गजानन देवधर
पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात 12 ऑक्टोबर 2008 रोजी कॉमनवेल्थ यूथ गेम्सचे भव्य उद्घाटन होणार होते. कॉमनवेल्थ गेम्सच्या तत्कालीन Queen’s Baton Relay प्रमाणेच, या वेळेस Youth Baton Relay ही नवी संकल्पना अमलात आणली जाणार होती. बॅटन रिले ही केवळ औपचारिक धाव नव्हे, तर तिच्यामागे शिस्त, नियोजन आणि प्रत्येक टप्प्यावर असणारी जबाबदारी, यांचा एक अखंड प्रवास असतो.
त्या काळी मी शिकवत असलेल्या ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या संस्थेचे अध्यक्ष सतीश प्रधान हे महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे उपाध्यक्ष होते आणि बॅटन रिले ऑर्गनायझिंग कमिटीचे चेअरमनही होते. बॅटन रिलेची सुरुवात दिल्लीपासून होऊन नऊ राज्यांतून, तब्बल आठ हजार किलोमीटरचा प्रवास करत 190 गावांतून जात ती बालेवाडी, पुणे येथे संपणार होती. हा मार्ग फक्त ठरवणं नव्हे, तर तो प्रत्यक्ष पाहून, प्रत्येक गावातील आणि शहरातील प्रशासनाशी, क्रीडा अधिकाऱ्यांशी, स्थानिक कॉलेजांशी चर्चा करून, गरजेप्रमाणे बदल सुचवून अधिकृत अहवाल तयार करणे – हे एक मोठं काम होतं.
मार्ग ठरवण्याचे काम
या कामासाठी आमच्या कॉलेजमधील प्राध्यापकांच्या दोन-दोन जणांच्या टीम तयार केल्या गेल्या. माझा जोडीदार होता माझ्याच विभागातील प्रा. मुळजकर. आम्हा दोघांचा नियोजनाचा मार्ग उत्तर प्रदेशातील बुलंदशहर ते वाराणसी असा होता.
दिल्लीतील ऑलिंपिक कमिटीच्या ऑफिसमध्ये, कमिटीचे तत्कालीन अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्यासोबत बैठक झाली. त्यांनी दिलेला प्रायमरी मार्गाचा नकाशा, ओळखपत्रं आणि आवश्यक ती कागदपत्रं घेऊन आम्ही प्रवासाला निघालो. सोबत होती ड्रायव्हरसह इनोव्हा गाडी, प्रवासातील खर्चासाठी आवश्यक भत्ता आणि एक-एक दिवसाचं काम पुण्यात फॅक्सने कळवण्यासाठी सूचना.
धनराज पिल्लेंची भेट
आम्ही ऑलिंपिक कमिटीच्या लाऊंजमध्ये बसलो असताना आमच्या मराठीतून गप्पा चालल्या होत्या, तेवढ्यात तेथून जाणार्या ऑलिंपिक हॉकी खेळाडू धनराज पिल्ले यांनी आमचे मराठी बोलणे ऐकले, ते थबकले आणि त्यांनी आमची मराठीतून चौकशी केली. प्रधानांच्या कॉलेजचे असे कळल्यावर प्रधान साहेबांना आवर्जून नमस्कार सांगा, असेही त्यांनी सांगितले.
बुलंद शहरचा धक्का
प्रवासाच्या पहिल्या दिवशीच ड्रायव्हरने आमच्याकडे पाहून विचारलं, “साहब, आप दोनों ने इसके पहले कभी उत्तर प्रदेश में इतनी लंबी रोड ट्रिप की है?”
त्याच्या चौकशीत थोडी काळजीची झांक जाणवली. त्याने आम्हाला सांभाळून रहायला सांगितले.
दुपारनंतर आम्ही बुलंद शहरला पोहोचलो. तिथल्या कॉलेजच्या प्राचार्यांची आम्हाला भेट घ्यायची होती. आम्ही कॉलेजपाशी गेलो. गेटवर गार्ड निवांत पान चघळत बसला होता. त्याच्या हातात एक सोटा, बाजूला पाण्याची बाटली. आम्ही ओळखपत्रं दाखवून प्राचार्यांना भेटायचं आहे, असं सांगितलं. त्यावर तो पानाची पिंक टाकून अगदी सहज स्वरात म्हणाला,
“उनको मिलना है तो आप को ऊपर जाना पड़ेगा।”
आम्ही थोडं गोंधळून विचारलं, “ऊपर? क्या मतलब?”
