केतकीचं लग्न आमच्या जयंताने थाटामाटात करून दिलं. तिचं कन्यादान मात्र जयंताच्या हट्टाखातर मी आणि सुजाताने केले. सबंध समारंभात कुठेही बोट दाखवायला जागा ठेवली नाही जयंताने. वरपक्षाकडील सर्वजण त्याने केलेल्या सरबराईने भारावून गेले होते. अगदी बारीकसारीक गोष्टींचे नियोजनही जयंताने विचारपूर्वक केले होते. सगळ्यांनी जयंत आणि नीलिमाचे तोंडभरून कौतुक केले. खरोखरच दृष्ट लागण्याजोगा समारंभ झाला, यात तीळमात्र देखील शंका नव्हती.
साधारण आठ महिन्यांपूर्वी एका संध्याकाळी जयंत आणि नीलिमा मुंबईहून मला आणि सुजाताला भेटायला म्हणून मुद्दाम कोकणात आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टच्या टेबलावर जयंताने त्याचं मन माझ्याजवळ मोकळं केलं.
“दादा, माझी आणि नीलिमाची इच्छा आहे की, केतकीचे कन्यादान तू आणि सुजाता वहिनीने करावं. आपल्या लहानपणीच आई गेली. मी, वसंता, संजय आणि दीपाली अगदी शाळकरी मुलं होतो तेव्हा. तू तारुण्यात पदार्पण केलंस आणि तुझं लग्न आप्पांनी लावून दिलं ते आपल्या घराची गरज म्हणून. तुझं पदवीधर होण्याचं स्वप्नं अर्धवट सोडून तू घरच्या किराणामालाच्या दुकानात आप्पांना मदत करू लागलास. आम्हाला वाढवताना, मोठं करताना कुठलीही अडचण होऊ नये म्हणून तू आणि वहिनीने मूलबाळ होऊ दिलं नाही. मातृत्वाची आस वहिनीने आतल्या आत दाबून ठेवली. दादा, दिवस जात होते तसतसे आम्हाला तू आणि आप्पांनी हवं ते शिक्षण घेण्याची परवानगी दिलीत. मला मुंबईला जाऊन पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी वहिनीने पुढाकार घेतला होता. आम्ही सगळी भावंडं यथावकाश छानपैकी स्थिरावलो आयुष्यात.”
“केतकीने जेव्हा पहिल्यांदा आमच्या घरात तिच्या आणि केदारच्या नात्यासंबंधी मला आणि नीलिमाला विश्वासात घेऊन सगळं सांगितलं, त्या क्षणी माझ्या डोक्यात विचार आला, जो मी नीलिमाला आणि केतकीला लगोलग बोलून दाखवला. तो म्हणजे केतकीचं कन्यादान दादा आणि सुजाता वहिनी करणार. त्या दोघींनाही माझा विचार खूप आवडला. नीलिमा म्हणाली देखील की, दादा वहिनींच्या ऋणातून काही अंशी मला मुक्त होता येईल. त्याच दिवशी आम्ही ठरवलं की, सवडीने कोकणात येऊन आमच्या मनातील विचार तुमच्यासमोर मांडावा. या प्रस्तावाला होकार द्यावा, ही माझ्या आणि नीलिमाच्या वतीने दादा आणि वहिनी तुम्हा दोघांनाही कळकळीची विनंती आहे.”
हेही वाचा –मातृत्वाची दिवाळी!
जयंताच्या भावनांचा आदर करण्यासाठी म्हणून त्याने आग्रहाने केलेल्या विनंतीला मी होकार दिला. कारण तरुणपणातील सुजाताच्या मातृत्वाच्या इच्छेची भरपाई करण्याची संधी जयंताने कळतनकळत मला मिळवून दिली होती.
बाहेर रस्त्यावर चालू झालेल्या बँडचा दबका आवाज कानावर पडला. वरात लवकरड लग्नाच्या हॉलमधून निघणार होती. वरपक्षाकडील तरूण मंडळी बॅगा आणि रुखवताच्या सामानाची खोकी मोटारींच्या डिकीमध्ये चढवायला लागले होते. हळूहळू लग्नाचा हॉल रिकामा व्हायला सुरुवात झाली होती.
दुपारी ज्या आनंदाने मी आणि सुजाताने केतकीचे कन्यादान केलं, त्या केतकीची पाठवणी करण्याच्या गहिऱ्या आणि भावनिक क्षणांना आम्हाला आता सामोरं जायचं आहे, या विचाराने मन गलबलून गेलं.
जयंता आणि नीलिमाच्या पाया पडून आशीर्वाद घेतल्यानंतर केतकी-केदार माझ्या आणि सुजाताच्या जवळ आले, “मोठे बाबा” असं म्हणून केतकीने मला मिठी मारली. हुंदके देत ती माझ्या कानाजवळ येऊन म्हणाली, “मला तुमचा आणि बाबांच्या मोठेपणाचा खूप अभिमान आहे. तुम्ही बाबा, काका आणि आत्याला मोठं करण्यासाठी तुमच्या पितृत्वाचा विचार केला नाही आणि बाबांनी तुमचा हा त्याग लक्षात ठेवून माझ्या कन्यादानाचा मान तुम्हाला दिला. नाती जपायची कशी याचं उत्तम उदाहरण तुम्ही दोघांनीही माझ्या आणि केदार समोर ठेवलं आहे. आम्ही दोघेही तोच वारसा पुढे नेत जपू, हे वचन देतो तुम्हाला.”
हेही वाचा – बॅक स्टेज… हाच योग्य निर्णय!
माझ्या मिठीतून दूर होऊन केतकी सुजाताच्या मिठीत जाऊन रडली. “मोठी आई, तुझं मातृत्व आज सार्थकी लावण्यात माझा खारीचा वाटा आहे, याचा मला अभिमान आहे…” वरपक्षाकडील तरूण मंडळी ‘चला आटपा लवकर’, असा गलका करू लागली. बाहेर बँडवाले देखील कधीचे खोळंबून राहिले होते.
अखेर आमच्या सगळ्यांचा साश्रू नयनाने निरोप घेऊन केतकी आणि केदार सावकाशपणे सजवलेल्या मोटारीत जाऊन बसले. बँड सुरू झाला आणि इतकावेळ ताटकळत उभे असलेले वऱ्हाडी सावकाशपणे पावलं उचलून वरातीत सामील झाले.


