अध्याय तेरावा
एकीं धर्माचिया वाहणी । गाळूं आदरिलें पाणी । तंव गाळितया आहाळणीं । जीव मेले ॥234॥ एक न पचितीचि कण । इये हिंसेचे भेण । तेथ कदर्थले प्राण । हेचि हिंसा ॥235॥ एवं हिंसाचि अहिंसा कर्मकांडीं हा ऐसा । सिद्धांतु सुमनसा । वोळखें तूं ॥236॥ पहिलें अहिंसेचें नांव । आम्हीं केलें जंव । तंव स्फूर्ति बांधली हांव । इये मती ॥237॥ तरि कैसौनि ययातें गाळावें । म्हणोनि पडिलें बोलावें । तेवींचि तुवांही जाणावें । ऐसा भावो ॥238॥ बहुतकरूनि किरीटी । हाचि विषयो इये गोष्टी । एऱ्हवी कां आडवाटीं । धाविजैल ॥239॥ आणि स्वमताचिया निर्धारा- । लागोनियां धनुर्धरा । प्राप्तां मतांतरां । निर्वेचु कीजे ॥240॥ ऐसी हे अवधारीं । निरूपिती परी । आतां ययावरी । मुख्य जें गा ॥241॥ तें स्वमत बोलिजेल । अहिंसे रूप किजैल । जेणें उठलिया आंतुल । ज्ञान दिसे ॥242॥ परि तें अधिष्ठिलेनि आंगें । जाणिजे आचरतेनि बगें । जैसी कसवटी सांगे । वानियातें ॥243॥ तैसें ज्ञानामनाचिये भेटी । सरिसेंचि अहिंसेचें बिंब उठी । तेंचि ऐसें किरीटी । परिस आतां ॥244॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : केळीचें दळवाडें, हळू पोकळ आवडे
अर्थ
कित्येकांनी धर्ममार्ग म्हणून पाणी गाळण्याला आरंभ केला; तेव्हा त्या गाळण्याच्या तापाने जीव मेले ॥234॥ कित्येक या हिंसेच्या भयाने धान्य शिजवीत नाहीत (तर कोरडेच धान्य खातात. ते कच्चे धान्य त्यांस पचत नाही त्यामुळे) त्यांचे प्राण कासावीस होतात, हीच हिंसा होय ॥235॥ याप्रमाणे हे चांगल्या मनाच्या अर्जुना, हिंसेलाच अहिंसा ठरवण्याचा असा हा कर्मकांडात सिद्धांत आहे, तो तू नीट समजून ठेव. ॥236॥ जेव्हा आम्ही पहिल्या प्रथम अहिंसेच्या नावाचा उच्चार केला तेव्हा ही मते सांगावीत अशी स्फूर्तीलाच हाव झाली, ॥237॥ तर या मतांना कसे गाळावे ? म्हणून आम्हाला बोलणे भाग पडले. त्याचप्रमाणे तुलाही निरनिराळी मते माहीत व्हावीत, असा हे प्रतिपादन करण्यात आमचा हेतु होता. ॥238॥ अर्जुना, बहुतकरून या अहिंसेसंबंधी काही बोलावयास लागले की त्या प्रतिपादनात हाच (वर सांगितलेला हिंसात्मक अहिंसांचा) विषय आढळतो. (म्हणून आम्ही त्याची चर्चा केली); नाहीतर हाती घेतलेल्या विषयाच्या प्रतिपादनाचा धोपट मार्ग सोडून मतमतांतरे सांगण्याच्या आडवाटेला कशाला जावे लागले असते ? ॥239॥ आणि अर्जुना, आपल्या स्वत:च्या मताच्या निश्चयाकरिता जी दुसरी मते विचारात घेणे जरूर असेल, त्यांचाही निर्णय केलाच पाहिजे. ॥240॥ याप्रमाणे ही निरूपण करण्याची पद्धति आहे, असे समज. आता अर्जुना, यानंतर मुख्य जे ॥241॥ ते आमचे मत सांगण्यात येईल. अहिंसेची नीट कल्पना येईल, असे लक्षण करण्यात येईल. ही अहिंसा चित्तात प्रगट झाली असता त्या चित्तात ज्ञान आहे असे दिसेल. ॥242॥ पण ज्याप्रमाणे कसोटी सोन्याचा कस ठरविते; त्याप्रमाणे अहिंसेने वास्तव्य केलेल्या शरीराच्या आचरणाच्या रीतीवरून त्या शरीरात अहिंसा राहात आहे, असे जाणले जाते. ॥243॥ त्याप्रमाणे मनात ज्ञान उत्पन्न झाल्याबरोबर अहिंसेचे चित्र उमटते, ते चित्र असे असते, अर्जुना, ऐक. ॥244॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : नाना रोगीं अहाळलीं, लोळतीं भूतें देखिलीं


