भाग – 2
7 जानेवारीची सकाळ उजाडली. आज जुईचा वाढदिवस होता. उठल्यापासून स्वप्नीलशी तिचं दोनतीनदा बोलणं झालं, पण त्याने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यानेच काय स्वप्नीलचा भाऊ, वहिनी, त्यांची मुलं… कोणीच तिला शुभेच्छा दिल्या नाहीत. आपल्या प्रेमप्रकरणाबद्दल त्यांना कळलं तर नाही? या विचाराने ती धास्तावली. स्वप्नील आणि त्याचा भाऊ दोघंही फॅक्टरीत निघून गेले. थोड्या वेळाने तिच्या मित्रमैत्रिणींचे फोन यायला लागले. तिला फोनवर बोलताना तिच्या जाऊने दोन-तीनदा बघितलं, पण तिने कसलीही उत्सुकता दाखवली नाही. दुपारची जेवणं होऊन गेली आणि तिच्या लक्षात आलं की, तिचे आई-वडील, बहीण, मेव्हणे यापैकी कोणीही फोन केला नव्हता. इतक्या सगळ्यांना आपल्या वाढदिवसाचा विसर पडावा, याचा तिला आता राग येऊ लागला. त्याचबरोबर काहीतरी अशुभ तर नाही ना घडणार, या शंकेने ती कासावीस झाली.
सायंकाळी पाच वाजता तिच्या जाऊने तिला हाक मारली…
“जुई लवकर तयार हो, आपल्याला एका फंक्शनला जायचंय.”
“कसल्या फंक्शनला?” जुईच्या कपाळावर आठ्या उमटल्या.
“माहीत नाही. मघाशी यांचा फोन आला होता. आपल्याला तयार होऊन हॉटेल थ्री सीझनवर यायला सांगितलंय. बहुतेक एखादी बिझनेस पार्टी असावी.”
जुई नाखुषीनेच तयार झाली. तिच्या वाढदिवसाचा सगळ्यांना विसर पडल्याचा राग तिच्या मनात धुमसत होता.
ती आणि तिची जाऊ, मुलांसोबत हॉटेलवर पोहोचले. हॉटेलमध्ये बरीच गर्दी होती. हॉलमधली गर्दी पाहून तर, ती चकीतच झाली. अचानक तिला तिचे आई-वडील दिसले. आश्चर्य वाटून ती त्यांच्याकडे पोहोचणार तेवढ्यात कुणीतरी तिला हाक मारली. तिने मागे वळून पाहिलं तर, तिची बहीण आणि मेव्हणे उभे होते.
“अरे, तुम्ही इथे कसे काय?” तिने आश्चर्यचकीत होऊन विचारलं.
“कमाल करतेस जुई! तुझ्या प्रोग्रामला आम्ही येणार नाही का?”
“माझा प्रोग्राम? माझा कसला प्रोग्राम?” तिने गोंधळून विचारलं.
“आता मात्र हद्द झाली हं! अगं, आज तुझा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्ताने तुझ्या पुस्तकाचं प्रकाशन नाहीये का?”
“माझ्या पुस्तकाचं प्रकाशन?” ती अजूनच गोंधळली.
“वेडाबाई, ते समोर बघ…”
जुईने स्टेजच्या भिंतीकडे पाहिलं. त्यावर लावलेल्या बॅनरवर “’प्राजक्ताची फुलं’ – कवितासंग्रह प्रकाशन सोहळा” असं लिहिलेलं होतं. सोबत तिचा सुंदर हसरा फोटो होता. ‘प्राजक्ताची फुलं’ हे तिच्याच एका कवितेचं नाव होतं. डोळे फाडून ती त्याकडे पहात असतानाच तिचे आई-वडील तिथे आले. तिच्या आईने तिला मिठी मारली.
हेही वाचा – वास्तव… जुईला सुधीरचीच ओढ
“खूप खूप अभिनंदन बेटा. आज तुझं स्वप्न पूर्ण झालं.”
“आई पण मला याची काहीच कल्पना नाहीये. हे तुम्ही करताय का?”