तो हसत म्हणाला, “अरे, उनका कल ही मर्डर हो गया ना! मिलने के लिये ऊपर ही तो जाना पड़ेगा।”
क्षणभर आम्ही एकमेकांकडे बघतच राहिलो. मात्र जणू काहीच घडलं नव्हतं, अशा रितीने कॉलेज सुरू होतं. मुलं खेळत, गप्पा मारत जात होती. तेथून आम्ही लगेचच जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे वळलो. तिथे तरी रिलेबाबत गंभीरपणे चर्चा होईल आणि आम्हाला हवी ती माहिती मिळेल, अशी अपेक्षा होती आणि ती सार्थ ठरली…
हेही वाचा – हेरोडेस अटिकस येथील संगीतमय रात्र
खुर्जाची अवस्था
दुसरे दिवशी सकाळी खुर्जा गावातील कॉलेजपाशी सकाळी साडेआठ वाजता पोहोचलो. भल्या मोठ्या हवेली सारख्या जुन्या इमारतीत कॉलेज होतं. परिसरात सुंदर कारंजे दिसत होते, परंतु तिथं पाणी नव्हतं, नक्षीदार कमानी होत्या पण त्याची रया गेली होती, अनेक वर्षांत रंग दिला नव्हता बहुतेक.
आम्ही प्राचार्यांची चौकशी केली, प्राचार्य अजून आले नव्हते. एका प्राध्यापकाने आम्हाला बॅडमिंटन कोर्टापाशी नेलं, तिथं बाक टाकून मुलांची पेपर लिहिण्याची सोय केली होती. तिथेच असलेल्या एका खोलीत उपप्राचार्य इतर चार प्राध्यापकांबरोबर पान खात गप्पा मारत बसले होते.
आम्ही विचारलं, “परीक्षा बाहेर चालू आहे का?”
उपप्राचार्य खांदे उडवत म्हणाले, “लॉ का एक्झामिनेशन चालू है बाहर, स्टूडन्ट् उनका काम कर रहे हैं, हम हमारा। एक्झाम हॉल में जाकर हमें मरना थोड़ी है।”
आम्हाला तिथून फॅक्स करायचा होता म्हणून आम्ही त्यासाठी विनंती केली, तेव्हा आम्हाला कळले की, बिल भरले नाही म्हणून कॉलेजचा फोन चार वर्षांपासून बंद होता. विषयच संपला.
तिथे एक A4 आकाराचा कागद हवा असला तरी तो प्राचार्यांकडे कुलुपात. कारण बाहेर ठेवलेले काहीच शिल्लक रहात नाही.
मुळजकर गाडीत बसताच म्हणाला, “सर, आपण महाराष्ट्र राज्यात खरंच नंदनवनात रहातो हे कॉलेजमधे सगळ्यांना सांगायला पाहिजे, आपल्याला कधीच याचं महत्त्व जाणवलं नव्हतं…”
असही होऊ शकतं!
ट्रॅफीकमुळे एका गावात रात्री उशिरा पोहोचलो. स्टेशनजवळच एक हॉटेल दिसले. रुमबद्दल चौकशी केली. आम्ही आपापसात बोलत होतो. आमचे बोलणे ऐकून काऊंटरमागच्या पहेलवानासारख्या मॅनेजरने आम्हाला विचारले,
“क्या आप महाराष्ट्र से हो?… आपका राज हम लोगों के खिलाफ क्या बोलता है? समझो, अभी यहाँ हमने आप दोनों को काट दिया, तो क्या करेगा आपका राज?”
आम्ही काही न बोलता चेक-इन केलं. रात्रीच्या त्या शांततेत त्याचं वाक्य मात्र मनात सतत घुमत होतं.
इटाहचा अनुभव
इटाहच्या जिल्हाधिकार्यांना भेटायला गेलो होतो, तिथे त्यांच्या कार्यालयासमोरील टपरीवजा दुकानांमधे ‘फक्त पन्नास रुपयांत पिस्तुलाचा परवाना मिळू शकतो’, असे बोर्ड लावले होते, इतक्या सहज पिस्तुलांचे परवाने मिळू शकतात, याचे आश्चर्य वाटले.
अत्तर आणि पिस्तुल
कनौजला असताना आम्ही तेथील अत्तराच्या दुकानात गेलो होतो, अतिशय सुवासिक छान अत्तरं होती तिथं, अगदी मृद् गंधाचं अत्तर सुद्धा. आम्ही अत्तरं घेतली. तिथल्या एकाने आम्हाला विचारलं “कलावती चाहिये क्या?” म्हटलं ही काय भानगड?
