दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 19 ऑगस्ट 2026; वार : बुधवार
- भारतीय सौर : 28 श्रावण 1948; तिथि : सप्तमी 19:18; नक्षत्र : स्वाती 06:46;
- योग : ब्रह्मा 27:43; करण : गरज 06:30 ;
- सूर्य : सिंह ; चंद्र : तूळ 26:29 ; सूर्योदय : 06:19; सूर्यास्त : 19:05;
- पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
सीतला सप्तमी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
चरित्र लेखक गंगाधर खानोलकर
टीम अवांतर
मराठीतील लेखक, चरित्रकार गंगाधर खानोलकर यांचा जन्म 19 ऑगस्ट 1903 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातल्या ‘खानोली’ या गावी झाला. वडिलांच्या बदल्यांमुळे गंगाधररावांचे बालपणही भ्रमंतीत गेले. शिवाय त्यांचे प्राथमिक शिक्षणही घरीच झाले. पुढे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण सावंतवाडी आणि मालवण येथे झाले. मात्र गांधीजींच्या असहकार चळवळीत सहभागी झाल्याने ते मॅट्रिकच्या परीक्षेला बसलेच नाहीत. त्यांचे वडील ज्ञानपिपासू, ग्रंथप्रेमी आणि माणुसकी हा एकच धर्म मानणारे असल्याने त्यांचा मोठा प्रभाव गंगाधररावांवर झाला.
1920 ते 1923 या काळात गंगाधररावांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनमधील विश्वभारती विद्यापीठात, निसर्गाच्या सान्निध्यात साहित्याचे विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला. त्यावेळी अनेक थोर विद्वानांचे आणि गुरू या नात्याने रवींद्रनाथांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. भरपूर वाचन आणि चिंतन-मननाची सवय त्यांनी स्वतःला लावून घेतली. तिथल्या निखळ ज्ञानसाधकी शैक्षणिक संस्कारांची शिदोरी त्यांनी आयुष्यभर केलेल्या साहित्य सेवेत त्यांना सतत प्रेरणा देत राहिली.
हेही वाचा – सहानुभूती आणि विश्वास
त्यानंतर अमळनेर येथील तत्वज्ञान मंदिरात शिष्यवृत्ती घेऊन दोन वर्षे तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास त्यांनी केला. पुढे काही काळ तळेगावच्या समर्थ विद्यालयात शिक्षक या नात्याने काम केले. त्यानंतर ते मुंबईच्या वृत्तपत्राच्या दुनियेत ‘लोकहित’, ‘विविधवृत्त’, ‘प्रगती’, ‘रणगर्जना साप्ताहिक’ इत्यादी वृत्तपत्र-नियतकालिकांचे संपादक झाले. 1926च्या सुमारास मुंबईत स्थिर झाल्यावर त्यांचा वाङ्मयीन चळवळीशी संबंध आला.
या काळात स्वतः अनुभवलेली संदर्भ-साहित्याची अडचण आणि उणीव दूर करण्यासाठी त्यांनी संशोधन क्षेत्रातील साधन साहित्याचा संग्रह सुरू केला. यातूनच कोशकार, विश्लेषक, चरित्रलेखक, ग्रंथसंपादक म्हणून मराठी वाङ्मय इतिहासात अविस्मरणीय अशी कामगिरी करून त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कर्तृत्वाचा ठसा तर उमटवलाच, शिवाय पुढील पिढ्यांसाठी एक आदर्शही निर्माण केला.
18व्या वर्षापासून त्यांनी लेखनाला सुरुवात केली. नामांकित नियतकालिकांतून कथा, वाङ्मयविषयक लेख प्रकाशित केले. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे त्यांचे लेखन-क्षेत्रातले गुरू. खानोलकरांच्या अंगी असणाऱ्या गुणांमुळे यशस्वी चरित्रलेखक म्हणून ते उत्तरोत्तर प्रसिद्ध होत गेले. श्री. कृ. कोल्हटकरांच्या छोट्या चरित्राला साडेसहाशे ‘डेमी’ पृष्ठांचे स्वरूप प्राप्त करून दिले. खानोलकरांनी 20 वर्षे सातत्याने परिश्रमाने संग्रहीत केलेल्या साधनसामग्रीच्या आधाराने दोन-तीन वर्षे लेखन करून हे साध्य झाले. चरित्र लेखनात त्यांचे स्वतःचे असे एक तंत्र होते.
