अध्याय पंधरावा
देव निरूपिती तें थेंकुलें । येवढें श्रोतेपण फांकलें । जैसे आकाशा खेंव पसरिलें । दाही दिशीं ॥69॥ श्रीकृष्णोक्तिसागरा । हा अगस्तीचि दुसरा । म्हणौनि घोंटु भरों पाहे एकसरा । अवघेयाचा ॥70॥ ऐसी सोय सांडूनि खवळिली । आवडी अर्जुनीं देवें देखिली । तेथ जालेनि सुखें केली । कुरवंडी तया ॥71॥
श्रीभगवानुवाच ।
ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् । छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् ॥1॥
मग म्हणे धनंजया । तें ऊर्ध्व गा तरू यया । येणें रुखेंचि कां जया । ऊर्ध्वता गमे ॥72॥ एऱ्हवीं मध्य ऊर्ध्व अध । हे नाहीं जेथ भेद । अद्वयासीं एकवद । जया ठायीं ॥73॥ जो नाइकिजतां नादु । जो असौरभ्य मकरंदु । जो आंगाथिला आनंदु । सुरतेविण ॥74॥ जया जें आऱ्हां परौतें । जया जें पुढें मागौतें । दिसतेविण दिसतें । अदृश्य जें ॥75॥ उपाधीचा दुसरा । घालितां वोपसरा । नामरूपाचा संसारा । होय जयातें ॥76॥ ज्ञातृज्ञेयाविहीन । नुसधेंचि जें ज्ञान । सुखा भरलें गगन । गाळींव जें ॥77॥ जें कार्य ना कारण । जया दुजें ना एकपण । आपणयां जें जाण । आपणचि ॥78॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : अर्जुना हें कवतिक, सांगतां असे अलौकिक
अर्थ
आकाश एवढे अपरिमित असून, त्यास जसे दाही दिशांनी कवटाळले आहे, त्याप्रमाणे श्रीकृष्णाचे बोलणे व्यापक असताही ते अर्जुनाच्या अवधानापुढे अगदी अल्प असे झाले, इतके अर्जुनाचे अवधान वाढले. ॥69॥ श्रीकृष्णाच्या निरूपणरूप समुद्रास प्राशन करणारा अर्जुन हा दुसरा अगस्ति ऋषीच उत्पन्न झाला. म्हणून तो श्रीकृष्णाच्या संपूर्ण निरूपणाचा एकदम घोट घेण्यास पाहू लागला. ॥70॥ श्रीकृष्णाने याप्रमाणे अर्जुनाच्या ठिकाणी (श्रवणाविषयी) अमर्याद आवड उत्पन्न झालेली पाहिली, तेव्हा त्यास (श्रीकृष्णास) जे सुख झाले, ते सुख त्यांनी अर्जुनावरून ओवाळून टाकले. ॥71॥
श्रीकृष्ण म्हणाले, ज्याचे मूळ वर (ब्रह्माच्या ठिकाणी) आहे, ज्याच्या शाखा खाली आहेत, जो अश्वत्थ (विनाशी) आहे, तरी त्याला अव्यय (अविनाशी) असे (सामान्य जन) म्हणतात, वेद ज्याची पाने आहेत, असा जो प्रपंचरूपी वृक्ष, (याचे अज्ञान हेच मूळ आहे व म्हणून हा क्षणभंगुर आहे असे त्यास) जो जाणतो, तो खरा वेदवेत्ता (ज्ञानी) होय ॥1॥
मग भगवान म्हणतात, हे अर्जुना, या संसारवृक्षाला ब्रह्म हे ऊर्ध्व (वर) आहे आणि ब्रह्माच्या ठिकाणी ऊर्ध्वपणा (खाली असलेल्या या) संसारवृक्षामुळे वाटत आहे. ॥72॥ वास्तविक विचार केला तर ज्या ब्रह्माच्या ठिकाणी वरील, मधला व खालचा असे भेद नाहीत, फार काय सांगावे! ज्याच्या ठिकाणी दुसरे नाही अशाविषयी एकवाक्यता आहे. ॥73॥ जो कानाला विषय न होणारा नाद व नाकाने सुवास न घेता येण्यासारखा मकरंद आणि जो मैथुनादि साधनाशिवाय प्राप्त असलेला मूर्तिमंत आनंद होये. ॥74॥ ज्याला जे अलीकडे व पलीकडे आहे, ज्याला जे पुढे व मागे आहे, पाहणार्यावाचून जे पाहणे आहे, स्वभावत: इंद्रियांना जे अगोचर आहे ॥75॥ ज्या ब्रह्माच्या ठिकाणी मायोपाधीचा दुसरा संबंध कल्पिला म्हणजे नामरूपाचा व्यवहार होतो ॥76॥ जे ब्रह्म, ज्ञाता आणि ज्ञेय यांवाचून केवळ ज्ञानमात्र आहे आणि जे ब्रह्म आकाशातून गाळलेले (आकाशापासून सूक्ष्म) असून जे सुखाने भरलेले आहे ॥77॥ जे कोणाचे कार्य नाही व जे कोणाचे कारणही नाही, ज्याला कोणी दुसरे नाही व दुसर्याच्या अपेक्षेने येणारा एकपणाही ज्याच्या ठिकाणी नाही, जे आपणच आपल्याला, आहे असे समज. ॥78॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : पैं बल्वचेहि महामारी, पिंपळा कां वडाचिया परी


