अध्याय तेरावा
पैं ज्ञानाचिये प्रभेसवें । जयाची मती ज्ञेयीं पावे । तो हातधरणिया शिवे । परतत्त्वातें ॥631॥ तोचि ज्ञान हें बोलतां । विस्मो कवण पांडुसुता । काय सवितयातें सविता । म्हणावें असें ॥632॥ तंव श्रोतें म्हणितले असो । न सांगतियाचा अतिसो । ग्रंथोक्ती तेथ आडसो । घालिसी कां ॥633॥ तुझा हाचि आम्हां थोरु । वक्तृत्वाचा पाहुणेरु । जे ज्ञानविषो फारु । निरोपिला ॥634॥ रसु होआवा अतिमात्रु । हा घेतासि कविमंत्रु । तरि अवंतूनि शत्रु । करितोसि कां गा ॥635॥ ठायीं बैसतिये वेळे । जे रससोय घेऊनि पळे । तियेचा येरु वोडव मिळे । कोणा अर्था ॥636॥ आघवांचि विषयीं भादी । परि सांजवणीं टेंकों नेदी । ते खुरतोडी नुसधी । पोषी कवण ॥637॥ तैसी ज्ञानीं मती न फांके । येर जल्पती नेणों केतुकें । परि तें असो निकें । केलें तुवां ॥638॥ जया ज्ञानलेशोद्देशें । कीजती योगादि सायासें । धणीचें आणि तुझिया ऐसें । निरूपण ॥639॥ अमृताची सांतवांकुडी । लागो कां अनुघडी । सुखाचां दिसी कोडी । गणिजतु कां ॥640॥ पूर्णचंद्रेंसीं राती । युग एक असो न पाहती । तरि काय पाहात आहाती । चकोरें ते ॥641॥ तैसें ज्ञानाचें बोलणें । आणि येणें रसाळपणें ।आतां पुरे कोण म्हणे । आकर्णितां ॥642॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : पैं पाणियाचिये भूमिके, पाणी तळपे कौतुकें
अर्थ
(एवढेच काय) परंतु, (ज्याच्या बुद्धीत) ज्ञानाचा प्रकाश पडल्याबरोबर ज्याची बुद्धि ब्रह्मस्वरूपाला जाऊन भिडते, तो परब्रह्माला हातोहात जाऊन भेटतो. ॥631॥ अर्जुना तोच ज्ञान आहे, असे म्हटले तर त्यात आश्चर्य ते काय आहे? सूर्याला सूर्य म्हणायला पाहिजे काय? ॥632॥ तेव्हा श्रोत्यांनी म्हटले, ‘हे राहू दे, त्या पुरुषाचेच फार वर्णन करू नकोस. ग्रंथाच्या चाललेल्या विचारात मध्येच खोळंबा का करतोस ॥633॥ आत्मज्ञानाचा विषय तू पुष्कळ विस्ताराने सांगितलास, हाच आम्हाला तुझ्या वक्तृत्वाचा मोठा पाहुणचार झाला. ॥634॥ आपल्या व्याख्यानात विषयाचे प्रतिपादन करतांना, त्याचे पाल्हाळाने अतिशय रसभरित वर्णन करावे, ही जी सामान्य कवींची क्लृप्ति तिचा आश्रय जर केला असता तर तू श्रोत्यास मुद्दाम बोलावून आणून शत्रू केल्याचा दोष केला असतास. ॥635॥ भोजन करण्याच्या पात्रावर बसावयाच्या वेळी जी बाई स्वयंपाक घेऊन पळते, तिच्या इतर आदरसत्काराचा काय उपयोग? ॥636॥ इतर सर्व गोष्टीत चांगली, परंतु दूध काढावयाच्या वेळी जी कासेखाली बसू देत नाही, तर अशी ती नुसती लाथाडी गाय कोण पोशील? ॥637॥ त्याप्रमाणे ज्ञानात बुद्धि विस्तार न पावतांना (इतर कवि) ज्ञानांवाचून इतर गोष्टींचे किती पाल्हाळ लावतात, ते कळत नाही. परंतु त्यांची गोष्ट राहू दे. तू (मात्र) चांगले केलेस. ॥638॥ ज्या ब्रह्मज्ञानाच्या थेंबाच्या हेतूने लोक योगादिक कष्ट करतात, त्या ब्रह्मज्ञानाचे पोटभर आणि तुझ्य़ासारखे रसाळ व्याख्यान (आम्हास मिळाल्यावर ते पुरे कसे वाटेल?) ॥639॥ अमृताची झड एकसारखी सात दिवस लागेना का? (तिचा कंटाळा यावयाचा नाही. (दु:खाचे दिवस जसे आपण मोजतो व प्रत्येक दिवस जाता जात नाही, इतका मोठा वाटतो, तसे) सुखाचे दिवस कोट्यवधि गेले तरी त्यांना कोणी मोजतो का ? ॥640॥ पूर्णचंद्रासह रात्र एक युगभर न उजाडणारी अशी एकसारखी असली तरी, चकोरांना ती उजाडावी असे वाटेल काय ? ॥641॥ त्याप्रमाणे ज्ञानाचे व्याख्यान आणि अशा गोडपणाने ते व्याख्यान केलेले, आता ते व्याख्यान ऐकतांना पुरे कोण म्हणेल? ॥642॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : तयाचां ठायीं ज्ञान, या बोला म्हणसी व्यवधान