“अगं वेडे, तुझ्या नवऱ्याशिवाय कोण करणार आहे?” तिचे मेव्हणे म्हणाले.
“काय्य? स्वप्नील करताहेत हे सगळं? पण त्यांनी हे सगळं मला कळू न देता कसं केलं?”
“अगं, तुझी ती मैत्रिण अंजू तुझ्याकडे आली होती, तिने तू कविता करतेस, असं सांगितलं होतं वाटतं. ते ऐकून जावईबापू नगरला आले होते, तेव्हा घरी आले. तुझ्या कविता त्यांनी मागितल्या. त्या वाचल्यावर त्यांनी याचा संग्रह करून आपण प्रकाशित करू, असा विचार मांडला. आम्हालाही तो आवडला. आज बघ त्यांनी तो प्रत्यक्षात आणला…” जुईच्या वडिलांनी गुपित उघडं केलं.
“पण आज तुम्ही मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या नाहीत…” जुई रागावून म्हणाली.
“अगं, तो स्वप्नीलरावांचाच प्लॅन होता तुला सरप्राइज द्यायचा!”
तेवढ्यात स्वप्नील तिथे आला.
“स्वप्नील तुम्ही मला…” जुई त्याला काही म्हणणार तोच स्वप्नीलने तिला थांबवलं.
“आई-बाबांनी तुला सगळं सांगितलं असेलच. उरलेलं मी तुला रात्री सांगेन. आता चल कलेक्टरसाहेब आलेत. दोन मोठे साहित्यिक सुद्धा येऊन बसलेत. प्रकाशन समारंभाला सुरुवात करुया…”
समारंभ सुरू झाला. वक्ते काय बोलत होते, त्याकडे जुईचं लक्षच नव्हतं. कवितासंग्रहाचं प्रकाशन हे खरंच तिचं स्वप्न होतं. आज ते अनपेक्षितपणे स्वप्नीलकडून पूर्ण होताना पाहून तिला सारखं गहिवरून येत होतं. भरून येणारे डोळे ती वारंवार रुमालाने पुसत होती. आज पहिल्यांदाच तिच्या मनात स्वप्नीलबद्दलचं प्रेम जागृत झालं होतं…
सूत्रसंचालकाने तिला मनोगत व्यक्त करण्यासाठी डायसवर बोलावलं, तेव्हा ती जागी झाली. कशीबशी ती उभी राहिली…
“मला काय बोलावं, हेच कळत नाहीये… इतकं गहिवरून येतंय. माझे पती स्वप्नील यांनी माझ्या ध्यानीमनी नसताना आज हा प्रकाशन सोहळा आयोजित केला. त्यांचे कितीही आभार मानले तरी कमीच पडतील… आई-वडील, नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्या प्रोत्साहनामुळेच आज माझं स्वप्न आज पूर्ण झालं.”
दोन-चार वाक्य बोलून ती खाली बसली. प्रकाशन झालं. स्वप्नीलने तिच्या काव्यसंग्रहातल्या दोन कवितांचं वाचन केलं. अगदी एखाद्या नामांकित कवीसारखं त्याचं काव्यवाचन ऐकून जुई चाटच पडली!
प्रकाशन सोहळ्यानंतर मोठा केक कापून जुईचा वाढदिवस साजरा करण्यात आला. स्वप्नीलने तिला हिऱ्याची अंगठी भेट म्हणून दिली.
सगळे जेवणाचा आनंद घेत असताना जुईला अचानक एक गोष्ट आठवली आणि तिचा जीव एकदम घाबराघुबरा झाला. बोलणं अर्धवट सोडून ती धावतच पुस्तकं ज्या कोपऱ्यात ठेवली होती तिथे पोहोचली. एक पुस्तक हातात घेऊन ती अस्वस्थपणे एक एक पान उलटवू लागली.
“काय झालं जुई? काय बघते आहेस?”
तिने मागे वळून पाहिलं. तिची आई उभी होती.
