अध्याय तेरावा
आसुडैल वारा । नख लागेल अंबरा । इया बुद्धी करा । चळों नेदी ॥281॥ तेथ आंगावरिलीं उडवावीं । कां डोळां रिगतें झाडावीं । पशुपक्ष्यां दावावीं । त्रासमुद्रा ॥282॥ इया केउतिया गोठी । नावडे दंडु काठी । मग शस्त्राचें किरीटी । बोलणें कें ॥283॥ लीलाकमळें खेळणें । पुष्पमाळा झेलणें । न करी म्हणे गोफणें । ऐसें होईल ॥284॥ हालवतील रोमावळी । यालागीं आंग न कुरवाळी । नखांची गुंडाळी । बोटांवरी ॥285॥ तंव करणेयाचाचि अभावो । परी ऐसाही पडे ठावो । तरि हातां हाचि सरावो । जे जोडिजती ॥286॥ कां नाभिकारा उचलिजे । हातु पडिलिया देहजे । आर्तातें स्पर्शिजे । अळुमाळु ॥287॥ हेंही उपरोधें करणें । तरी आर्तभय हरणें । नेणती चंद्रकिरणें । जिव्हाळा तो ॥288॥ पावोनि तो स्पर्शु । मलयानिळु खरपुसु । तेणें मानें पशु । कुरवाळणें ॥289॥ जे सदा रिते मोकळे । जैशी चंदनांगें निसळें । न फळतांही निष्फळें । होतीचि ना ॥290॥ आतां असो हें वाग्जाळ । जाणें तें करतळ । सज्जनांचे शीळ । स्वभाव जैसे ॥291॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : मुंगिये मेरु नोलांडवे, मशका सिंधु न तरवे
अर्थ
वार्याला झटका बसेल व आकाशाला नख लागेल अशा बुद्धीने हात हलू देत नाही ॥281॥ (अशी जेथे स्थिती आहे) तेथे अंगावर बसलेले (माशा, डास वगैरे प्राणी) उडवावेत अथवा डोळ्यात जाणारी चिलटे वगैरे झाडून टाकावीत अथवा पशुपक्ष्यांना आपल्या पाहण्याने भीती वाटेल, असा आविर्भाव आणावा ॥282॥ या गोष्टी कोठल्या ? त्याला हातात दंड अथवा काठी घेणे आवडत नाही. असे जर आहे, तर मग अर्जुना, हातात शस्त्रे घेण्याचे बोलणे कोठले ? ॥283॥ सहज मजेने कमळाने खेळावयाचे अथवा फुलांच्या माळा झेलावयाच्या (हे करणे चिलट वगैरे अतिसूक्ष्म प्राण्यांना) गोफणीप्रमाणे होईल, असे म्हणून जो वरील गोष्टी करीत नाही ॥284॥ अंगावरील केसांच्या रांगा हलतील (व त्या योगाने केसांच्या आश्रयाला असलेल्या सूक्ष्म जीवांना त्रास होईल) याकरिता जो अंग कुरवाळीत नाही, नखांच्या गुंडाळ्या बोटांवर वाढतात ॥285॥ आधी तर हातांना काही कर्तव्यच नसते परंतु अशाही स्थितीत त्या हातांना काही करण्याचा प्रसंग आला, तर हातांना हीच सवय असते की ते जोडावेत. ॥286॥ अथवा ‘भिऊ नकोस’ असे सांगण्यास हात उचलावेत अथवा कोणी पडलेल्यास वर काढण्याकरिता हात द्यावेत किंवा पीडित मनुष्याला त्याची पीडा कमी होण्याकरिता त्याला हाताने थोडासा स्पर्श करावा. ॥287॥ तरी दु:खाने पीडित मनुष्याचे भय नाहीसे करणे, हे देखील तो मोठ्या जुलुमाने करतो, पण त्याच्या हस्तस्पर्शाचा ओलावा चंद्रकिरणांना सुद्धा माहीत नसतो. ॥288॥ त्याच्या ह्स्तस्पर्शाच्या मानाने पाहिले असता, मलय पर्वतावरून येणार्या वार्याचा स्पर्श कडक भासेल इतका त्याच्या हाताचा स्पर्श मृदु व सुखकर असतो. अशा प्रकारच्या स्पर्शाने त्याचे पशूंना कुरवाळणे असते. ॥289॥ जे हात नेहेमी रिकामे व मोकळे असतात (परंतु) ज्याप्रमाणे चंदनाच्या वृक्षाचे सर्व भाग शुद्ध (सुगंधमय) असल्यामुळे ती झाडे फळली नाहीत तर ती निष्फळ आहेत, असे म्हणता येत नाही. ॥290॥ आता हे भाराभर बोलणे राहू दे, सज्जन मनुष्याची वागणूक व स्वभाव ही ज्याप्रमाणे असतात, त्याप्रमाणे त्याचे ते करतल असतात, असे समज. ॥291॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : आटु वेगु विंदाणु, आशा शंका प्रतारणु


