अध्याय तेरावा
कां नादब्रह्मचि मुसे आलें । कीं गंगापय असललें । पतिव्रते आलें । वार्धक्य कां ॥268॥ तैसें साच आणि मवाळ । मितले परि सरळ । बोले जैसे कल्लोळ । अमृताचे ॥269॥ विरोधु वादुबळु । प्राणुपापढाळु । उपहासु चाळु । वर्मस्पर्शु ॥270॥ आटु वेगु विंदाणु । आशा शंका प्रतारणु । हे संन्यासिले अवगुणु । जिया वाचा ॥271॥ आणि तयाचि परी किरीटी । थाउ जयाचिये दिठी । सांडिलिया भ्रुकुटी । मोकळिया ॥272॥ भूतीं वस्तु आहे । तियें रुपों शके विपायें । म्हणोनि वास न पाहे । बहुतकरूनी ॥273॥ ऐसाही कोणे एके वेळे । आंतुली कृपेचेनि बळें । उघडोनियां डोळे । दिठी घाली ॥274॥ तरि चंद्रबिंबौनि धारा । निघतां नव्हती गोचरा । परि एकसरें चकोरां । निघती दोंदें ॥275॥ तैसें प्राणियांसि होये । जरी तो वास पाहे । तया अवलोकनाची सोये । कूर्मींही नेणे ॥276॥ किंबहुना ऐसी । दिठी जयाची भूतांसी । करही देखसी । तैसेचि ते ॥277॥ तरी होऊनियां कृतार्थ । राहिले सिद्धाचे मनोरथ । तैसे जयाचे हात । निर्व्यापार ॥278॥ अक्षमें आणि संन्यासिलें । कीं निरिंधन आणि विझालें । मुकेनि घेतलें । मौन जैसें ॥279॥ तयापरी कांहीं । जयां करां करणें नाहीं । जे अकर्तयाचां ठायीं । बैसों येती ॥280॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : नाना कमळदळें, डोलविजती ढाळें
अर्थ
त्याचे बोलणे म्हणजे जणू काय नादब्रह्मच आकार धरून आले (असे मधुर) किंवा गंगेचे पाणी उसळले (असे पवित्र) अथवा पतिव्रतेला जसे काही म्हातारपण आले आहे ॥268॥ त्याप्रमाणे खरे आणि कोणास न खुपणारे, मोजके परंतु सरळ; त्याचे बोलणे म्हणजे जशा काही अमृताच्या लाटाच. ॥269॥ उपरोधिक बोलणे, तंट्यास उत्तेजन देणे, प्राण्यात पाप उत्पन्न करण्यास वाहवणे, टर उडवणे, टाकून बोलणे, वर्मास झोंबणारे शब्द बोलणे, ॥270॥ हट्ट, आवेश, कपट, आशा लावणे, संशयात पाडणे, फसवेगिरी (वगैरे) हे जे बोलण्यातील दोष आहेत, त्या सर्वांचा ज्या वाचेने पूर्णपणे त्याग केलेला असतो. ॥271॥ आणि अर्जुना, त्याचप्रमाणे ज्याच्या दृष्टीची स्थिती आहे; ज्याच्या भुंवया मोकळ्या टाकलेल्या आहेत (म्हणजे ज्याने रागाने भुंवया चढवल्या नाहीत) ॥272॥ प्राणिमात्रामधे वस्तु (परब्रह्म) आहे, तिला कदाचित् आपली दृष्टी बोचण्याचा संभव आहे, म्हणून बहुतकरून तो कोणाकडे पाहात नाही ॥273॥ असाही कोणी एका वेळेला आतल्या कृपेच्या जोराने डोळे उघडून त्याने कोणाकडे दृष्टी घातली ॥274॥ तर चंद्रबिंबातून निघणार्या अमृताच्या धारा जरी निघतांना डोळ्यांना दिसत नाहीत, परंतु त्या धारांचा योगाने चकोर पक्षी पुष्ट होतात ॥275॥ त्याप्रमाणे त्याने जर कोणा प्राण्याकदे पाहिले तर तसे होते. त्या पहाण्याचा प्रकार कासवीसुद्धा जाणत नाही. ॥276॥ फार काय सांगावे! याप्रमाणे ज्याची दृष्टी प्राण्याकडे असते व त्याचे हात जे आहेत तेही तसेच आहेत, असे तुझ्या दृष्टीस पडेल ॥277॥ सिद्ध पुरुषाचे मनोरथ ज्याप्रमाणे कृतार्थ होऊन रहातात. (म्हणजे सिद्ध पुरुषाचे मन जसे कर्तव्यशून्य झालेले असते) त्याप्रमाणे ज्याचे हात चेष्टारहित असतात. (व्यापाररहित असतात). ॥278॥ अगोदरच आंधळा, आणखी त्याने पहाण्याचे टाकले, अथवा आधीच काष्ठरहित अग्नि, आणि पुन्हा तो विझलेला किंवा मूळचाच मुका व त्यात आणखी मौनव्रत घेतलेले ॥279॥ अर्जुना, त्याप्रमाणे ज्या हातांना काही करावयाचे राहिलेले नाही, कारण काहीच कर्तव्य न उरलेल्या सिद्ध पुरुषाचे ठिकाणी ते राहावयास येतात. ॥280॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : मुंगिये मेरु नोलांडवे, मशका सिंधु न तरवे