खानोलकरांनी आपल्या साहित्यिक कारकिर्दीत 22 ग्रंथ लिहिले. ‘अर्वाचीन वाङ्मय’ (खंड 1ते 9), श्रीपाद कृष्ण कोल्हटकर चरित्र, वालचंद हिराचंद चरित्र, माधव ज्यूलियन चरित्र, के. बी. ढवळे चरित्र इत्यादी ग्रंथरचनांचा त्यात समावेश होतो. याखेरीज ‘स्वामी विवेकानंद समग्र वाङ्मय’ (खंड 1-21) ‘पुणे शहराचे वर्णन’, कोल्हटकर लेखसंग्रह, डॉ. केतकरांचे वाङ्मयविषयक लेख, शेजवलकर लेखसंग्रह, धनंजय कीर : व्यक्ती आणि चरित्रकार, सोन्याचे दिवस : बा. ग. ढवळे स्मृतिग्रंथ इत्यादी ग्रंथांचे संपादनही त्यांनी केले. 30 सप्टेंबर 1992 रोजी या महान चरित्रकाराचे निधन झाले.
आजचे राशिभविष्य
मेष – भागीदारीच्या कामात तुमची समज आणि मेहनत आज फळाला येईल. आपल्या जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण करून लोकांचा विश्वास जिंकण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. मात्र एखाद्या मुद्द्यावरून वाद निर्माण होऊ शकतो, त्यामुळे आपल्या शब्दांबाबत सावधगिरी बाळगा. एक मोठी इच्छा पूर्ण झाल्याने तुम्हाला प्रचंड आनंद होईल. कायदेशीर बाबींमध्ये घाई करण्याऐवजी, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे अधिक फायदेशीर ठरेल.
वृषभ – वाढत्या खर्चामुळे आज खिशावर ताण येऊ शकतो, त्यामुळे आर्थिक बाबींमध्ये शहाणपणाने वागा. विरोधक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात, परंतु संयम आणि विवेकबुद्धीने तुम्ही त्यावर मात कराल. तुम्ही मालमत्ता खरेदी करण्याची योजना आखू शकता आणि त्यासाठी कर्ज घेण्याचा विचार करू शकता. मामांकडून आर्थिक लाभ किंवा चांगली आर्थिक बातमी मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन – आज समाजात तुमची ओळख आणि आदर वाढेल. संतती तुमच्या अपेक्षा पूर्ण करतील, ज्यामुळे तुम्हाला अभिमान आणि आनंद दोन्ही वाटेल. प्रवास करताना अनोळखी लोकांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. तुम्हाला एखाद्या लहानशा मुद्द्यावर काळजी वाटू शकते, परंतु एकंदरीत, तुमची बहुतेक कामे यशस्वीपणे पूर्ण होतील.
कर्क – नशीब आज तुमच्या बाजूने असेल. कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. वाढलेल्या सुखसोयींमुळे मनःशांती मिळेल. पालकांच्या पाठिंब्यामुळे अनेक प्रलंबित कामे पूर्ण होण्यास मदत होईल. करिअरमधील तुमचे स्थान मजबूत होईल. नोकरीच्या ठिकाणी अनावश्यक वाद टाळा. विद्यार्थ्यांना पार्ट नोकरी करण्याची संधी मिळेल.
सिंह – तुमचे उत्पन्न वाढविण्याच्या अनेक नवीन संधी आज उपलब्ध होऊ शकतात आणि तुम्ही त्यांचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न कराल. एखाद्या कायदेशीर बाबीसंदर्भात घाई करावी लागेल, त्यामुळे आवश्यक कागदपत्रे आणि योग्य सल्ला मिळेल याबाबत काळजी घ्या. अविवाहित जातकांचे लग्न करण्याची शक्यता आहे. रखडलेल्या व्यावसायिक प्रकल्पांनाही आज गती मिळू शकते.
