अध्याय चौदावा
मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहम् । संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत ॥3॥
एऱ्हवीं तरी महद्ब्रह्म । यालागीं हें ऐसें नाम । जे महदादिविश्राम । शालिका हें ॥67॥ विकारां बहुवस थोरी । अर्जुना हेंचि करी । म्हणोनि अवधारीं । महद्ब्रह्म ॥68॥ अव्यक्तवादमतीं । अव्यक्त ऐसी वदंती । सांख्याचिया प्रतीती । प्रकृति हेचि ॥69॥ वेदांतीं इयेतें माया । ऐसें म्हणिजे प्राज्ञराया । असो किती बोलों वायां । अज्ञान हें ॥70॥ आपुला आपणपेयां । विसरु जो धनंजया । तेंचि रूप यया । अज्ञानासी ॥71॥ आणिकही एक असे । जें विचारावेळे न दिसे । वातीं पाहतां जैसें । अंधारें कां ॥72॥ हालविलिया जाये । निश्चळीं तरी होये । दुधीं जैसी साय । दुधाची ते ॥73॥ पैं जागरु ना स्वप्न । ना स्वरूप अवस्थान । ते सुषुप्ति कां घन । जैसी होय ॥74॥ कां न वियतां वायूतें । वांझें आकाश रितें । तयाऐसें निरुतें । अज्ञान गा ॥75॥ पैल खांब कां पुरुखु । ऐसा निश्चयो नाहीं एकु । परी काय नेणों आलोकु । दिसत असे ॥76॥ तेवीं वस्तु जैसी असे । तैसी कीर न दिसे । परी कांहीं अनारिसें । देखिजेना ॥77॥ ना राती ना तेज । ते संधि जेवीं सांज । तेवीं विरुद्ध ना निज । अज्ञान आथी ॥78॥ ऐसी कोण्ही एकी दिशा । तिये वादु अज्ञान ऐसा । तया गुंडलिया प्रकाशा । क्षेत्रज्ञु नांव ॥79॥ अज्ञान थोरिये आणिजे । आपणपें तरी नेणिजे । तें रूप जाणिजे । क्षेत्रज्ञाचें ॥80॥ हाचि उभय योगु । बुझें बापा चांगु । सत्तेचा नैसर्गु । स्वभावो हा ॥81॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : अनादि जे मुक्तता, आपुली असे पंडुसुता
अर्थ
महत् ब्रह्म म्हणजे माया ही माझे (सृष्टीचे) बीज ठेवण्याचे ठिकाण आहे, तिच्यामधे मी (जगदुत्पत्तीचे) बीज ठेवतो. हे अर्जुना, त्यापासून सर्व भूतांची उत्पत्ती होते. ॥3॥
सहज विचार करून पाहिले तर याला (अज्ञानाला) महद्ब्रह्म असे नाव आहे. महत् तत्त्वादिक तत्त्वांना हे विश्रांतीस्थान आहे कारण ॥67॥ अर्जुना, हेच विकारांना पुष्कळसे वाढविते. म्हणून हे महत् ब्रह्म आहे असे समज. ॥68॥ अव्यक्तवादी लोकांच्या मताप्रमाणे याला अव्यक्त असे म्हणतात व सांख्यांच्या अनुभवाप्रमाणे हीच प्रकृति होय. ॥69॥ हे बुद्धिमंतांच्या राजा अर्जुना, वेदान्ती लोक याला माया असे म्हणतात. उगीच पाल्हाळ किती करायचा? तर हे बोलणे राहू दे. (थोडक्यात सांगावयाचे म्हणजे) हे अज्ञान आहे. ॥70॥ अर्जुना, आपला आपल्याला जो विसर (पडतो) तेच या अज्ञानाचे रूप आहे. ॥71॥ या अज्ञानाचा आणखी एक स्वभाव असा आहे की, ज्याप्रमाणे दिवा घेऊन अंधार पाहू गेले असता तो दिसत नाही, त्याप्रमाणे ते (अज्ञान) विचाराच्या वेळी दिसत नाही. ॥72॥ ज्याप्रमाणे दुधाची साय दूध निश्चल असतांना दिसते व दूध ढवळले असता दिसेनाशी होते ॥73॥ जिच्यामधे जागेपणा नाही व स्वप्न नाही अथवा स्वरूपस्थिती नाही, अशी गाढ सुषुप्ति असते. ॥74॥ अथवा अर्जुना, वायु उत्पन्न होण्यापूर्वी आकाश जसे निष्फळ रिकामे असते, त्यासारखे खरोखर अज्ञान आहे. (जेथे यथार्थ स्वरूपाचे भान नाही, अथवा विपरीत देहादिकांचे भान नाही, अशी जी स्फुरणरहित अवस्था, त्यासच अज्ञान म्हणावयाचे) ॥75॥ पलीकडे दिसत आहे तो खांब आहे की पुरुष आहे, असा एक निश्चय होत नाही, काय भास होतो हे कळत नाही, परंतु दिसत आहे हे खरे ॥76॥ त्याप्रमाणे ब्रह्मवस्तु जशी असते तशी खरोखर दिसत नाही, परंतु काही विपरीत दिसत असेल, तर तेही दिसत नाही ॥77॥ रात्र नाही व दिवसही नाही त्य़ा वेळेला जशी सांजवेळ म्हणातात, त्याप्रमाणे (ज्या अवस्थेत) विपरीत ज्ञान नसते अथवा स्वरूपज्ञान नसते (केवळ) अज्ञान असते. ॥78॥ अशी कोणी एक अवस्था आहे, तिला अज्ञान असे म्हणतात आणि त्या अज्ञानाने गुंडाळलेला जो चित्प्रकाश, त्याला क्षेत्रज्ञ असे नाव आहे. ॥79॥ (आता क्षेत्रज्ञाचा स्वभाव सांगतात) अज्ञानास महत्व आणावे आणि आपल्या स्वरूपाला तर जाणू नये, ते क्षेत्रज्ञाचे स्वरूप जाणावे. ॥80॥ हाच क्षेत्रज्ञ व क्षेत्र या दोघांचा संबध आहे. तो तू बाबा, चांगला समज. हा (अज्ञानाशी संबंध असणे, हा) सत्तेचा (सामान्य चैतन्याचा) सहजच स्वभाव आहे. ॥81॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : अर्जुना तयापरी, सरली द्वैताची वारी


