गजानन देवधर
भाग – 2
प्रवास म्हणजे वेगवेगळे अनुभव घेणं, माणसं वाचणं सुद्धा! माझी पत्नी उज्ज्वला आणि मी, आम्ही भारतात केलेल्या प्रवासातील असंख्य आठवणींपैकी काही अनपेक्षित किंवा हृदयस्पर्शी क्षण आमच्या स्मृतीत राहिले, त्या ठिकाणी भेटलेल्या गाईड्समुळे. ते गाईड आम्हाला फक्त ती ठिकाणे दाखवणारे, तिथली माहिती सांगणारे नव्हते तर, ते होते उत्कृष्ट कथाकार, भारतीय वारशाचा जिव्हाळा असणारे किंवा अकल्पित विद्वान सुद्धा! त्यांच्यापैकी प्रत्येकाने आमच्या मनात घर केले, कधी त्यांच्या ज्ञानामुळे, वागणुकीमुळे किंवा त्यांच्या विषयाच्या आवडीमुळे…
चंदेरीचे कल्लेभाई – इतिहासकार
सन 2015 मध्ये आमच्या मध्य प्रदेशातील प्रवासात मी आणि उज्वला आम्ही दोघांनी अनपेक्षितपणे एका ठिकाणी जायचे योजले. ओरछा पाहून झाल्यावर आमच्याकडे दोन दिवस अधिक होते. त्या दोन दिवसांत आम्ही चंदेरीला भेट द्यायची, असे ठरवले. इतिहास असलेले हातमागावरील विणकरांचे गाव… अजून त्या इतिहासातील अवशेष जपणारं! काही अंशी इतिहासात रमणारं एक शांत गाव. पर्यटक वाकडी वाट करून या गावाकडे फारसे येत नाहीत. आमच्या कार्यक्रमात दोन मोकळे दिवस असल्याने आम्ही हा वळसा घेण्याचे ठरवले, पण हा आमच्या प्रवासातला सर्वात अनपेक्षितपणे समृद्ध करणारा अनुभव ठरला.
चंदेरीला आम्ही पर्यटन विभागाच्या गेस्ट हाऊसमध्ये दुपारी बाराच्या सुमारास दाखल झालो. ते एक साधं पण आरामदायक ठिकाण वाटलं. पोहोचल्याबरोबर आम्ही व्यवस्थापकाला शहराच्या प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याच्या दृष्टीनं एक जाणकार गाईड मिळू शकेल का, असं विचारलं.
तो म्हणाला, “तुम्ही ताजेतवाने होऊन जेवण करून घ्या, तोपर्यंत मी गाईडची सोय करतो.”
आम्ही जेवण करून सोफ्यावर येऊन बसलो, तोच त्या व्यवस्थापकाने एका गृहस्थांना आमच्यासमोर आणले आणि तो म्हणाला, ”आजचे तुमचे गाईड आहेत कल्लेभाई, चंदेरीत यांच्यापेक्षा अभ्यासू गाईड तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही नशिबवान आहात.”
थोड्याच वेळात एक बुटके गृहस्थ – जेमतेम पाच फूट उंच, काळसर, साधे कपडे घातलेले पण बोलण्यात जबरदस्त आत्मविश्वास असलेले, लॉबीत आले.
“मी कल्लेभाई,” उर्दूमिश्रित हिंदीत संभाषणाला त्यांनी सुरुवात केली. म्हणाले, “तुम्हाला चंदेरी गाव पाहायचा आहे ना, चला तुम्हाला हवं त्या प्रमाणे मी दाखवतो.”
आम्ही निघालो, ड्रायव्हरच्या बाजूला बसून लगेच त्याने सूचना केली, “आता गाडी मी सांगतो तशी घेत रहा” आणि माझ्याकडे वळून म्हणाला, ”आपण आधी किल्ल्यापासून सुरुवात करू.” मी म्हटले ‘ठीक आहे.’ मीही त्याचा अंदाज घेत होतो. तो गाडीतच किल्ल्याची माहिती सांगू लागला. म्हणाला, “बॅकग्राउंड तयार असली की, किल्ला समजायला सोपं जाईल.” माहिती चांगली सांगत होता. त्याचा अभ्यास चांगला असल्याचे जाणवत होते.