“आई, या कवितांत मी सुधीरवर केलेल्या कविता सुद्धा होत्या. त्या पण या पुस्तकात टाकल्या तर नाहीत ना?” रडवेल्या आवाजात तिने विचारलं, “बापरे, आई त्या कविता असतील तर सगळ्या जगाला माझं प्रेमप्रकरण माहीत पडेल!”
तिच्या गळ्यातून एक हुंदका निघून गेला.
“शांत हो बेटा, त्या सर्व कविता काढून टाकल्या आहेत.”
“काढून टाकल्या? कुणी? तुम्ही?”
“नाही बेटा, स्वप्नीलनी!”
” काय्य्यssss! स्वप्नीलनी? म्हणजे स्वप्नीलना सगळं माहीत…” ती रडायला लागली.
“हो, त्यांना सगळं समजलंय. दुसरीकडून कळण्यापेक्षा आम्हीच त्यांना सगळं सांगून टाकलं.”
“आई, काय केलं हे! त्यांना काय वाटलं असेल? आपण त्यांची फसवणूक केली…”
“नाही जुई. आम्ही सांगितल्यावर ते हसले. म्हणाले, ‘या वयात असं प्रेम होणं कॉमन आहे. त्या प्रेमाला काही अर्थ नसतो. खरं प्रेम लग्नानंतरच समजायला लागतं.’ लाखात एक आहे जुई तुझा नवरा. दुसरा कुणी असता तर, हाकलून दिलं असतं तुला घराबाहेर एवढं ऐकल्यावर!”
जुईचा तिच्या कानांवर विश्वास बसेना. तिने आईला मिठी मारली आणि रडू लागली.
“बस कर जुई. अशा शुभप्रसंगी रडायचं नसतं…” आईने तिला धीर देऊन शांत केलं.
कार्यक्रम आटोपल्यावर जुई घरी आली, पण त्याला आपलं प्रकरण समजलंय, या जाणीवेने स्वप्नीलच्या नजरेला नजर देण्याचं धाडस तिला होत नव्हतं.
दुसऱ्या दिवशी स्वप्नील तिला म्हणाला.
“जुई, तुझ्यासाठी अजून एक गिफ्ट आहे.”
जुईचं काळीज धडधडू लागलं. सुधीरबद्दल तर तो काही बोलणार नाही ना? याची भीती तिला वाटू लागली.
“येत्या रविवारी आपण आठवडाभरासाठी उटी आणि कोडाईकॅनॉलला जातोय…”
जुईने एक सुटकेचा नि:श्वास सोडला.
“पण मग फॅक्टरीचं काय? बंद ठेवणार?”
“नाही; दादा बघणार आहे. सध्या कामं कमी आहेत. पंधरा दिवसांनी मात्र खूप लोड येणार आहे. असंही आपण हनिमूनला गेलोच नव्हतो. यालाच हनिमून समजूया…” तिच्याकडे प्रेमाने पाहात तो म्हणाला.
“खरं तर स्वित्झर्लंडला जायचा माझा विचार होता. पण माझ्या एका मित्राचं उटीजवळ रिसॉर्ट आहे. तो कधीपासून बोलवतोय आपल्याला. म्हटलं चला तिथे अगोदर जाऊन येऊ. पुढच्या वर्षी वेळ मिळाला की, युरोपची टूर करून टाकू. चालेल ना?”
“चालेल. चालेल…” जुई खूश होऊन म्हणाली.
0000
उटीपासून थोडं दूर अंतरावरच्या निसर्गरम्य परीसरात त्यांचं रिसोर्ट होतं. स्वप्नीलच्या मित्राने त्यांचं स्वागत केलं. त्याचं मराठी बोलणं ऐकून जुई चकीतच झाली. रूममध्ये आल्यावर तिने स्वप्नीलला त्याबद्दल विचारलं देखील…
“अगं तो पुण्यात माझ्यासोबतच इंजिनीअरिंगला होता. तिथंच तो मराठी शिकला.”
“इंजिनीअर असून हॉटेल कसं काय?”
