अध्याय चौदावा
आतां निर्गुण असे आणिक । तें तो जाणें अचुक । जे ज्ञानें केलें टीक । तयाचिवरी ॥300॥ किंबहुना पंडुसुता । ऐसी तो माझी सत्ता । पावे जैसी सरिता । सिंधुत्व गा ॥301॥ नळिकेवरूनि उठिला । जैसा शुक शाखे बैसला । तैसा मूळअहंतें वेढिला । तो म्हणौनियां ॥302॥ अगा अज्ञानाचिया निदा । जो घोरत होता बदबदा । तो स्वस्वरूपीं प्रबुद्धा । चेइला कीं ॥303॥ पैं बुद्धिभेदाचा आरिसा । तया हातोनि पडिला वीरेशा । म्हणौनि प्रतिमुखाभासा । मुकला तो ॥304॥ देहाभिमानाचा वारा । आतां वाजो ठेला वीरा । तैं ऐक्य वीचिसागरां । जीवेशां हें ॥305॥ म्हणौनि मद्भावेंसी । प्राप्ति पाविजे तेणेंसरिसी । वर्षांतीं आकाशीं । घनजात जेवीं ॥306॥ तेवीं मी होऊनि निरुता । मग देहींचि ये असतां । नागवे देहसंभूतां । गुणांसि तो ॥307॥ जैसा भिंगाचेनि घरें । दीपप्रकाशु नावरे । कां न विझेचि सागरें । वडवानळु ॥308॥ तैसा आला गेला गुणांचा । बोधु न मैळे तयाचा । तो देहीं जैसा व्योमींचा । चंद्र जळीं ॥309॥ तिन्ही गुण आपुलालिये प्रौढी । देहीं नाचविती बागडीं । तो पाहोंही न धाडी । अहंतेतें ॥310॥ हा ठायेवरी । नेहटोनि ठेला अंतरीं । आतां काय वर्ते शरीरीं । कांहीं नेणे ॥311॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : त्रिगुण आपुलालेनि धर्में, देहींचे माघुत साउमें
अर्थ
आता निर्गुण म्हणून जे आणखी आहे, ते तो बिनचूक जाणतो. कारण की, ज्ञानाने आपले (राहण्याचे) ठिकाण त्याच्याच ठिकाणी केले आहे. ॥300॥ फार काय सांगावे! अर्जुना, जशी नदी समुद्रापणाला पावते, त्याप्रमाणे असा तो पुरुष माझी सत्ता पावतो. ॥301॥ जसा राघू नळिकेवरून उठून (मोकळेपणाने) झाडाच्या फांदीवर बसावा, तसा तो देहअहंता सोडून स्वरूप (ब्रह्म) हेच मी आहे, अशा स्वरूपअहंतेने तो वेष्टिला गेला. ॥302॥ अज्ञानरूपी निद्रेने जो मोठमोठ्याने घोरत होता, तो हे शहाण्या अर्जुना, आत्मस्वरूपी जागा झाला. ॥303॥ अर्जुना भेदप्रतीती हाच कोणी आरसा, तो त्याच्या हातून पडून फुटल्यामुळे तो प्रतिबिंबाच्या (जीवपणाच्या) भासास मुकला. ॥304॥ हे वीरा, आता ह्या पुरुषाच्या ठिकाणी देहहंकाररूप वारा वाहण्याचा बंद झाल्यामुळे लाटांचे जसे समुद्राशी ऐक्य होते, त्याप्रमाणे त्याच्या ठिकाणी जीवाचे ईशाशी ऐक्य होते ॥305॥ म्हणून त्या पुरुषाला लागलीच मद्भावाची प्राप्ती होते. ज्याप्रमाणे पावसाळा संपल्यावर ढग आकाशरूप होतात ॥306॥ त्याप्रमाणे वस्तुत: मद्रूप झाल्यावर मग जरी तो या देहात असला, तरी तो देहाला उत्पन्न करणार्या गुणांच्या तावडीत सापडत नाही. ॥307॥ ज्याप्रमाणे अभ्रकाच्या कंदिलाने दिव्याचा प्रकाश आवरला जात नाही, अथवा समुद्राने जसा वडवानल विझला जातच नाही ॥308॥ त्याप्रमाणे गुणांच्या येण्याजाण्याने त्याचा बोध मळत नाही. जसा आकाशातील चंद्र जळात असतो तसा तो देहात असतो. ॥309॥ तिन्ही गुण आपापल्या सामर्थ्याने देहामधे (नाना प्रकारच्या) चेष्टा करतात, पण तो आपल्या अहंतेला त्या चेष्टा पाहण्यासही पाठवीत नाही. ॥310॥ येथेपर्यंत तो अंत:करणात दृढ निश्चयाने राहिला आहे. आता शरीराच्या ठिकाणी काय घडत आहे, हे तो काही जाणत नाही. ॥311॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : सत्त्वरजतमांचां, भेदीं पसरु कर्माचा