हेही वाचा – ग्वाल्हेर आणि जैसलमेरला भेटलेले असाधारण गाईड!
आम्हीही मधे मधे त्याला प्रश्न विचारात होतो. मला बिजू बावरांची समाधी पहायची होती. त्याने किल्ल्यावर पोहोचल्यावर पहिल्यांदा त्या ठिकाणीच नेले, मग जोहाराचे पवित्र ठिकाण दाखवले, मन सुन्न करून टाकणारा सतींचा इतिहास त्यानं आमच्यासमोर उभा केला. बोलता बोलता त्याने मधेच थांबून मला विचारले, “साहेब तुम्ही प्राध्यापक आहात का इतिहासाचे?” मी हसलो, म्हटले “होय मी निवृत्त प्राध्यापक आहे हे बरोबर, पण फिजिक्सचा. इतिहासाची आवड आहे म्हणून इथपर्यंत आलो.”
मी त्याला विचारले, “इथे चार दिवसांपूर्वी पुरातत्व विभागाची आंतरराष्ट्रीय परिषद झाली का?” तो माझ्याकडे पाहायलाच लागला, म्हणाला “ते तुम्हाला कसे माहिती?” म्हटले, “अरे, आज चंदेरीला येताना धाब्यावर चहा प्यायला थांबलो होतो, तिथं एक स्थानिक पेपर होता. तो वाचत असताना मला ती बातमी दिसली.” माझे बोलणं संपायच्या आत त्यानं पँटच्या मागच्या खिशातून एक कागदाची घडी बाहेर काढली. ते वर्तमानपत्राचे कात्रण होते, ज्यात तीच बातमी होती.
तो म्हणाला, “या परिषदेच्या आयोजन समितीचा मी एक सदस्य होतो आणि ही बातमी सुद्धा मीच दिली आहे.”
तसेच त्याने अधिक माहिती पुरवली की, त्याने आत्तापर्यंत चंदेरी या विषयावर आंतरराष्ट्रीय स्तरावर तेरा शोधनिबंध सुद्धा लिहिले होते!
हळूहळू आमचे सूर जुळले, त्याने आम्हाला चंदेरीतील अनेक हटके ठिकाणं दाखवली. सगळीकडे फिरत असताना त्याला मिळणारा मान दिसत होता. आम्ही म्युझियमकडे गेलो. आमच्या गाडीतून कल्लेभाई उतरलेला पाहताच तेथील क्युरेटर त्यांच्या केबिनमधून उठून बाहेर आले आणि त्यांनी कल्लेभाईचे स्वागतही केले.
कल्लेभाईनी त्यांना सांगितले की, “मी माझ्या गेस्टना स्कार्फ तेवढा दाखवून येतो.”
“ते फक्त इतिहासकार नाहीत,” क्युरेटर म्हणाले, “तो एक निपुण विणकरसुद्धा आहेत.”
कल्लेभाई म्युझियममधील विशिष्ट ठिकाणी आम्हाला घेऊन गेले, तेथे शोकेसमधील तिरंग्याच्या रंगाचा असलेला एक स्कार्फ आम्हाला दाखवला आणि म्हणाले, “हा स्कार्फ मी विणलेला आहे. 1982 सालच्या दिल्लीच्या एशियन गेम्सच्या वेळेला विजेत्या खेळाडूंच्या गळ्यात असे स्कार्फ घातले होते आणि ते आम्हीच विणून दिले होते!”
संध्याकाळी ते आम्हाला त्यांच्या चंदेरीयान या विणकर संस्थेत घेऊन गेले, तिथे त्यांनी आम्हाला मागावर विणकामही करून दाखवले. हे सगळे होईतो रात्र झाली. आम्ही चहा घेतला तेव्हा त्यांनी आम्हाला इंग्रजी भाषेतील एक ‘चंदेरी’ नावाचं पुस्तक दाखवलं. सुंदरच होते ते. आत चंदेरीच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचं समृद्ध वर्णन होते. मी सहज किंमत पाहिली… अडीच हजार रुपये… लेखक : कल्लेभाई… मी उडालोच! मी त्याला पुस्तकाची रक्कम देऊ केली, पण त्यांनी ती नाकारली. “तुम्हाला या विषयाची आवड आहे, तुम्हाला पुस्तक भेट देताना मला आनंद होत आहे…”, ते म्हणाले.
