आरोग्यदायी जीवनाची सुरुवात औषधांपासून नव्हे, तर आपल्या जेवणाच्या ताटापासून होते. विशेषतः, महिलांसाठी योग्य आणि सकस आहार हा केवळ आरोग्याचा विषय नसून त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्याचा पाया आहे. घरातील प्रत्येकाच्या खाण्या-पिण्याची काळजी घेणारी महिला मात्र अनेकदा स्वतःच्या आहाराकडे दुर्लक्ष करते. मुलांनी व्यवस्थित खावे, नवऱ्याने डबा व्यवस्थित न्यावा, घरातल्या वडीलधाऱ्यांना वेळेवर जेवण, पथ्य-पाणी मिळावे, याची काळजी घेते. पण, हे सारं करता करता स्वतःचं जेवण मात्र उरलेल्या वेळात घाईघाईने, शिळंपाकं – उरलंसुरलं खाऊन कसबस करते… आणि म्हणतेही, ‘मला काय होतंय?’
पण नीट न जेवल्याने पोषण कमी होऊ शकते. त्यामुळे थकवा, अशक्तपणा आणि लहान-सहान आजार तिला हळूहळू घेरू लागतात. महिलांच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर शरीराच्या पोषणाच्या गरजा बदलत असतात. किशोरावस्था, मासिक पाळी, गर्भधारणा, स्तनपान, प्री-मेनोपॉज, मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती या प्रत्येक टप्प्यावर शरीराला विशिष्ट पोषक घटकांची गरज असते. आयर्न, कॅल्शियम, झिंक, प्रोटिन यांचा रोजच्या आहारातून पुरवठा मिळणे गरजेचे असते.
हेही वाचा – शरीरात वात आणि पित्त वाढवण्याचे एक कारण — अहंकार!
मासिक पाळीमुळे महिलांच्या शरीरातून नियमितपणे लोह काही प्रमाणात शरीराच्या बाहेर फेकले जाते. त्यामुळे आहारात लोहाची कमतरता असेल तर, शरीरात रक्ताची मात्रा कमी होऊ शकते. यामुळे –
- सतत थकवा
- चक्कर येणं
- अशक्तपणा
- धाप लागणं
- कामात उत्साहच न उरणं
- चिडचिड
अशी लक्षणे दिसायला लागतात. त्याचप्रमाणे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी कमी झाल्यानं हाडं ठिसूळ होणं, सांधे दुखणे, पाठ, मणका, कंबर दुखणं असे त्रास वारंवार होऊ शकतात. प्रोटिनच्या कमतरतेमुळे शरीरावर अनेक परिणाम होऊ शकतात, म्हणजे केस गळणं आणि आहारावरचं नियंत्रण सुटणं.
गोड खाण्याची क्रेव्हिंग्ज वाढू शकतात. मग सुरू होतं…
- हे डाएट करू, ते करू…
- रील पाहून मनानंच काही उपाय करणं
- सतत डाएटचे सल्ले घेणं
पण प्रत्येक व्यक्तीची पोषणाची गरज वेगळी असते. आजकाल हेल्दी डाएट म्हटलं की, अनेकदा महागडी सुपर फूड्स, परदेशी धान्य, प्रोटिन बार, विशेष प्रकारचे सीड्स, महागड्या पावडरी डोळ्यांसमोर येतात. पण खरंतर पौष्टिक आहारासाठी खिशाला मोठी कात्री लावण्याची अजिबात गरज नाही! आपल्या ‘पारंपरिक भारतीय’ घरगुती आहारातच पोषणाचा खजिना दडलेला आहे. डाळी, कडधान्ये, मोड आलेली कडधान्ये, नाचणी, ज्वारी, बाजरी, राजमा, तांदूळ, गहू, मटकी, हरभरा, शेंगदाणे, गूळ, तीळ, घरगुती मसाले, खसखस, पालेभाज्या, रानभाज्या, फळं, दूध, दही, ताक, अंडी असे असंख्य पदार्थ सहज उपलब्ध आहेत.
हेही वाचा – टेंशन आहे? मग शुगर तपासून घ्या!
हे पदार्थ महागड्या हेल्थ फूडपेक्षा अधिक स्वस्त आणि आपल्या आहार पद्धतीत सहज जोडता येणारे पदार्थ आहेत. उदाहरणार्थ नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असतं. नाचणीची पेज नाश्ता म्हणून तुम्ही घेऊ शकता.
- डाळी आणि कडधान्ये प्रोटिनचा उत्तम स्रोत आहेत.
- पालेभाज्यांमधून लोह, विविध अनेक जीवनसत्वं आणि खनिजं मिळतात.
- शेंगदाणे + गूळ + तीळ म्हणजे लोह आणि कॅल्शियमचे उत्तम स्रोत आहेत. यातूनच नॅचरल ऑइल मिळते आणि तुलनेने स्वस्त आणि सहज उपलब्ध असे हे पदार्थ आहेत.
आपल्या स्वयंपाकघरातील थालिपीठे, धिरडे, मुगडाळीची खिचडी, डाळ-भात, भाजी-भाकरी, उसळ, पोहे, उपमा, दही, ताक, दही-भात, सोयाबीन, विविध प्रकारच्या चटण्या यासारखे पदार्थ योग्य पद्धतीने आणि संतुलित प्रमाणात खाल्ले तर नक्कीच पौष्टिक आहाराचा भाग बनतात. त्यामुळे हेल्दी खाण्यासाठी नेहमी विदेशी किंवा महाग पदार्थ हवेत, हा गैरसमज दूर करणं गरजेचंच आहे. पण तेच होत नाही आणि अपुरा किंवा असंतुलित आहार दीर्घकाळ सुरू राहिल्यानं शरीरावर त्याचे अनेक परिणाम होऊ शकतात.
सकस-पौष्टिक रोज जमवायचं कसं?
- सकस आहार म्हणजे भरपूर आणि सतत खाणं नाही, तर सकस आहार म्हणजे शरीराला आवश्यक असणारे विविध घटक रोजच्या रोज योग्य प्रमाणात शरीराला मिळणं.
- पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थ आपल्या आहारात असावेत. आपल्या रोजच्या जेवणात धान्य, भाकरी, चपाती, तूप, डाळी, पालेभाज्या, ड्रायफ्रूट्स, दूध, दही, फळभाज्या तसंच दिवसभरात एक फळ यांचा समतोल असणं महत्त्वाचं आहे.
- आपण रोज विसरतो तो आणि अगदी मोफत मिळणारा दुर्लक्षित घटक म्हणजे पाणी! आपण पुरेसं आणि योग्य प्रमाणात थोड्याथोड्या वेळानं पाणी पिणं गरजेचं आहे.
स्वतःची काळजी घेणं ही स्वार्थाची गोष्ट नाही, तर स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी आहे!
(सौजन्य – समर्थ आरोग्य फाऊंडेशन)
संपर्क – 9150014545


