अध्याय तेरावा
सूर्याचां होणां होईजे । कां सूर्यासवेंचि जाईजे । हें विकलेपण साजे । प्रभेसि जेवीं ॥608॥ पैं पाणियाचिये भूमिके । पाणी तळपे कौतुकें । ते लहरी म्हणती लौकिकें । एऱ्हवीं तें पाणी ॥609॥ जो अनन्य यापरी । मी जाहलाहि मातें वरी । तोचि तो मूर्तधारी । ज्ञान पैं गा ॥610॥ आणि तीर्थें धौतें तटें । तपोवनें चोखटें । आवडती कपाटें । वसवूं जया ॥611॥ शैलकक्षांचीं कुहरें । जळाशयापरिसरें । अधिष्ठी जो आदरें । नगरा न ये ॥612॥ बहु एकांतावरी प्रीति । जया जनपदावरी खंती । जाण मनुष्याकारें मूर्ती । ज्ञानाची तो ॥613॥ आणिकहि पुढती । चिन्हें गा सुमती । ज्ञानाचिये निरुती- । लागीं सांगों ॥614॥
अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् । एतद्ज्ञानमिति प्रोक्तमज्ञानं यदतोन्यथा ॥11॥
तरी परमात्मा ऐसें । जें एक वस्तु असे । तें जया दिसें । ज्ञानास्तव ॥615॥ तें एकवांचूनि आनें । जियें भवस्वर्गादि ज्ञानें । तें अज्ञान ऐसा मनें । निश्चयो केला ॥616॥ स्वर्गा जाणें हें सांडी । भवविषयीं कान झाडी । दे आत्मज्ञानीं बुडी । सद्भावाची ॥617॥ भंगलिये वाटे । शोधूनिया अव्हांटे । निघिजे जेवीं नीटें । राजपंथें ॥618॥ तैसें ज्ञानजाता करी । आघवेंचि एकीकडे सारी । मग मन बुद्धि मोहरी । आत्मज्ञानीं ॥619॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : सापाच्या तोंडीं, पडली जे उंडी
अर्थ
सूर्याच्या उदयाबरोबर प्रगट व्हावे आणि सूर्याच्या अस्ताबरोबर नाहीसे व्हावे, हा सूर्याशी असणारा प्रभेचा विकलेपणा (अनन्यता) प्रभेला जसा शोभतो ॥608॥ पाण्याच्या सपाटीवर मौजेने हालत असलेल्या पाण्यास लोकांच्या दृष्टीने लाटा असे म्हटले जाते, तथापि खरा विचार करून पाहिले तर, ते पाणीच आहे. ॥609॥ जो याप्रमाणे एकनिष्ठ असतो, म्हणजे माझ्याशी ऐक्य पावूनही माझे भजन करतो, अर्जुना तोच तो मूर्तिमंत ज्ञान होय. ॥610॥ आणि तीर्थे (नदी व समुद्र यांचे) पवित्र किनारे, तप करण्याच्या शुद्ध जागा आणि गुहा ह्या ठिकाणी ज्यास राहावयास आवडते, ॥611॥ डोंगराच्या बगलेतील गुहांमधे व सरोवराच्या आसपास जो प्रेमाने राहतो आणि शहरात येत नाही, ॥612॥ ज्याची एकांतावर फार प्रीति असते व ज्याला लोकांचा कंटाळा असतो, तो मनुष्यरूपाने ज्ञानाची केवल मूर्तीच आहे असे समज. ॥613॥ हे बुद्धिमान अर्जुना, ज्ञानाचा निश्चय होण्याकरता आणखी काही चिन्हे तुला पुढे सांगतो. ॥614॥
अध्यात्मज्ञान नित्य आहे अशी बुद्धी असणे, तत्वज्ञानाचा अर्थ जे ज्ञेय ब्रह्म त्याचे दर्शन, या सर्वाला ज्ञान असे म्हणतात. या खेरीज जे इतर ते (सर्व) अज्ञान होय. ॥11॥
तर परमात्मा म्हणून जी एक वस्तु आहे, ती ज्या ज्ञानामुळे अनुभवाला येते, ॥615॥ त्या अध्यात्मज्ञानावाचून, इतर जी स्वर्ग व संसार यासंबंधीची ज्ञाने आहेत, ती अज्ञाने आहेत, असा जो मनाने निश्चय करतो, ॥616॥ स्वर्गाला जाणे ही गोष्ट तो सोडून देतो आणि संसारासंबंधी कानांवर गोष्टी येऊ देत नाही व आत्मज्ञानाविषयी चांगली भावना ठेवून त्यात रममाण होतो. ॥617॥ (जसे एखाद्या प्रवाशाने जेथे) वाट फुटते, तेथे आल्यावर पुढे आडमार्ग कोणते आहेत, त्यांचा शोध करून मग जसे सरळ राजमार्गाने निघावे, ॥618॥ त्याप्रमाणे तो जेवढी ज्ञाने आहेत, त्यांचा नीट विचार करतो व आत्मज्ञानाशिवाय इतर सर्व (ज्ञाने) एकीकडे सारतो आणि नंतर मन व बुद्धि यांस अध्यात्मज्ञानाच्या मार्गाला लावतो. ॥619॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : जेथ नभाचेनि पाडें, समत्वा उणें न पडे


