सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय बारावा
अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्मपरमो भव। मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि ॥10॥
कां अभ्यासाही लागीं। कसु नाहीं तुझां आंगीं। तरी आहासी जया भंगीं। तैसाचि अस ॥114॥ इंद्रियें न कोंडीं। भोगातें न तोडीं। अभिमानु न संडीं। स्वजातीचा ॥115॥ कुळधर्मु चाळीं। विधिनिषेध पाळीं। मग सुखें तुज सरळी। दिधली आहे ॥116॥ परी मनें वाचा देहें। जैसा जो व्यापारु होये। तो मी करीतु आहें। ऐसें न म्हणें ॥117॥ करणें कां न करणें। हें आघवें तोचि जाणे। विश्व चळतसे जेणें। परमात्मेनि ॥118॥ उणयापुरेयाचें कांहीं। उरों नेदीं आपुलां ठायीं। स्वजातीचि करूनि घेईं। जीवित हें ॥119॥ माळियें जेउतें नेलें। तेउतें निवांतचि गेलें। तया पाणिया ऐसें केलें। होआवें गा ॥120॥ ॥121॥ एऱ्हवीं तरी सुभटा। उजू कां अव्हाटां। रथु काई खटपटा। करितु असे ॥121॥ म्हणोनि प्रवृत्ति आणि निवृत्ती। इयें वोझीं नेघे मती। अखंड चित्तवृत्ती। आठवीं मातें ॥122॥ आणि जें जें कर्म निपजे। तें थोडें बहु न म्हणिजे। निवांतचि अर्पिजे। माझ्यां ठायीं ॥123॥ ऐसिया मद्भावना। तनुत्यागीं अर्जुना। तूं सायुज्यसदना। माझिया येसी ॥124॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जे मन बुद्धि इहीं घर केलें माझां ठायीं
अर्थ
अभ्यासयोगाला देखील असमर्थ असलास तर सर्वस्वी माझ्याकरता कर्मे करणारा हो. माझ्याकरितांसुद्धा कर्मे केलीस तरी तू सिद्धी मिळवशील ॥10॥
अथवा असा अभ्यास करण्याविषयीसुद्धा जर तुझ्या अंगी सामर्थ्य नसेल तर हल्ली ज्या स्थितीत तू आहेस, त्या स्थितीत रहा ॥114॥ इंद्रियांचा निग्रह करू नकोस, विषयभोगांना कमी करू नकोस, आपल्या जातीचा अभिमान सोडू नकोस ॥115॥ आपल्या कुळातील आचारांचे रक्षण कर व शास्त्रांनी जी कर्मे करावी असा विधि सांगितला आहे, ती कर्मे कर व जी कर्मे करू नकोस असा निषेध केला आहे ती कर्मे करू नकोस. एवढे तू केलेस म्हणजे सुखाने तुला वाटेल तसे वागावयास मोकळीक दिली आहे ॥116॥ परंतु मनाने, वाचेने व देहाने जसे जे कर्म होईल ते कर्म मी करीत आहे असे म्हणू नकोस ॥117॥ (कारण) ज्या परमेश्वराच्या सत्तेने हे विश्व चालले आहे, त्यालाच कोणतीही गोष्ट करणे अथवा न करणे हे सर्व ठाऊक आहे ॥118॥ कर्मांत काही न्यून अथवा पूर्ण झाले तर त्याच्या संबंधाने तू आपल्या चित्ताच्या ठिकाणी काही (खंती अथवा संतोष) उरू देऊ नकोस. आणि तू हे जीवित आपल्या जातीचे करून टाक. म्हणजे आपला आयुष्यक्रम आपल्या जातीला योग्य अशी कर्मे करण्यात घालव ॥119॥ अरे माळ्याने जिकडे नेले तिकडे काही एक तक्रार न करता जाणार्या पाण्याप्रमाणे तुझे जीवित निरभिमान होऊन कर्म करणारे होऊ दे ॥120॥ अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर आपला मार्ग सरळ आहे किंवा तो आडमार्ग आहे याची वाटाघाट रथ केव्हा तरी करतो काय ॥121॥ म्हणून कोणतेही कर्म करण्याची प्रवृत्ति अथवा न करण्याची निवृत्ति ही ओझी तू आपल्या बुद्धीवर घेऊ नकोस. तर तू आपल्या चित्तवृत्तीने मला निरंतर स्मर ॥122॥ आणि जे जे कर्म घडेल ते कमी अथवा जास्त म्हणू नकोस. तर ते निमूटपणाने माझ्या ठिकाणी अर्पण कर ॥123॥ अर्जुना, अशा माझ्या रूपाच्या अनुसंधानाने शरीरत्यागानंतर तू सायुज्यमुक्तिरूप माझ्या घरी येशील ॥124॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : विष कीं आहारीं पडे, समुद्रीं पायवाट जोडे