कन्या – आज तुम्हाला काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होईल. तुमची बुद्धिमत्ता आणि कार्यक्षमता इतरांना प्रभावित करेल. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता. आज तुमची कार्यक्षमताही वाढेल. संततीच्या संबंधी एखादी चांगली बातमी तुमचा दिवस खास बनवू शकते. आर्थिक बाबींमध्ये मात्र सावधगिरी बाळगा. अनावश्यक खर्च टाळा.
तुळ – आज, तुम्ही सारासार विचाराने निर्णय घेणे अधिक चांगले राहील. घाईघाईत घेतलेला निर्णय हानिकारक ठरू शकतो. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल. प्रवासादरम्यान तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळू शकते, जी भविष्यात उपयोगी पडेल. आरोग्याच्या किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. आवश्यक असेल तर वैद्यकीय सल्ला अवश्य घ्या.
वृश्चिक – आज कोणत्याही मोठ्या जोखमींमध्ये पैसा किंवा वेळ यांची गुंतवणूक करणे टाळा. तेच शहाणपणाचे ठरेल. व्यवसायातील एखादी तांत्रिक समस्या किंवा लहान अडथळा त्रासदायक ठरू शकतो. कोणाच्याही प्रभावाखाली येऊन निर्णय घेऊ नका; प्रत्येक गोष्टीची सखोल चौकशी करा. योग्य भागीदारासोबत काम करणे फायदेशीर ठरेल. विवाहाशी संबंधित जुने प्रश्न सुटू शकतात. तुमच्या स्पष्टवक्तेपणाचा कोणीतरी गैरसमज करून घेऊ शकतो, म्हणून आपले बोलणे संतुलित ठेवा.
हेही वाचा – माझं गाव अन् बालपणीचे मित्र
धनु – आळस ही आज तुमची सर्वात मोठी समस्या बनू शकते. जर तुम्ही काम पुढे ढकलत राहिलात, तर लहान समस्यादेखील मोठ्या होऊ शकतात, त्यामुळे कामे वेळेत हातावेगळी करत राहणे महत्त्वाचे आहे. घरात बदल करण्याची किंवा घराचे सुशोभीकरण करण्याची गरज आहे पण टाळाटाळ करून तुम्ही ते काम पुढे ढकलत राहाल. कामाच्या ठिकाणी ताण वाढेल, पण परिस्थिती हाताळण्यास सहकारी मदत करतील. आज बोलण्यापूर्वी विचार करणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल.
मकर – आज लाभ होण्याची सकारात्मक चिन्हे आहेत. वैवाहिक समस्या हळूहळू सुटतील आणि जोडीदारासोबतचे नाते अधिक सौहार्दपूर्ण होईल. मात्र तुमच्या जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका; एका लहानशा गोष्टीचे रूपांतर कटुतेत होऊ शकते. नवीन व्यक्तीशी मैत्री होऊ शकते, जी भविष्यात तुमच्यासाठी महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. तुमच्या नवीन प्रयत्नांना सकारात्मक यश मिळेल. बऱ्याच काळापासून उसनी दिलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ – आजचा दिवस थोडा अस्थिर असू शकतो, पण घाबरण्याची गरज नाही. कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता असली तरी, तुमचा उत्साह आणि आत्मविश्वास तुम्हाला परिस्थिती हाताळण्यास मदत करेल. कौटुंबिक सलोखा टिकून राहील. विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून दिलासा मिळेल आणि ते अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील. दिलेली वचने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आपल्या विरोधकांची रणनीती समजून घेऊन, तुम्ही त्यांच्यावर मात करू शकाल.
मीन – आज तुम्हाला विविध क्षेत्रांमध्ये संतुलन राखावे लागेल. विचारपूर्वक घेतलेले निर्णय तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करतील. राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रात असलेल्यांना एक महत्त्वपूर्ण संधी मिळू शकते. दिरंगाई करण्याऐवजी, समस्येवर वेळेवर तोडगा काढा. घरी नवीन पाहुण्यांच्या आगमनाने आनंद होईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. त्यांच्या मेहनतीचे सकारात्मक फळ मिळण्याची अपेक्षा आहे.