मनात म्हटलं, ‘आज आपल्याला एक अभ्यासू संशोधक आणि लेखक गाईड म्हणून लाभला. त्यांनी आपलं पुस्तक मला भेट म्हणून दिले. आजचा दिवस सार्थकी लागला.’ आजही ते पुस्तक पाहिले की कल्लेभाईची बटू मूर्ती डोळ्यासमोर येते.
त्या दिवशी आम्ही फक्त गाईड भाड्याने घेतला नव्हता. आम्हाला एक असा माणूस भेटला होता, जो त्याच्या शहराचं, त्याच्या पद्धतीनं प्रतिनिधित्व होता. विद्वत्तेने इतिहासकार, परंपरेने विणकर, स्वभावाने आठवणींचा संरक्षक! कल्लेभाई हा आमच्या प्रवासात भेटलेल्या सर्वोत्कृष्ट व्यक्तींपैकी एक होता आणि राहीलही…
चिदंबरम नटराज मंदिरातील वनस्पतिशास्त्रज्ञ
आम्ही दोघे आणि आमचे स्नेही जोडपे सौ व श्री औंधे असा चौघांनी 2018 मध्ये दक्षिणेकडील तामिळनाडूचा तेरा दिवसांचा प्रवास केला. औंधे वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक आणि त्यांची पत्नी, शाळेतील शिक्षिका. या प्रवासात अनेक प्रख्यात आणि शिल्पकलेचा नमुना असलेली मंदिरं आम्ही पाहिली, त्यात काही जागतिक वारसा स्थळेही होती! त्यांच्यामध्ये एक होते चिदंबरमचं “थिलाई चिदंबरम नटराज” मंदिर. या मंदिरात आपल्याला शिवाचे दर्शन आनंद नटराज स्वरुपात होतं.
आम्ही तेथं पोहोचलो आणि मंदिराचे गोपुर पाहूनच मन प्रसन्न झाले. आम्ही हेही ऐकून होतो की, मंदिरात भरत मुनींच्या नृत्य शास्त्रातील एकशे आठ मुद्रा, शिल्प स्वरुपात दर्शवलेल्या आहेत.
एवढे भव्य मंदिर आणि त्याचा विस्तीर्ण परिसर पाहायचा आणि नीट समजून घ्यायचा असेल तर, चांगला मार्गदर्शक हवाच. आम्ही प्रवेशद्वारावर उभे राहून बोलत असतानाच टिपिकल तामीळ लहेजातील इंग्रजीत कोणीतरी मृदू आवाजात विचारलं, “आपल्याला मी मदत करू शकेन. मी इथे गाईड म्हणून सेवा देतो.”
तो व्यावसायिक गाईडसारखा दिसत नव्हता. त्याच्याकडे कोणताही बॅच नव्हता… औपचारिक पोशाख नव्हता… फक्त सौम्य वर्तन, आदरयुक्त स्वर आणि प्रामाणिकता दर्शवणारे शांत डोळे.
औंधेला म्हटलं, “चला आपलं काम झालं, कोणीतरी गाईड हवाच होता.”
त्याने माहिती सांगायला सुरवात केली. डोळे मिटून, दोन्ही हातांची बोटे एकमेकाला लावून हात हलवत बोलण्याची त्याची पद्धत मजेशीर होती. प्रास्ताविक झाल्यावर तो प्रत्येक ठिकाणाचे वर्णन मात्र सविस्तर सांगे आणि “एनी डाऊट्” असे विचारी. त्याने आम्हाला विस्तीर्ण कॉरिडॉरमधून फिरवले, आम्ही दर्शन घेऊ येईस्तोपर्यंत बाहेर शांतपणे बसून राहायचा. त्याने आम्हाला तेथील केवळ वास्तुकला नव्हे तर, प्रत्येक घटकात गुंफलेल्या प्रतीकांचे स्पष्टीकरण सुद्धा दिले. भगवान शिवाच्या वैश्विक नृत्याची कथा, मानवी शरीराचे प्रतिनिधित्व करणारा मंदिराचा अनोखा नकाशा, चिदंबर रहस्याची गर्भगृहे… सर्व काही त्याने आमच्यासमोर उलगडलं. तो इंग्रजीत बोलत होता आणि मधेच कधी तामीळ किंवा कधी हिंदीत बोलायचा.