त्याने आम्हाला त्याच दुकानात आतल्या भागात नेलं. तिथल्या अनेक ड्रॉवरपैकी एक बाहेर ओढलं आणि आम्ही पाहातच राहिलो. त्या ड्रॉव्हरमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिस्तुलं होती. त्यानं आम्हाला सांगितलं की, तिथे अगदी गावठीपासून रिव्हॉल्वरपर्यंत सगळे प्रकार स्वस्तात उपलब्ध होते. अगदी पाचशे रुपयांपासून.
बाहेरच्या सुगंधी वातावरणाच्या अंतरंगात एवढं भयावह सत्य असू शकेल, याची कल्पनाही करणं अशक्य होतं.
मलिहाबादची स्पर्धा
लखनऊजवळील मलिहाबाद, आपल्या देवगड सारखंच आंब्यांसाठी प्रसिद्ध. आम्ही संध्याकाळी साधारण चार वाजतां कॉलेजच्या आवारात पोहोचलो, तेव्हा तिथं चालू असलेल्या पोलिसांच्या स्पर्धा संपत आल्या होत्या. DSO तिथेच होते, आम्ही त्यांना भेटलो आणि येण्याचं कारण सांगितलं . त्यांनी आम्हाला थोडा वेळ थांबायला सांगितलं. ते म्हणाले ,”आता क्रीडा स्पर्धांचा बक्षीस समारंभ आहे, तुम्हीही इथंच बसा, कार्यक्रमानंतर आपण बोलू”.
आम्हाला बसायला दोन खुर्च्या दिल्या. शेजारीच जेमतेम सहाजण बसतील एवढा छोटा शामियाना होता. त्याच्याखाली पंगतीची टेबले असतात तशी दोन टेबले एकाला एक जोडून आणि काही खुर्च्या ठेवल्या होत्या. बॅटरीला जोडलेले दोन माईक होते. थोड्याच वेळात तिथे बक्षीस समारंभासाठी सरकारी पाहुणे आले, त्यात एक स्त्री अधिकारी सुद्धा होत्या, पत्येकाने मिळेल ती खुर्ची पटकावली.
तिकडे DSO ने सर्व पोलीस खेळाडूंना माइकवरूनच बोलावले. शामियानाच्या समोरील पटांगण मोकळे होते. एका बाजूला एकावर एक खुर्च्या ठेवल्या होत्या. DSO कडून पोलीसांना आपापली खुर्ची घेऊन बसण्यास सांगण्यात आले. सर्वांनी धावत पळत खुर्च्या मिळवून पटांगणात आपापल्या खुर्च्या मांडल्या. सगळ्या पाहुणे मंडळींना पण बहुतेक या सगळ्याची सवय असावी.
तेवढ्यात आमच्या शेजारीच दोन पोलिसांनी काही पोती आणून ठेवली. एका पोत्यात छोट्या झेंडूच्या पाच सहा फुले असलेले हार होते तर, इतर पोत्यात बक्षीसे!
आता कार्यक्रम सुरू होणार तेवढ्यात DSO ला एक फोन आला. कोणत्या तरी वरिष्ठ अधिकार्याचा फोन असावा. DSO माइकसमोर उभं राहूनच फोनवर बोलत असल्याने ते जे बोलत होते, ते सगळ्यांनाच ऐकू येत होतं. ते सांगत होते, “नाही, फार काही नाही, यावर्षी मारामारीत चारच पोलिसांची डोकी फुटली, ते आता हॉस्पिटलमध्ये आहेत. खूपच शांततेत झालं सगळं. चार वर्षांपूर्वी खून पडले, तसं काहीच झालं नाही. तेव्हा पुढच्या वर्षी स्पर्धा घ्यायला काही हरकत नाही…”
आम्ही दोघं अवाक होऊन एकमेकाकडं पहात होतो. पोलिसांच्या स्पर्धांमध्ये उराउरी मारामार्या? या गावातून बॅटन नेणं किती धोक्याचं आहे ते लक्षांत येत होतं.
त्यांचं फोनवरचं संभाषण संपलं. DSO ने पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे, असं जाहीर केलं. स्वागतासाठी कोण येणार हे आम्ही पहात होतो, तोपर्यंत एक पोलीस उठला… तिथल्या पोत्याकडे आला, त्यातला छोटासा फुलांचा हार उचलला आणि एका पाहुण्याच्या गळ्यात तो हार घालून जागेवर जाऊन बसला. तोपर्यंत एका पाठोपाठ सगळे पोलीस उठायला लागले, कोणी कोणत्याही पाहुण्याच्या गळ्यात हार घालायचा असल्याने ज्या कोणी पाहुण्या विदुषी आल्या होत्या, त्यांचा गळा हारांनी भरून गेला आणि त्यामुळे त्या खूप आनंदी झालेल्या दिसल्या. सगळे हार संपले. पाहुणे गळ्यात हार घालूनच बसले होते.
