मैत्रिणीच्या घरी सर्वांना मांसाहार आवडतो; पण ती घरी करत नाही. कारणं ना, तशी बरीच आहेत. हं… आलं माझ्या लक्षात! तुम्ही मला बोलण्यात गुंतवता आहात ना! तर, तिच्याकडे माशांचे प्रकार केले जात नाहीत; हॉटेलमध्ये गेल्यावर खातात; पण घरी बनवलेला पदार्थ म्हणजे, त्याला वेगळीच चव… म्हणून जेव्हा ही काहीतरी खास करते; तेव्हा आवर्जून मैत्रिणीला पाठवते. आज हिने चिम्बोऱ्यांचं कालवण केलं होतं. मैत्रिणीच्या छोट्याला चिम्बोऱ्या खूप आवडतात ते हिला माहिती होतं. एका डब्यात हिने कालवण भरलं; आपण नेऊन द्यावं की, तिच्या घरचं कोणी इकडे येऊ शकतंय ते पहावं, म्हणजे फेरी वाचेल; या हेतूने, विचारण्यासाठी तिने मैत्रिणीला फोन लावला…
फोन उचलल्याबरोबर मैत्रीण आनंदाने चीतकारली, “शंभर वर्षं आयुष्य आहे बघ तुला! मी आत्ता करणारच होते तुला फोन…”
“कशाला गं?”
“अगं, तू बांगड्याचं भुजणं पाठवलं होतंस ना, खूपच टेस्टी झालं होतं हं! सगळ्यांना जाम आवडलं.”
हेही वाचा – संस्कार… मुलांना विश्वास द्यायची गरज
“पण ते मी पंधरा दिवसांपूर्वी… आणि तू आत्ता…” हिने बोलायचा प्रयत्न केला. पण तिची जलद गाडी होती; कुठेही न थांबणारी! क्षणभर दोघीही एकाचवेळी बोलत होत्या. मग हिने तोंड बंद केलं आणि ऐकायचा पर्याय निवडला…
“इतकं छान झालं होतं. मी फक्त त्यात थोडसं मीठ, जरा तिखट आणि उगीच एवढासा चिंचेचा कोळ घातला. एकदम चवदार…”
“मासे नाहीस ना घातलेस त्यात?” हिने न राहवून विचारलं.
दुसऱ्याला द्यायचं म्हणून हिने अगदी निवडक बांगडे तिच्या डब्यात भरले होते. पण हिच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून, ती आपलं बोलणंच रेटत होती…
“मुलं तर म्हणालीच, आई, अगदी तुझ्या हातचीच चव वाटतेय. मी सांगितलं नाही त्यांना, तू पाठवलं आहेस म्हणून…”
“तू मासे करतेस घरी?” हिने चकित होऊन, थोड्याशा दुखावलेल्या स्वरातच विचारलं.
ती जरा गांगरली, पण पटकन सावरली, “छे गं! मी कसली करतेय! तुला सगळं माहितीच आहे ते! अगं, सुरुवातीच्या काळात, जरा शिकून बघावं म्हणून… ए, ते जाऊदे! तू फोन कशाला केला होतास, सांग ना!”
हेही वाचा – ट्युबलाइट… एलसी
“विसरले बघ, कशाला केला होता तेच! हे वय ना… आठवल्यावर करते पुन्हा…”
“ए, ऐक ना…”
“बघ साफ विसरले. मला बॅंकेत जायचं होतं. नंतर करते हं फोन…”
तिने फोन खाली ठेवला. किचनमध्ये जाऊन, डब्यातल्या चिंबोऱ्या पुन्हा कढईत काढून ठेवल्या आणि रिकामा डबा सिंकमध्ये घासायला टाकला!!