हेही वाचा – हेरोडेस अटिकस येथील संगीतमय रात्र
आमच्या चालण्यातील एका विश्रामात मी त्याला सहजच तेथील पर्यटन हंगाम आणि तो पूर्ण वेळ गाईड म्हणून रोज किती तास काम करतो, याबद्दल विचारले.
तो हसला आणि म्हणाला, “नाही, साहेब. मी हे काम गरज म्हणून फक्त अर्ध वेळ करतो. आठवड्यातला बराचसा वेळ मी जवळच्या वनस्पती संशोधन संस्थेत काम करतो.”
मी काही बोलण्याआधी औंधे चटकन त्याच्याकडे वळला आणि त्याने गाईडला विचारले, “तुम्ही वनस्पति संशोधनात आहात?”
त्या प्रश्नामुळे संपूर्ण संवादाचा पोतच बदलला.
काही मिनिटांतच ते दोघे गंभीर चर्चेत गुंतले, वनस्पती वर्गीकरण, पश्चिम घाटांच्या लुप्तप्राय प्रजाती, हर्बेरियम पद्धती आणि असे बरेच काही ते बोलत होते. मी मागे उभा होतो, कुतूहलानं आणि आश्चर्यानं आमच्या गाईडकडे पाहात. पुढे संभाषणातून असं समजलं की, हा मृदु बोलणारा चिदंबरम मंदिरातला गाईड वनस्पतिशास्त्रात पीएचडी, पोस्ट डॉक्टरल संशोधक आणि आशावादी नोकरी शोधक होता. पण योग्य ती नोकरी मिळेपर्यंत तो भक्तिभावाने त्याच्या आवडत्या मंदिरात हे काम करत होता, स्वतःचा उदरनिर्वाह करत होता.
आम्ही थक्क झालो. आणि किंचित वरमलो देखील. इथे एक माणूस होता ज्याने उमेदीने काही वर्षे शैक्षणिक जर्नल्स, फील्डवर्क आणि सूक्ष्मदर्शी अभ्यासामध्ये घालवली होती, तरीही आता भेट देणाऱ्या अभ्यागतांना विनम्रपणे चिदम्बरमच्या प्राचीन मंदिराभोवती माफक फीसाठी फिरवत होता.
आम्ही आपले आश्चर्य आणि चिंता व्यक्त केली, तेव्हा त्याने फक्त म्हटलं, “साहेब, काम म्हणजे काम! आणि मला हे मंदिरसुद्धा आवडतं. माझ्या या कामामुळे मी लोकांशी बोलू शकतो, सक्रिय राहू शकतो आणि योग्य संधीची वाट पाहात असताना माझे मन शांत ठेवू शकतो.”
त्याच्या आवाजात कोणतीही कटुता नव्हती.
आम्ही मंदिरातून बाहेर पडताना मी पुन्हा एकदा गोपुरमकडे पाहण्यासाठी मागे वळलो, पण यावेळी त्या गाईडला हात हलवून निरोप दिला आणि मनातून खूप खूप शुभेच्छा सुद्धा..
या सगळ्या प्रवासात एक जाणीव नक्की झाली की, एखादा देश खऱ्या अर्थाने, फक्त त्याच्या स्मारकांमध्ये किंवा संग्रहालयांमध्ये आढळत नाही. तो अशा लोकांमध्ये आढळतो जे आपल्याला अचानक भेटतात, जे कदाचित विद्वान, अज्ञात कलाकारही असतात, अनेकदा दुर्लक्षित! तरीही तितकेच तेजस्वी.
(समाप्त)
dscvpt@gmail.com / मोबाइल – 9820284859