“त्याच्या वडिलांचं एक हॉटेल अगोदरच उटीमध्ये होतं. याला मात्र हाटेलपेक्षा इंजिनीअरिंगमध्ये रस होता. इंजिनीअरिंग झाल्यावर तो चेन्नईत नोकरीत लागला. पण दुर्दैवाने त्याच्या वडिलांचं निधन झालं. हॉटेल चालवायला कुणी नसल्यामुळे यालाच नोकरी सोडून हाँटेल सांभाळावं लागलं. आता त्याची उटीत दोन आणि हे एक अशी तीन हॉटेल्स आहेत.”
हेही वाचा – थ्रिल… आयुष्याला कलाटणी देणारं!
“पण मग इंजिनीअरिंग करून काहीच फायदा झाला नाही. खूप कठीण गेलं असेल त्यांना ते स्वीकारणं.”
“नाही जुई… जीवनाचं वास्तव त्याने स्वीकारलं. इलाजच नव्हता.”
जुईला स्वतःचं उदाहरण डोळ्यासमोर आलं. सुधीरला ती अजून विसरली नव्हती. स्वप्नील हेच आपलं वास्तव आहे, हे तिला अजूनही स्वीकारता येत नव्हतं.
रात्री दोघं हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले. स्वप्नीलचा मित्र त्यांच्यासोबत येऊन बसला.. गप्पा सुरू असताना अचानक तो जुईला म्हणाला,
“भाभीजी, आमचा मित्र तुम्हाला कविता ऐकवतो की नाही?”
जुईला धक्का बसला.
“नाहीतर! स्वप्नील आणि कविता? शक्य तरी आहे का?”
“काय भाभीजी! अहो, आमचा स्वप्नील साधा कवी नाही, बेस्ट कवी म्हणून कॉलेजमध्ये प्रसिद्ध होता. त्याचा एक कवितासंग्रहही प्रकाशित झालाय.”
“काय? स्वप्नील हे खरं आहे?” जुईने अविश्वासाने स्वप्नीलकडे पहात विचारलं. स्वप्नीलने हसत मान डोलावली.
“माझ्याकडे आहे ते पुस्तक. कधी उदास वाटलं की, मी त्यातल्या कविता वाचतो. खूप प्रेरणादायी कविता आहेत. वाचल्या की, लगेच छान वाटायला लागतं. थांबा मी आणून दाखवतो.”
तो लगेच त्याच्या खोलीत जाऊन ते पुस्तक घेऊन आला. जुईने ते पुस्तक थरथरत्या हाताने घेतलं. थोडंसं जुनं असलं तरी सुरेख सुबक पुस्तक होतं ते.
“आमच्या एका प्राध्यापकांना गॅदरिंगमध्ये वाचलेल्या माझ्ये कविता खूप आवडल्या. त्यांनी स्वखर्चाने ते छापून प्रकाशित केलं.” स्वप्नीलने सांगितलं.
जुईचा अजून विश्वास बसत नव्हता. तिने एक पान उलटून पहिली कविता वाचली. काय सुंदर होती ती कविता!
“जुई नंतर वाच ना. आपण अगोदर जेवून घेऊ. मला खूप भूक लागलीय…”
जुईने पुस्तक बंद केलं.
“भाभीजी, ते पुस्तक वाचून मला परत करा बरं! त्याची एकच कॉपी आहे माझ्याकडे…” मित्र हसून म्हणाला आणि तिथून उठला.
रात्री एक वाजेपर्यंत जुई त्या कविता वाचत होती. वाचून झाल्यावर भरून आलेले डोळे तिने पुसले. सुधीरच्या ज्या कवितांसाठी ती वेडी झाली होती त्या कविता तिला आठवल्या. स्वप्नीलच्या उच्च दर्जाच्या कवितांपुढे त्या तिला भिकार वाटल्या. जीवनाचं वास्तव सुधीरसारखंच स्वप्नीलनेही मांडलं होतं, पण त्यात सुधीरच्या कवितांसारखा बीभत्सपणा नव्हता. सुधीरच्या कविता मेंदूला झिणझिण्या आणायच्या. स्वप्नीलच्या कविता ह्रदयाला भिडत होत्या, काळजात घर करत होत्या. त्या कवितात एक प्रकारची सकारात्मकता होती. निराश झालेल्या मनाला आशेचा किरण दाखवण्याचं सामर्थ्य त्या कवितात होतं.