हेही वाचा – आण्णा देवधर : एक आगळंवेगळं व्यक्तिमत्त्व
आता बक्षीस वितरण समारंभाला सुरवात होणार तेवढ्यात एका पाहुण्याने बक्षीसं म्हणून कोणत्या वस्तू आणल्या, याची चौकशी केली आणि त्या वस्तू दाखवायला सांगितल्या. DSO ने सांगितले की, काही ट्रॅक सूट आहेत तर, काही जणांना थाळ्या… त्यावर पाहुण्यांनी ट्रॅक सूट दाखवायला सांगितले, ते त्यांनी पाहिले पण कसे? आपल्या मापाचे आहेत की नाहीत, ते अंगाला लावून! एवढेच नाही तर, त्यांनी आपापल्या मापाचे शोधून एक एक स्वतःजवळ ठेऊन घेतले!!
कार्यक्रम सुरू झाला, बक्षीसं देताना DSO च्या लक्षांत आले की, एकाच पोलिसाला तीन वेळा थाळी मिळाली, त्यावर तो त्या पोलिसाला म्हणाला, “घर जाके तू तीन तीन थाली में खाना खाने वाला है क्या?” आणि त्याला पुढची बक्षिसं दिलीच नाहीत… फक्त नाव पुकारले!
तेवढ्यात मागून एक आवाज आला, “हमें सुबह का नाश्ता कब मिलेगा?” त्यावर DSO म्हणाले, “एक दिन नास्ता नही खाओगे तो मर जाओगे क्या?” म्हणजे दिवसभर पोलिसांच्या स्पर्धा उपाशी पोटीच चालल्या होत्या. आम्हाला एकावर एक धक्के बसत होते.
तेवढ्यात आलेल्या पाहुण्यांनी दोन दोन थाळ्या मागून घेतल्या.
असे करता करता कार्यक्रम संपला, अंधार होत आला होता. DSOने आम्हाला चहासाठी जवळच असलेल्या हॉलमध्ये बोलावले, त्या हॉलमध्येही दिवे नव्हते. सर्व पोलीस ‘नाश्ता नाश्ता’ असे ओरडत DSOच्या मागे गेले. DSO हॉलमधे गेले आणि लगेचच बाहेरही आले. आता त्यांच्या हातात एक मोठी टोपली होती. त्यातल्या बांधलेल्या पुड्या त्यांनी समोरच्या जागेत भिरकावून दिल्या. फेकलेले अन्न खायला कुत्री धावतात तसेच सगळे पोलीस त्यावर तुटून पडले. काय असावं त्यामध्य़े? एक एक सामोसा!
ते दृश्य पाहून अक्षरशः अंगावर काटा आला. खूप वाईट वाटलं ती परिस्थिती पाहून आणि त्यातही सिस्टीमचा मुर्दाडपणा पाहून!
आम्ही बाहेरच उभे होतो तोपर्यंत आत गेलेले पाहुणे हातात मिळतील तेवढी केळी आणि खाद्यपदार्थ घेऊन आपापल्या मोटारींकडे धावताना दिसले. ते पाहून मनात आलं “पाहुण्यांनो तुम्ही सुद्धा? मग आम्हाला इथून निघायलाच हवं.”
आम्ही दोघे काहीही न बोलता सरळ आमच्या गाडीकडे गेलो आणि तेथून थेट लखनऊच्या दिशेने गाडी घेतली.
प्रवासाचा शेवट
तेरा दिवसांच्या या प्रवासात आम्ही उत्तर प्रदेशातल्या फक्त नकाशावरच्या रेषाच पाहिल्या नाहीत तर, त्याकाळचं तिथलं आपल्याला न मानवणारं भयानक वास्तव… त्यांचे प्रश्न… त्यांची मानसिकता… काही ठिकाणी त्यांची उदासीनता… तर काही ठिकाणी त्यांची बेफिकीरीही पाहिली!
बॅटन रिलेचा मार्ग ठरवणं हे फक्त स्पोर्ट्स मॅनेजमेंट नव्हतं, तो एक सामाजिक आणि सांस्कृतिक अभ्यास होता, जो आम्हाला तेथील वास्तवाच्या जवळ घेऊन गेला.
dscvpt@gmail.com मोबाइल – 9820284859


