दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 08 नोव्हेंबर 2026; वार : रविवार
- भारतीय सौर : 17 कार्तिक शके 1948; तिथि : चतुर्दशी 11:27; नक्षत्र : स्वाती अहोरात्र;
- योग : आयुष्यमान 27:02; करण : चतुष्पाद 23:56;
- सूर्य : तुळ; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:40; सूर्यास्त : 18:03;
- पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
नरक चतुर्दशी
अभ्यंगस्नान
दर्श अमावस्या
लक्ष्मीपूजन सायं 06.00 ते रात्रौ 08:33
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
इंग्रजी कादंबरीकार आणि लघुकथा लेखक राजा राव
टीम अवांतर
इंग्रजी कादंबरीकार आणि लघुकथा लेखक राजा राव यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1908 रोजी तत्कालीन म्हैसूर संस्थानातील (आता कर्नाटकमधील) हसन येथे झाला. त्यांना सात बहिणी आणि एक भाऊ होता. त्यांचे वडील, एच. व्ही. कृष्णस्वामी, हैदराबादमधील निझाम कॉलेजमध्ये कन्नड भाषा आणि गणित शिकवत होते. राजा राव 4 वर्षांचे असतानाच त्यांची आई गौरम्मा यांचे निधन झाले. आईच्या जाण्याचा राजा राव यांच्या मनावर कायमस्वरूपी परिणाम झाला. त्यामुळे आईची अनुपस्थिती आणि अनाथत्व हे त्यांच्या साहित्यकृतींमध्ये वारंवार येणारे विषय झाले.
राव यांचे शालेय शिक्षण हैदराबाद येथे झाले. 1927 मध्ये त्यांनी फ्रेंच भाषा शिकायला सुरुवात केली शिवाय मद्रास विद्यापीठातून इंग्रजी आणि इतिहास या विषयांमध्ये पदवी देखील घेतली. पुढे त्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी 1929 मध्ये हैदराबाद सरकारची एशियाटिक शिष्यवृत्ती मिळाली.
हेही वाचा – पितळेच्या ग्लासात पाणी पिणे…
राव फ्रान्समधील मॉन्टपेलियर विद्यापीठात गेले. तिथे त्यांनी फ्रेंच भाषा आणि साहित्याचा अभ्यास केला. नंतर पॅरिसमधील सॉर्बोन येथे त्यांनी आयरिश साहित्यावरील भारतीय प्रभावाचा शोध घेतला. 1931 मध्ये त्यांनी मॉन्टपेलियरमध्ये फ्रेंच शिकवणाऱ्या कॅमिल मौली यांच्याशी लग्न केले. हे लग्न 1939 पर्यंत टिकले. ‘द सर्पेंट अँड द रोप’ या कादंबरीमध्ये राव यांनी आपल्या वैवाहिक जीवनातील अपयशाचे चित्रण केले. राव यांनी त्यांच्या पहिल्या काही कथा फ्रेंच आणि इंग्रजीमध्ये प्रकाशित केल्या. 1931- 32 मध्ये, त्यांनी ‘जय कर्नाटक’ या त्याकाळच्या प्रसिद्ध नियतकालिकासाठी कन्नडमध्ये चार लेख लिहिले.
1939 मध्ये भारतात परतल्यावर, त्यांनी इक्बाल सिंग यांच्यासोबत ‘ चेंजिंग इंडिया’ या ग्रंथाचे संपादन केले. 1943-44 मध्ये त्यांनी अहमद अली यांच्यासोबत मुंबईतून ‘टुमॉरो ‘ नावाच्या एका नियतकालिकाचे सह-संपादन केले . प्राचीन भारतीय संस्कृतीच्या मूल्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी समर्पित असलेल्या ‘श्री विद्या समिती’ या सांस्कृतिक संघटनेच्या स्थापनेत देखील त्यांचा मोठा वाटा होता. 1938 साली प्रकाशित झालेली कांथापुरा ही कादंबरी ब्रिटिशांविरुद्ध अहिंसक प्रतिकारावरील गांधीजींच्या शिकवणीच्या प्रभावाचे वर्णन करणारी होती.
1947 मधील ‘द काऊ ऑफ द बॅरिकेड्स’ या लघुकथा संग्रहानंतर 1960 साली त्यांचे ‘द सर्पेंट अँड द रोप’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यात भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीमधील संबंधांवर जसे भाष्य होते तसेच ते काहीसे आत्मचरित्रात्मक पुस्तकही होते.1965 मध्ये आलेली ‘कॅट अँड शेक्सपियर’ ही एक आध्यात्मिक विनोदी कादंबरी होती, ज्यात पूर्वीच्या कादंबऱ्यांमध्ये उपस्थित केलेल्या तात्विक प्रश्नांची उत्तरे दिली होती. याशिवाय अजून दोन कादंबऱ्या, 13 कथासंग्रह, पाच लेखसंग्रह इतकी साहित्यसंपदा राव यांच्या नावावर आहे.
त्यानंतर राव अमेरिकेत स्थलांतरित झाले आणि 1966 ते 1986 पर्यंत ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. तिथून ते मानद प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले.
मुल्कराज आनंद, आर. के. लक्ष्मण यांच्यासह भारतीय इंग्रजी लेखनाची पायाभरणी त्यांनी केली. इतकंच नव्हे तर या लेखनाला जागतिक स्तरावर मानाचं स्थान मिळवून दिलं. भारतीय परंपरा आणि संस्कृती यांची थोरवी राव यांनी आपल्या कथा-कादंबऱ्यांतून मांडली. ब्राह्मण्य, जातीयता, अस्पृश्यता, म. गांधी आणि स्वातंत्र्यलढा याविषयी राव यांनी प्रामुख्यानं लेखन केलं.
हेही वाचा – दिवाळीचा फराळ आणि मनाचं मेडिटेशन…
‘द सर्पेंट अँड द रोप’ या कादंबरीसाठी त्यांना 1963 साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. तर त्यांच्या संपूर्ण साहित्यिक योगदानाबद्दल 1988 साली न्यूशॅट इंटरनॅशनल प्राईज फॉर लिटरेचरने त्यांना सन्मानित करण्यात आले. भारत सरकारने 1969 साली पद्मभूषण आणि 2007 साली पद्मविभूषण पुरस्काराने त्यांचा गौरव केला. भारतीय अध्यात्म आणि तत्त्वज्ञान यांची साहित्य सुंदर गुंफण करणाऱ्या या महान साहित्यिकाचे 8 जुलै 2006 रोजी अमेरिकेतील ऑस्टिन येथे निधन झाले. त्यांच्या तिन्ही कादंबऱ्या आणि निवडक कथांचा एक संग्रह 2014 साली पेंग्विनने पुनर्मुद्रित स्वरूपात वाचकांना उपलब्ध करून दिला आहे.