गाढ झोपलेल्या स्वप्नीलकडे तिने पाहिलं. मशीन्स, लोखंडाच्या भावनाहीन जगात रमणारा हा माणूस, ज्याला ती दगडाच्या काळजाचा म्हणायची, इतका उच्च दर्जाचा कवी निघावा… याचं तिला राहून राहून नवल वाटतं होतं!
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रिसोर्टसमोरच्या तलावाच्या काठावर दोघं बसलेले असताना जुई स्वप्नीलला म्हणाली,
“स्वप्नील, तुम्ही कविता करायचात हे मला का नाही सांगितलंत? काल मी तुमच्या कविता वाचल्या. फारच सुरेख आहेत. तुमच्यात एवढी प्रतिभा असताना तुम्ही नंतर कविता लिहिणं का बंद केलंत?”
स्वप्नीलने एक छोटा खडा उचलून पाण्यात फेकला आणि म्हणाला,
“माणसाचं आयुष्य त्याला कुठे नेईल काहीच सांगता येत नाही, जुई. शाळेत असल्यापासून मला वाचनाची, कवितांची आवड होती. मोठा लेखक व्हायचं माझं स्वप्न होतं. माझे वडील एका वेल्डिंग वर्कशॉपमध्ये कामाला होते. कमाई तुटपुंजी. अर्थातच, आमचं बालपण फार गरीबीत गेलं. आई इकडची तिकडची कामं करून संसाराला हातभार लावायची. एक दिवस वडिलांचा मालक वारला आणि ते वर्कशॉप वडिलांच्या ताब्यात आलं. वडील फारसे शिकलेले नव्हते. जी काम चालून यायची ते ती करायचे. मालक झाल्यामुळे थोडा पैसा यायला लागला, पण तेवढ्यात माझ्या आईला कॅन्सर झाला. येणारा पैसा औषधोपचारात जाऊ लागला. आईच्या आजारामुळे वडिलांना वर्कशॉपमध्ये लक्ष देता येईना, म्हणून मोठ्या भावाची दहावी झाल्याबरोबर वडिलांनी त्याला वर्कशॉपमध्ये अडकवून टाकलं. मी मात्र मेकॅनिकल इंजिनीअर व्हावं, अशी वडिलांची इच्छा होती. मला तर इंजिनीअरिंगमध्ये जराही रस नव्हता. मी सायन्समध्ये बारावी पास होऊनही आर्ट्स कॉलेजला ॲडमिशन घ्यायला निघालो होतो. पण त्याच वेळी माझी आई वारली. मरताना तिने माझ्याकडून वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचं माझ्याकडून वचन घेतलं. माझा नाईलाज झाला. शेवटी मी पुण्याला मेकॅनिकल इंजिनीअरिंगला ॲडमिशन घेतली. वडिलांवर माझा भार नको म्हणून मी सकाळी पेपर वाटपाचं काम करायचो आणि संध्याकाळी एका वेल्डिंग वर्कशॉपमध्ये काम करायचो. इंजिनीअरिंग पूर्ण करून मी घरी परतलो.
हेही वाचा – एप्रिल फूल… कोणी कोणाला केले?
