मागील लेखांत आपण लवकर झोपायला जाणे, सुखनिद्रा घेणे आणि लवकर उठणे या दिनचर्येतील महत्त्वाच्या बाबींविषयी जाणून घेतले. या लेखात आपण आहाराच्या वेळा आणि प्रमाण याबद्दल मार्गदर्शन घेणार आहोत.
आपले शरीर आहारातून निर्माण झाले आहे, हे ध्यानात घेता आहार आणि शरीर यांतील संबंध सहजी लक्षात येतो.
आहाराची उद्दिष्ट्ये
- शरीराची झीज भरून काढणे.
- शरीराची वाढ करणे.
- शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे.
हे सर्व साध्य करण्यासाठी आपला आहार संतुलित, सात्त्विक आणि पौष्टिक असायला हवा. आपल्या दिनचर्येत आहाराच्या वेळा तसेच प्रमाण या दोनही बाबींना अतिशय महत्त्व आहे.
हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : रात्री झोपण्याची वेळ महत्त्वाची
आहाराच्या वेळा
आहार घेण्याची वेळ ठरलेली असावी. त्यात वारंवार बदल करू नये. दिनचर्येत खालील पद्धतीने आहाराच्या वेळेचे नियोजन करावे :
- न्याहारी / नाश्ता – सकाळी 8 ते 8.30 च्या दरम्यान.
- दुपारचे जेवण – दुपारी 12.30 ते 1 च्या दरम्यान.
- मधल्या वेळेचा आहार – दुपारी 4.30 ते 5 च्या दरम्यान.
- रात्रीचे जेवण – 7.30 ते 8 च्या दरम्यान.
आहाराचे प्रमाण
सर्वसाधारणपणे आहाराचे प्रमाण खालील प्रमाणे असावे.
- सकाळची न्याहारी/नाश्ता – सकाळी उठल्यावर लागणारी भूक शमविण्यासाठी सेवन केलेला आहार दिवसातील महत्त्वाचा आहार आहे. दिवसभरासाठी आवश्यक ऊर्जा मिळावी म्हणून सकाळचा नाश्ता पोटभर व्यवस्थित असणे आरोग्यास हितकारक आहे.
- दुपारचे जेवण – यावेळेस पचनक्रिया उत्तम रीतीने कार्यरत असते. त्यामुळे मध्यम प्रमाणात घेतलेला आहार आरोग्यास उत्तम आहे.
- मधल्या वेळचा आहार – दोन जेवणांच्या मधल्या वेळेत भूक लागल्यास गरजेनुसार अल्प आहार/पेय घ्यावे.
- रात्रीचे जेवण – रात्रीच्या वेळी शारीरिक हालचाली कमी होतात. म्हणून पचायला सुलभ आणि हलका मिताहार आरोग्यास हितावह आहे.
आहारासंबंधी सर्वांना माहीत असलेले विधान म्हणजे ‘सकाळचा नाश्ता राजपुत्रासारखा, दुपारचे जेवण राजासारखे आणि रात्रीचे जेवण भिकाऱ्यासारखे असावे.’
हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : सुखनिद्रेसाठी निवडक उपयुक्त उपाय
याबाबतीत लक्षात ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे योग्य प्रमाणात घेतलेला आहार प्रकृतीस हितकारक असतो. आहाराचे प्रमाण ठरवताना चवीपेक्षा आरोग्यास प्राधान्य द्यावे, म्हणजेच, आहार सेवन करताना जिभेचा सल्ला न मानता पोटाचा सल्ला घ्यावा. डाएटबद्दल सांगायचे झाल्यास – Dieting is not about starving. It is changing from tongue conscious food to health conscious food.
निरामय आरोग्यासाठी आहाराच्या वेळा तथा प्रमाण यांचे नियमित पालन करणे नितांत आवश्यक आहे.
निरामय आरोग्य संकल्पनेतील माझ्या आहार-विहार आणि मानसिक आरोग्य या पुस्तकांत ‘पौष्टिक, पोषक आणि सात्त्विक आहार’ तसेच ‘आरोग्यदायी सात्त्विक आहार’ या विषयांवर उपयुक्त मार्गदर्शन केले आहे.
क्रमशः


