अध्याय तेरावा
आतां मन तयाचें । सांगों म्हणों जरी साचें । तरी सांगितले कोणाचे । विलास हे ॥292॥ काइ शाखा नव्हे तरु ? । जळेंवीण असे सागरु? । तेज आणि तेजाकारु । आन काई ॥293॥ अवयव आणि शरीर । हे वेगळाले काइ करि । कीं रसु आणि नीर । सिनीं आथी ॥294॥ म्हणोनि हे जे सर्व । सांगितले बाह्य भाव । ते मनचि गा सावयव । ऐसें जाणें ॥295॥ जें बीज भुईं खोंविलें । तेंचि वरी रुख जाहलें । तैसें इंद्रियाद्वारीं फांकलें । अंतरचि ॥296॥ पैं मानसींचि जरी । अहिंसेची अवसरी । तरी कैंची बाहेरी । वोसंडेल ? ॥297॥ आवडे ते वृत्ती किरीटी । आधीं मनौनी उठी । मग ते वाचे दिठी । करांसि ये ॥298॥ वांचूनि मनींचि नाहीं । तें वाचेसि उमटेल काई । बींजेवीण भुईं । अंकुर असे ॥299॥ उगमींचि वाळुनि जाये । तें वोघीं कैचें वाहे । जीवु गेलिया आहे । चेष्टा देहीं ॥300॥ म्हणौनि मनपण जैं मोडे । तैं इंद्रिय आधींचि उबडें । सूत्रधारेंवीण साइखडें । वावो जैसें ॥301॥ तैसें मन हें पांडवा । मूळ यया इंद्रियभावा । हेंचि राहटे आघवां । द्वारीं इहीं ॥302॥ परी जिये वेळीं जैसें । जें होऊनि आंतु असे । बाहेरि ये तैसें । व्यापाररूपें ॥303॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : आटु वेगु विंदाणु, आशा शंका प्रतारणु
अर्थ
आता त्याचे मन खरोखर सांगतो म्हणून जर म्हटले, तर आतापर्यंत जे व्यापार सांगितले ते कोणाचे? ॥292॥ फांद्या म्हणजेच झाड नव्हे काय? समुद्र हा जलाशिवाय आहे काय? प्रकाश आणि सूर्य हे वेगळे आहेत काय? ॥293॥ शरीर आणि शरीराचे अवयव हे खरोखर वेगळे आहेत काय? किंवा ओलावा आणि पाणी निराळी आहेत काय? ॥294॥ म्हणून ही जी सर्व बाह्य लक्षणे सांगितली ती मूर्तिमंत मनच असे समज. (वर सांगितलेले सर्व व्यवहार मनाचेच आहेत). ॥295॥ ज्याप्रमाणे भुईत पेरलेले बी तेच वर वृक्ष होते, त्याप्रमाणे मनच इंद्रियद्वारा पसरले आहे. ॥296॥ परंतु, मनातच जर अहिंसा नसेल तर बाहेर कशी येईल? ॥297॥ अर्जुना कोणतीही वृत्ती प्रथम मनात उत्पन्न होते व मग ती (वृत्ती) वाचा, दृष्टी, हात वगैरे इंद्रियांकडे येते. ॥298॥ याशिवाय जे मनातच नाही, ते वाचेत प्रगट होईल काय? बीजाशिवाय जमिनीत अंकुर आहे काय? ॥299॥ जे पाणी उगमाच्या ठिकाणीच वाळून गेले आहे ते (नदीच्या) ओघामधे कोठून वाहील? (शरीरातून) जीव गेल्यानंतर त्या देहाच्या ठिकाणी हालचाल आहे काय? ॥300॥ म्हणून (ज्याप्रमाणे) सुताच्या दोरीने हलणारी बाहुली सूत्रधाराशिवाय व्यर्थ असते, तसे मनाचा मनपणा नाहीसा होतो, त्या वेळी अगोदरच इंद्रियांची कर्म करण्याची शक्ती बंद पडते ॥301॥ अर्जुना, त्याप्रमाणे मन हे सर्व या इंद्रियांच्या द्वाराने वागत असते. ॥302॥ परंतु ज्या वेळेला जसे ज्या वासनेच्या रूपाने मन आंत होऊन असते, तसेच ते इंद्रियांच्या व्यापाररूपाने बाहेर येते ॥303॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : लीलाकमळें खेळणें, पुष्पमाळा झेलणें


