स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये अशाच काही टीप्स पाहूयात – मिरच्यांच्या ठेच्याचा हिरवेगारपणा अन् पनीर, साजूक तूप, दही
- नोकरी करणाऱ्या स्त्रिया सकाळी रात्रीसाठीची किंवा रात्री सकाळसाठीची कणीक भिजवून गोळा फ्रीजमध्ये ठेवतात; परंतु ज्या वेळी पोळ्या करायच्या, त्या वेळी फ्रीजमधील कणीक रूम टेंपरेचरला येण्यास बराच कालावधी लागतो. त्यानंतर पोळ्या केल्या जातात. त्यासाठी कणकेचा उंडा लाटून त्याला तेल लावून चौघडी लाटावी. अशा अवस्थेत चौघड्या स्थितीत, तर वेळ वाचेल.
- चिंच स्वच्छ करून घ्यावी. थोडेसे पाणी आणि चिंच पातेल्यात घेऊन गॅसवर उकळून घ्यावे. नंतर त्याचा कोळ काढून त्यात गूळ, धणे, जिरे, तिखट, मीठ, खजुराची पेस्ट, व्हिनेगर घालून चांगले हलवून बाटलीत भरून ठेवावे. फ्रीजमध्ये ठेवल्यास जास्ती दिवस टिकते. पदार्थाबरोबर खाण्यास छान लागते किंवा पदार्थाला आंबटपणा यावा म्हणून पदार्थात घालण्यास पटकन सोयीचे ठरते. ऐन वेळी याचा उपयोग होतो. उपवासालाही चालते, तोंडाला चांगली चव येते.
हेही वाचा – Kitchen Tips : कधीही करा फोडणीचा भात अन् सोबत झटपट दही
- बऱ्याच वेळा आपणास हिरव्या मिरच्यांचा ठेचा लागतो. मिरच्यांचा ठेचा हिरवा राहावा म्हणून त्यात सायट्रिक अॅसिड पावडर किंवा लिंबाचा रस घालून मिरच्या वाटून घ्या. अगदी शेवटचा चमचा उरेपर्यंत तो ठेचा हिरवागार राहतो.
- डाळ आणि तांदूळ कुकरमध्ये शिजविण्याआधी अर्धा तास उन्हात भिजवून ठेवावे. म्हणजे इंधनबचत होऊन पदार्थ लवकर शिजतो.
हेही वाचा – Kitchen Tips : कांद्याची पेस्ट, वाटणाच्या वड्या अन् खोबऱ्याचा किस…
- घरी पनीर बनविताना, दूध उकळत असताना लिंबू न पिळता, आधी लिंबू पिळून मग गॅसवर दूध ठेवावे. चोथा पटकन बनतो. नंतर निघालेल्या चोथ्यात किंचित मैदा मिसळून तो गोळा हवा तो आकार देऊन फ्रीजमध्ये ठेवावा.
- विरजणाचे दही नसताना साजूक तूप हवे असल्यास साठवलेली साय जाड बुडाच्या पातेल्यामध्ये कढवण्यास ठेवावी. पारदर्शक तूप आणि चॉकलेटी रंगाची बेरी दिसावयास लागली की गाळून घ्यावे. दहीवड्यासाठी पुढील पद्धतीने दही केल्यास उत्तम होते. एक लीटर कच्चे दूध थोडे कोमट करून घ्या. एक वाटी दूध जास्त गरम करा. दोन ते तीन चमचे मिल्क पावडर टाकून पेस्ट करा. हे गरम दूध गाळून एक लीटर कोमट कच्च्या दुधात टाका. ज्या भांड्यात दही लावायचे त्यात चार-पाच टी स्पून दही टाका. नीट ढवळून ते पातेल्याला पूर्ण लावून घ्या. नंतर दूध टाकून खालीवर करा किंवा एकच दिशेने ढवळा. फ्रीजवर भांडे ठेवल्यास चार-पाच तासांत दही तयार होते; अगदी हॉटेलप्रमाणे दही लागते.


