अध्याय तेरावा
झाडिलीं कोळें झाडी । तया न फळे जेवीं बोंडीं । जाहला अग्नि तरि राखोंडी । जाळील काई ॥585॥ म्हणोनि वृद्धाप्याचेनि आठवें । वृद्धाप्या जो नागवे । तयाचां ठायीं जाणावें । ज्ञान आहे ॥586॥ तैसेचि नाना रोग । पडिघाती पुढां आंग । तंव आरोग्याचे उपेग । करूनि घाली ॥587॥ सापाच्या तोंडीं । पडली जे उंडी । ते लाऊनि सांडी । प्रबुद्धु जैसा ॥588॥ तैसा वियोग जेणें दुःखे । विपत्ति शोक पोखे । तें स्नेह सांडूनि सुखें । उदासु होय ॥589॥ आणि जेणें जेणें कडे । दोष सूतील तोंडें । तयां कर्मरंध्रा गुंडे । नियमाचे दाटी ॥590॥ ऐसऐसिया आइती । जयाची परी असती । तोचि ज्ञानसंपत्ती- । गोसावी गा ॥591॥ आतां आणीकही एक । लक्षण अलौकिक । सांगेन आइक । धनंजया ॥592॥
असक्तिरनभिष्वङ्गः पुत्रदारगृहादिषु । नित्यं च समचित्तत्वमिष्टानिष्टोपपत्तिषु ॥9॥
तरि जो या देहावरी । उदासु ऐसिया परी । उखिता जैसा बिढारीं । बैसविला आहे ॥593॥ कां झाडाची साउली । वाटे जातां मीनली । घरावरी तेतुली । आस्था नाहीं ॥594॥ साउली सरिसीच असे । परी असे हें नेणिजे जैसें । स्त्रियेचें तैसें । लोलुप्य नाहीं ॥595॥ आणि प्रजा जे जाली । तियें वस्ती कीर आलीं कां गोरुवें बैसलीं । रुखातळीं ॥596॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : कुसळें कोरडीं, वारेनि जाती बरडीं
अर्थ
तिळाचे झाड एकदा झाडून त्यातील सगळे तीळ निघाल्यावर पुन्हा जर ती कोळे झाडली, तर त्या कोळांच्या बोंडातून जसे तीळ निघत नाहीत, तसेच अग्नि जरी असला, पण तो एकदा राखोंडी झाला, मग तो कोणत्याही पदार्थास जाळू शकेल काय? ॥585॥ (त्याप्रमाणे तारुण्यात शक्ति व बुद्धी विषयसेवनात खर्च झाल्यावर म्हातारपणात शरीर काय करील?) असे वृद्धावस्थेत होणार्या दुर्दशेचे त्याला तारुण्यावस्थेत स्मरण असल्यामुळे जो वृद्धावस्थेने ग्रासला जात नाही, त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे, असे समजावे. ॥586॥ त्याचप्रमाणे नाना प्रकारचे रोग पुढे अंगावर आदळतील तेव्हा ते रोग येण्याच्या आधीच तो आरोग्याचा उपयोग करून घेतो. ॥587॥ सापाच्या तोंडात एकदा पडलेला पदार्थ प्राप्त झाला असता शहाणा मनुष्य जसा तो पदार्थ टाकून देतो, ॥588॥ त्याप्रमाणे ज्या स्नेहाच्या योगाने वियोग व दु:खे, विपत्ति व शोक ही पोसली जातात, तो स्नेह टाकून जो समाधानवृत्ति ठेऊन उदास होऊन राहतो, ॥589॥ आणि ज्या ज्या इंद्रियांच्या द्वाराने निषिद्ध आचरणे आपला चंचुप्रवेश करतील त्या त्या कर्म करणार्या इंद्रियरूपी बिळात निग्रहाचे धोंडे ठोकून तो ते प्रवेशाचे मार्गच बंद करतो ॥590॥ अशा अशा सामग्रीने ज्याचा वागण्याचा प्रकार असतो, तोच तो अर्जुना ज्ञानरूपी ऐश्वर्याचा मालक आहे असे समज. ॥591॥ आता आणखीही एक ज्ञानाचे लोकोत्तर लक्षण सांगतो, अर्जुना, ऐक. ॥592॥
(देहासंबधी) अनासक्ती, स्त्री, पुत्र, गृह इत्यादिकांविषयी अलोलुपता व इष्ट अथवा अनिष्ट (प्रकार) घडले असता चित्ताचे समत्व कधीही ढळू न देणे ॥9॥
तर बिर्हाडी बसविलेला वाटसरू जसा त्या बिर्हाडाविषयी उदास असतो, तशा प्रकाराने जो स्वत:च्या शरीराविषयी उदास असतो ॥593॥ अथवा वाटेने जात असता मध्येच प्राप्त झालेल्या झाडाच्या सावलीवर ज्याप्रमाणे (वाटसरूची) आस्था नसते, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाचे स्वत:च्या घरावर किंचितही ममत्व नसते ॥594॥ आपली सावली आपल्याबरोबर नेहेमी असते. परंतु ती सावली आपल्याबरोबर आहे याची आपल्याला खबरही नसते, त्याप्रमाणे स्त्रीविषयी ज्याला आसक्ती नसते, ॥595॥ आणि त्याला जी मुलेबाळे झालेली असतात, त्यास तो खरोखर वस्तीला आलेल्या वाटसरूप्रमाणे मानतो अथवा झाडाखाली बसलेल्या गुरांसंबंधी झाड जसे उदास असते (तसा तो ज्ञानी प्रजेसंबंधी उदास असतो) ॥596॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : हात होती खुळे, हें पुढील मोटकें कळे


