अध्याय चौदावा
उदासीनवदासीनो गुणैर्यो न विचाल्यते । गुणा वर्तन्त इत्येव योsवतिष्ठति नेङ्गते ॥23॥
तैसे गुणागुणकार्य हें । आघवेंचि आपण आहे । म्हणौनि एकेका नोहे । तडातोडी ॥336॥ येवढे गा प्रतीती । तो देहा आलासे वस्ती । वाटे जातां गुंती- । माजीं जैसा ॥337॥ तो जिणता ना हारवी । तैसा गुण नव्हे ना करवी । जैसी कां श्रोणवी । संग्रामींची ॥338॥ कां शरीराआंतील प्राणु । घरीं आतिथ्याचा ब्राह्मणु । नाना चोहटाचा स्थाणु । उदासु जैसा ॥339॥ आणि गुणाचा यावाजावा । ढळे चळे ना पांडवा । मृगजळाचा हेलावा । मेरु जैसा ॥340॥ हें बहुत कायि बोलिजे । व्योम वारेनि न वचिजे । कां सूर्य ना गिळिजे । अंधकारें ॥341॥ स्वप्न कां गा जियापरी । जागतयातें न सिंतरी । गुणीं तैसा अवधारीं । न बंधिजे तो ॥342॥ गुणां कीर नातुडे । परी दुरूनि जैं पाहे कोडें । तैं गुणदोष सायिखडें । सभ्यु जैसा ॥343॥ सत्कर्में सात्त्विकीं । रज तें रजोविषयकीं । तम मोहादिकीं । वर्तत असे ॥344॥ परिस तयाचिया गा सत्ता । होती गुणक्रिया समस्ता । हें फुडें जाणे सविता । लौकिका जेवीं ॥345॥ समुद्रचि भरती । सोमकांतचि पाझरती । कुमुदें विकासती । चंद्रु तो उगा ॥346॥ कां वाराचि वाजे विझे । गगनें निश्चळ असिजे । तैसा गुणाचिये गजबजे । डोलेना जो ॥347॥ अर्जुना येणें लक्षणें । तो गुणातीतु जाणणें । परिस आतां आचरणें । तयाचियें ॥348॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : घटाचिया खापरिया, घटभंगीं फेडिलिया
अर्थ
उदासीनासारखा राहणारा, जो गुणांच्या (गुणकार्य जे सुखदु:खादिक त्यांच्या) येण्याजाण्याने चाळविला जात नाही, ते गुण आपापली कर्मे करीत आहेत (माझा त्यांच्याशी संबंध नाही) असे म्हणून तटस्थ राहतो तो (गुणांच्या गजबजाटाने) डोलत नाही, ॥23॥
त्याप्रमाणे गुण व गुणांचे जे कार्य आहे हे तो सर्व आपणच आहे, म्हणून एकेका गुणाच्या उत्कर्षाने त्याचे चित्त विस्कळीत होत नाही. ॥336॥वाटेने जाणारा वाटसरु (संध्याकाळ वगैरे) अडचणीत सापडल्यामुळे जसा वस्तीला (धर्मशाळेत वगैरे) राहतो, तसा तो गुणातीत पुरुष (प्रारब्धभोगाच्या) अडचणीत सापडल्यामुळे एवढ्या (थोर) अनुभावाने देहात उदासीनतेने वस्तीला आलेला असतो. ॥337॥ ज्याप्रमाणे युद्धाची भूमी (यशापयशाविषयी उदास असते), त्याप्रमाणे तो गुणांना जिंकणारा नसतो अथवा गुणांकडून पराभव पावणारा नसतो व त्याचप्रमाणे तो गुण नसतो अथवा तो गुणांकडून (काही) करवीत नाही. ॥338॥ अथवा शरीरातील प्राण जसा उदास असतो किंवा घरी आलेला पांथस्थ ब्राह्मण जसा त्या घरसंबंधाने उदास असतो, अथवा चव्हाट्यावरील खांब जसा उदास असतो (त्याप्रमाणे जो देहादि गुणाकार्यावर उदास असतो). ॥339॥ आणि अर्जुना, मृगजळाच्या हेलकाव्याने जसा मेरु पर्वत यत्किंचितही हालत नाही, तसा तो गुणातीत पुरुष गुणांच्या येण्याजाण्याने गडबडत नाही, ॥340॥ हे फार बोलून काय करावयाचे आहे? आकाश जसे वार्याने हलत नाही अथवा सूर्य जसा अंधाराकडून गिळला जात नाही ॥341॥ जागे असलेल्या मनुष्यास स्वप्न जसे भ्रमात पाडत नाही, अर्जुना तसा तो गुणांकडून बांधला जात नाही, हे समज. ॥342॥ गुणांच्या तडाख्यात तर तो सापडतच नाही, तेव्हा जसा एखादा सभ्य गृहस्थ (प्रेक्षक) हालणार्या लाकडी बाहुल्यांच्या चेष्टा दुरून पाहतो, तसा गुणांचे कमीजास्तपण दुरून कौतुकाने (साक्षीरूपाने) पाहातो. ॥343॥ सात्विक गुण सत्कर्मे करतो, रजोगुण रजोगुणी कर्मे करतो व तमोगुण मोहादिक तामसी कर्मे करतो. ॥344॥ अर्जुना ऐक. जशा लोकांच्या क्रिया सूर्याच्या सत्तेने चालतात, त्याप्रमाणे गुणांच्या सर्व क्रिया त्याच्या (गुणातीत पुरुषाच्या) सत्तेने चालतात, हे तू पक्के समज. ॥345॥ (चंद्रोदयाने) समुद्रालाच भरती येते, चंद्रकांत मण्यांनाच पाझर फुटतो व चंद्रविकासी कमळे उमलतात पण चंद्र तर (स्वत:) काही हालचाल करत नाही. ॥346॥ अथवा वाराच वाहतो अथवा वाहण्याचा बंद होतो, पण आकाश (ज्याप्रमाणे) स्थिर असते, त्याप्रमाणे गुणांच्या हालचालीने जो गडबडत नाही ॥347॥ अर्जुना, या लक्षणांनी तो गुणातीत पुरुष ओळखावा. आता त्याची जी वागणूक आहे, ती ऐक. ॥348॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : पैं मोहाचां अवसरीं, ज्ञानाची चाड न धरी


