स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये अशाच काही टीप्स पाहूयात –
- ब्रेडचे 1 ते 2 स्लाइस, पाणी घालून मिक्सरमधून पेस्ट करून ती पेस्ट धिरड्याच्या पिठात घातल्यास धिरडी खमंग कुरकुरीत होतात.
- डाळीच्या पिठाची शेव करताना ती हलकी आणि खुसखुशीत लागावी, म्हणून पीठ कांद्याच्या रसात भिजवावे. शेवेला कांद्याचा चांगला वास येतो. मोहन लागत नाही. तसेच खायचा सोडाही घालू नये. एक किलो डाळीच्या पिठात दोन वाट्या कांद्याचा रस घालावा. भरीस पाणी घालून पीठ भिजवावे.
- इडल्या हलक्या आणि लुसलुशीत होण्यासाठी पीठ वाटून झाल्यावर त्यात ताक घालावे.
- इडलीच्या मिश्रणात आयत्या वेळी शिजलेला एक वाटी भात मिक्सरमधून काढून घातल्यास सोडा न घालताच इडली डबल फुगते आणि मऊ होते. त्यामुळे पोटात गॅस होणे इत्यादी प्रकार टाळता येतात.
हेही वाचा – Kitchen Tips : मिरच्यांच्या ठेच्याचा हिरवेगारपणा अन् पनीर, साजूक तूप, दही
- पुडिंग अगर ब्रेडरोल इत्यादी पदार्थांसाठी ब्रेड तळताना कडकडीत तेलात वा तुपात तळावे म्हणजे जास्त तेल शोषून घेत नाहीत.
- भजी करताना त्यात पिठाच्या प्रमाणानुसार दोन-तीन चमचे रवा मिसळावा. भजी नेहमीपेक्षा खूप खुसखुशीत होतात.
- भजी करताना त्या पिठातच थोडा पुदिना बारीक चिरून घालावा. स्वाद छान येतो. चटणीची गरज भासत नाही.
- पेपर डोसा करताना मिश्रणात (3:1 तांदूळ + उडीद डाळ), अर्धी वाटी भगर आठ तास भिजवून त्यात वाटून घातल्यास डोसा छान कुरकुरीत होतो. चिवटपणा कमी होतो.
हेही वाचा – Kitchen Tips : टोमॅटो, आले-लसणाची पेस्ट अन् अलवार पोळ्यांसाठी…
- केक करताना केकच्या मिश्रणात एक चमचा ‘ग्लिसरीन’ घातल्याने केक मऊ राहतो.
- चिवडा जास्त तेलकट झाला, तर थोडेसे मेतकूट लावावे, तेलकटपणा कमी होतो.
- अंडी खाणाऱ्यांनी धिरड्याचे पीठ भिजवताना त्यात एक अंडे फेसून घालावे म्हणजे धिरडी छान जाळीदार होतात.
- छोले-भटुरे करताना भटुऱ्यासाठी मैदा भिजविताना त्यात एक मोठा बटाटा उकडून किसून घालावा. म्हणजे भटुरे चिवट होत नाहीत. खुसखुशीत होतात आणि मोहनही घालावे लागत नाही. आंबट ताक आणि थोडा सोडा घातला म्हणजे भटुरे छान होतात.


