साहित्य
- चण्याचे पीठ (बेसन) – एक वाटी
- मैदा – एक चमचा
- आंबट ताक – पाऊण वाटी
- पाणी – दोन वाट्या
- खोवलेले ओले खोबरे – एक वाटी
- तिखट – चवीनुसार
- मीठ – चवीनुसार
- हळद – चवीनुसार
- चिरलेली कोथिंबीर – एक वाटी
- फोडणीची सामग्री
हेही वाचा – Recipe : स्वादिष्ट बहुरंगी खीर अन् खीरमोहन
कृती
- ताक आणि पाणी मिसळून, त्यात चण्याचे पीठ कालवावे आणि एक चमचा मैदा घालावा.
- पिठात चवीप्रमाणे तिखट, मीठ आणि हळद घालावी. त्यानंतर पीठ शिजावयास ठेवावे. शिजवताना सारखे ढवळत राहावे. ढवळताना थांबू नये, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत.
- पीठ चांगले शिजले, म्हणजे झाकण ठेवून मंद आचेवर दोन वाफा देऊन घ्याव्या.
- त्यानंतर फोडणी करून घ्यावी; फोडणीत हळद घालू नये.
- नंतर ताटे घेऊन, ती कोरडी करून घ्यावीत. एका ताटास दोन-तीन चमचे या प्रमाणात तयार केलेल्या वरील शिजविलेले पीठ घेऊन, ते गरम असतानाच ताटावर अगदी पातळ पसरावे. हाताला अगर ताटाला तेल लावू नये.
- वरील प्रमाणात तयार केलेले सुरळीच्या वड्यांचे पीठ ताटाच्या दोन्ही बाजूस याप्रमाणे अंदाजे पाच ताटांना पीठ लावून होईल.
- खोबऱ्याला थोडी मिरची आणि मीठ वाटून लावावे. ते खोबरे आणि कोथिंबीर पसरलेल्या पिठावर घालावी. मग त्यावर फोडणी घालावी.
- नंतर ताटावर सुरीने उभे कापून पाच पट्ट्या पाडाव्या. प्रत्येक पट्टीची एक गोल वळकटी करावी.
- हे पीठ ताटावर पसरत असताना पीठ गरम राहण्यासाठी भांडे शेगडीवरच ठेवावे. खाली उतरवून ठेवू नये. कारण गार झाल्यावर पीठ पसरता येत नाही.
हेही वाचा – Recipe : तांदळाची, गव्हल्याची अन् दुधीभोपळ्याची खीर
टिप्स
- ताटाऐवजी प्लास्टिकच्या कागदावर (जरा जाड कागद) पीठ पसरले, तरी चालेल.
(‘रुचिरा’ पुस्तकातून साभार)
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


