Wednesday, July 30, 2025

banner 468x60

Homeललितआत्मविश्वास... कधी कमी तर, कधी जास्त

आत्मविश्वास… कधी कमी तर, कधी जास्त

मनोज जोशी

आयुष्यात आपण अनेकदा आत्मविश्वास दाखवत, त्याच आत्मविश्वासाने बोलत असतो.. व. पु. काळे यांचे एक वाक्य आहे – ‘दोन रुपये देऊन चपलेचा अंगठा शिवल्यावर साधारणपणे चर्मकाराकडे ‘पुन्हा तुटणार तर नाही ना?’ असे विचारून खातरजमा केली जाते. म्हणजेच, माणसाला प्रत्येकवेळी गॅरंटी हवी असते. पण अशी गॅरंटी मागणारा, किती काळ जगणार आहे, याची काहीच गॅरंटी नसते.’

वपुंचे हे कथन वास्तव असले तरी, हा विषय फक्त गॅरंटीपुरताच नाही. प्रत्येकजण दिवसातून अशा अनेक गोष्टी आत्मविश्वासाने करत असतो; जणूकाही गॅरंटीच असावी.

आता हे सांगायचे काय कारण? असे वाटू शकते. पण त्याचाही संदर्भ आहे. अलीकडेच तसा विचार माझ्या मनात येऊन गेला. विषय अगदी साधा होता. 2020मध्ये नोकरीनिमित्त मी हैदराबादला गेलो होतो. (1 मार्च 2020 रोजी मी हैदराबादला पोहोचलो आणि 24 मार्च 2020 रोजी देशभरात लॉकडाऊन लागू झाले.) ऑफिसला डबा घेऊन जात असल्याने सकाळी स्वयंपाकाची रोजची धावपळ होत असे. (याबाबतीत ‘प्रशिक्षणार्थी’ असल्याने धावपळच म्हणतो.) अशाच एका सकाळी कुकरची वाफ जाण्याची वाट पाहात होतो. तेव्हा मनात विचार आला, दोन दिवसांनी साप्ताहिक सुट्टी आहे. तेव्हा किचन प्लॅटफॉर्म व्यवस्थित धुऊन घेऊ. नंतर ऑफिसला जाण्याची तयारी करता-करता सुट्टीत अमुक एक काम करेन, तमुक काम करेन… अशी जंत्रीच तयार केली.

सर्व आटोपून घरातून निघालो आणि बसमध्ये बसल्यावर सुट्टीत करायच्या कामांची पुन्हा एकदा उजळणी केली. याच विचारात असताना माझी बस एका हॉस्पिटलवरून गेली… अन् डोळ्यासमोर ऑगस्ट 2020मधील तो प्रसंग उभा राहिला. तेव्हाच माझी ट्युबलाइट पेटली आणि हसायला आले. आत्ताच अडीच-तीन महिन्यांपूर्वी ‘होत्याचं नव्हतं’ होण्याची वेळ आली होती आणि आता दोन दिवसांनी येणाऱ्या सुट्टीत काय-काय करायचे, याची यादी तयार करत होतो!

हेही वाचा – कल्याण ते मुंबई : विनातिकीट रेल्वे प्रवास – एक चिंतन

पण मनातल्या मनात गोष्टी ठरवण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. पूर्वी देखील अशी ‘मुंगेरीलालची स्वप्नं’ अनेक वेळा पाहिली आहेत. सकाळी उठल्यावर दात घासताना, ‘आजपासून सिगारेट प्यायची नाही,’ असा संकल्प हजारवेळा तरी केला असेन. असे संकल्प बहुतांश सर्वचजण करत असतात. पण तो दिवस काही लगेच येत नाही. तीच गोष्ट व्यायामाची! काही नाही तर, नव्या वर्षाचा संकल्प तर, असतोच! पण उद्याचा दिवस पाहाणारच, हा आत्मविश्वास महत्त्वाचा! यात गैर काहीच नाही. याच आत्मविश्वासावर माणूस उभा असतो. म्हणूनच तर म्हटले जाते की, ‘उम्मीद पर दुनिया कायम हैं।’

हा आत्मविश्वास आपण प्रत्येक बाबतीत ठेवत नाही, ही कमतरता आहे. अर्थात, हे प्रत्येकाच्या बाबतीत असेल, असे नाही. पण मला तरी तसे वाटते की, यातून सर्वजण जातात. अन्यथा टेन्शन- मानसिक ताण आलाच नसता. एखादी अडचण उभी राहिल्यानंतर यातून हमखास मार्ग निघणारच, असा आत्मविश्वास प्रत्येकवेळी बाळगता येत नाही. म्हणजेच, उद्या आपण असे करू, तसे करू, हा आत्मविश्वास, एखादी समस्या निर्माण झाल्यावर कुठे गायब होतो, ते समजतही नाही.

काही जण अतिशय आत्मविश्वासाने बेधडक खोटे बोलत असतात. त्यांना ही सवयच लागलेली असते – खोटं बोल, पण रेटून बोल… म्हणजे समोरच्याला खरंच वाटले पाहिजे! कुठून एवढा आत्मविश्वास आणतात, देव जाणे!! प्रसिद्ध हास्यकवी मुस्ताक अहमद यूसुफी यांनी म्हटले आहे – यदि बोलने वाला और सुनने वाला दोनों जानते हों कि यह झूठ है, तो यह गुनाह नहीं है.

हेही वाचा – बरसणारा पाऊस अन् सहलीचा चिंब आनंद

एकूणच, या जगात सर्वात सोपी गोष्ट काय आहे, तर दुसऱ्यांना उपदेश देणे! ‘संकटाच्या काळात मानसिक ताणावाखाली न जाता, त्या संकटाला आत्मविश्वासाने सामोरे जायला हवे.’ हा उपदेश देखील तसाच आहे. सोशल मीडियावरचा हिट कोट आहे. पण याचा गांभीर्याने विचार केला तर, त्या दृष्टीने प्रयत्न करायला काय हरकत आहे. माझे तरी प्रयत्न सुरू आहेत…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!