागाचा कर्मचारी असावा.
नारायण त्याच्याकडे गेला आणि त्याला पूर्ण कहाणी कथन केली. अचानक तो मनुष्य “आलोच, मी माझी रायफल घेऊन येतो.” असं म्हणाला. त्याच्या या बोलण्यानं आम्हाला धीर आला.
त्या माणसाने आत जाऊन एक मोठी रायफल आणि दोन मोठे टॉर्च आणले. टॉर्च आणल्यानंतर एक टॉर्च माझ्या आणि एक नारायणच्या हातात दिला आणि म्हणाला “चला दाखवा मला ते ठिकाण…” आम्ही त्याच्या मागे मागे त्या ठिकाणाकडे गेलो ओढ्याच्या काठाशी आल्यानंतर तिथे जो छोटा पूल होता त्या पुलाच्या कठड्यापाशी उभा राहून “इथे आहे का? मला बघू दे” असं म्हणाला. आम्ही टॉर्च मारले. कुठेही डुकराचा मागमूस नव्हता. पण आवाज मात्र येत होता. त्यानंतर त्याने पाण्याकडे आपली नजर वळवली आणि म्हणाला “जरा पाण्यात बॅटरी मारा.”
हेही वाचा – ब्लेझर आणि 45 दिवस
पाण्यात बॅटरी मारल्यानंतर काय आश्चर्य. साधारणपणे पंधरा ते वीस सेंटिमीटर रुंद आणि तितक्याच लांबीचा एक मोठा बेडूक ओढ्याच्या पाण्यात बसला होता. रानडुक्कर नव्हे तर, तो बेडूक जोरजोरात ओरडत होता. ओढ्याच्या पात्रात त्या बेडकाचा आवाज घुमत होता. त्या आवाजाला रानडुकराचा आवाज समजून आम्ही सुमारे एक तास घाबरून एकाच जागी उभे होतो. हे सगळं लक्षात आल्यावर आम्ही दोघेही क्षणभर ओशाळलो आणि नंतर आमची हसता हसता पुरेवाट झाली.
या सर्व प्रसंगावरून एक मात्र धडा मिळाला की, समोर आलेल्या अडचणीला तोंड द्यायचं घाबरून माघार घ्यायची नाही…