हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर घालून तुरीच्या दाण्यांचा केलेला भरडा आणि त्यात मेथीची पाने टाकून केलेली कोरडी भाजी… त्याच्या सोबतीला ज्वारीची खमंग भाजलेली कडक भाकरी, मेथीचा खुडा (ज्याला घोळणा म्हणतात)… शेंगदाण्याचे जाडसर कूट आणि भरपूर लसूण, कोथिंबीर घातलेले तळणीचे लाल तिखट… असे असले की, शेतातील दुपारच्या अस्सल जेवणाचा आनंद मिळतो. असं साधं, सोपं पण सकस जेवण तयार करायला फारसा वेळही लागत नाही. अगदी अर्ध्या तासात तुम्ही जेवायला बसू शकता. त्यातही जर लसूण सोलून ठेवलेला असेल किंवा मेथी तोडून ठेवली असेल तर अजूनचं कमी वेळ लागतो. या जेवणाचा आनंद तुम्हालाही घ्यायला नक्कीच आवडेल हो ना? त्याकरिता या तुरीचा भरडा आणि मेथीच्या भाजीची रेसिपी खाली दिली आहे.
साहित्य
- ओले तुरीचे दाणे – एक वाटीभर
- लसूण – आठ ते दहा पाकळ्या
- हिरव्या मिरच्या – सात-आठ
- कोथिंबीर – मुठभर (बारीक चिरलेली)
- जिरे – दोन चमचे
- मीठ – चवीनुसार
- मेथीची चिरलेली पाने – दोन वाट्या
- हळद – एक चमचा
- मोहरी – एक चमचा
- हिंग – एक चमचा
- कांदा – एक (बारीक चिरलेला)
- तेल – एक पळीभर
हेही वाचा – Recipe : तुरीच्या ओल्या दाण्यांची (सोले) आमटी
कृती
- प्रथम कढईत थोड्या तेलावर तुरीचे दाणे भाजून घ्यावेत.
- दाणे थंड झाल्यावर ते मिक्सरमध्ये टाकून त्यात लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, एक चमचा जिरे आणि मीठ टाकून त्याची जाडसर भरड करून घ्यावी.
- कढईत एक पळीभर तेल टाकून ते तापले की, त्यात मोहरी, उरलेले जिरे टाकावे. ते दोन्ही तडतडल्यावर त्यात एक चमचा हिंग टाकून बारीक चिरलेला कांदा टाकावा.
- कांदा थोडा गुलाबी झाल्यावर त्यामध्ये एक चमचा हळद टाकून नंतर त्यात मेथीची चिरलेली पाने घालून ती परतून घ्यावी.
- मेथीची पाने थोडी शिजल्यावर त्यात तुरीच्या दाण्यांचा भरडा टाकून सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यावे, थोडे मीठ टाकावे (भरड्यात आधीच मीठ असल्याने दुसऱ्यांदा मीठ आवश्यक तितकेचं टाकावे.)
- मीठ घातल्यावर परत एकदा सर्व साहित्य एकत्र करावे.
- नंतर कढईवर झाकण ठेवून त्यावर पाणी टाकून या भाजीला एक वाफ आणावी.
- दोन-तीन मिनीटांनी कढईवरील ताटली काढून परत एकदा ही भाजी एकत्र कालवून थोडी घट्ट करावी. भाजीचा थोडा घट्टसर गोळा झाला की, गॅस बंद करावा.
हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… तुरीच्या उसळीतील दिवसे!
असा घ्या आनंद
- असा तुरीच्या ओल्या दाण्यांचा भरडा आणि मेथीची पाने घातलेली ही भाजी ज्वारीच्या कडक भाकरीसोबत पानात वाढून घ्यावी.
- एका बाऊलमध्ये मेथीची पाने घेऊन त्यामध्ये मोड आलेले मूग, बारीक चिरलेला मुळा, पातीचा कांदा, कोथिंबीर, अर्धा चमचा तिखट, जिरे, तेल आणि मीठ घालून हा मेथीचा खुडा किंवा घोळाणा तयार करावा. त्याने चव आणखी वाढते.
- चवीला शेंगदाण्याचे कूट घातलेले तळलेले तिखट आणि कांदा घ्यावा.
साधाच परंतु सोपा आणि सकस असा जेवणाचा हा बेत तुम्हाला कसा वाटला?