वडील आता खचले होते. वर्कशॉप कसंबसं सुरू होतं. ते जिवंत ठेवण्यासाठी मी एका कंपनीत नोकरी धरली. माझा पगार वर्कशॉपमध्ये लावू लागलो. काही मशीन्स नवीन घेतल्या. पुण्याला ज्या वर्कशॉपमध्ये काम करत होतो, त्याचा मालक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा. ती पद्धत मला माहीत असल्यामुळे मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट घ्यायला लागलो. कामं वाढली. नफा वाढू लागला… तेव्हा मी नोकरी सोडून वर्कशॉप बघू लागलो. वेगवेगळ्या नवीन मशीन्स आणून मी वर्कशॉपचं आधुनिकीकरण केलं. दरम्यानच्या काळात भावाचं लग्न झालं आणि वडील वारले. माझ्यावरची जबाबदारी अजूनच वाढली. कामाचाही व्याप वाढला, तेव्हा मग आम्ही जागा घेऊन दुसरं वर्कशॉप सुरू केलं. तिथेही जागा पुरेना, मग एमआयडीसीत फॅक्टरी सुरू केली. आता आपण ऑटोमोबाइल पार्ट्सची फॅक्टरी सुरू करतोय हे तुला माहीतच आहे. तर, या सगळ्या वाटचालीत मी जीवनाचं वास्तव स्वीकारलं. ते स्वीकारण्याशिवाय मला गत्यंतरच नव्हतं. अर्थातच, कवितांपासून मी दूर गेलो. कविता म्हणजे फक्त एक स्वप्नरंजन आहे, असं मला वाटू लागलं. आजही मला कविता आवडतात, पण मी त्यात गुंतत नाही. किंबहुना, जीवनाचं वास्तव मला तसं करू देत नाही…”
भारावून गेल्यासारखी जुई ते सगळं ऐकत होती.
जीवनातलं वास्तव नुसतं कवितांमध्ये मांडून उपयोग नसतो तर खऱ्या आयुष्यात ते स्वीकारावं लागतं, हे तिच्याही लक्षात आलं होतं. अचानक आठवल्यासारखं ती स्वप्नीलला म्हणाली,
“स्वप्नील, माझ्या पूर्वायुष्याबद्दल तुम्हाला कळलं तेव्हा तुम्हाला माझा राग नाही आला?”
“आला ना! शेवटी मीही एक पुरुष आहे. बायकोच्या पहिल्या प्रेमाबद्दल कळल्यावर कोणताही पुरुष अस्वस्थ होणारच. खरंतर, लग्नात आणि लग्नानंतरही तुझं वागणं, बोलणं यावरून मला आणि वहिनीलाही तू या लग्नाने खूश नाहीये, याची खात्री होती. तुझं लग्नाआधी एखादं प्रेमप्रकरण असावं, अशीही आम्हाला शंका यायची. वहिनीने ती एक-दोनदा बोलूनही दाखवली. पण मी तिला समजावलं. तुला विचारूनही काही फायदा होईल, असं मला वाटलं नाही… कारण बायकांचं एक वैशिष्ट्य असतं. दुसऱ्याची गुपितं त्यांच्या पोटात रहात नाहीत, मात्र स्वतःचं गुपित मनाच्या एका खोल कप्प्यात त्या गाडून टाकतात. मग माझ्या लक्षात आलं की आपल्या कॉलेजमध्येही अशी अनेक प्रकरणं होती… त्यातली फक्त एक टक्का प्रकरणं यशस्वी झाली होती. याचं कारण ते खरं प्रेम नसून आकर्षण असतं, हे लक्षात घ्यायला हवं. आपण ज्याच्या रिसोर्टमध्ये रहातोय, त्याचं पुण्यातल्या एका मराठी मुलीवर प्रेम होतं. अनेक कारणांनी ते यशस्वी झालं नाही. शेवटी त्याने इथल्याच तामीळ मुलीशी लग्न केलं. आता तो सुखात आहे. परिस्थितीशी, वास्तवाशी त्याला तडजोड करावीच लागली. अशी तडजोड तूही करशील याची मला खात्री होती, म्हणून आलेला राग मी विसरूनही गेलो.”
जुईला खूप काही बोलायचं होतं, पण स्वप्नीलच्या मनाचा मोठेपणा पाहून तिला गहिवरून आलं होतं, त्यात तिला बोलताच आलं नाही.
“चल निघायचं. अंधार पडायला लागलाय…” त्याने विचारलं. तिने मान डोलावली. त्या अंधारात तिचे भरलेले डोळे त्याला दिसले नाहीत.
क्रमश:
(ही कथा माझ्या ‘हा खेळ भावनांचा’ या पुस्तकातील आहे.)


