अध्याय चौदावा
श्रीभगवानुवाच ।
परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् । यज् ज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः ॥1॥
म्हणोनि गा पुढती । सांगिजेल तुजप्रती । पर म्हण म्हणो श्रुतीं । डाहारिलें जें ॥41॥ एऱ्हवीं ज्ञान हें आपुलें । परि पर ऐसेनि जालें । जे आवडोनि घेतलें । भवस्वर्गादिक ॥42॥ अगा याचि कारणें । हें उत्तम सर्वांपरी मी म्हणें । जे वन्हि हें तृणें । येरें ज्ञानें ॥43॥ जियें भवस्वर्गातें जाणती । यागचि चांग म्हणती । पारखी फुडी आथी । भेदीं जेयां ॥44॥ तियें आघवींचि ज्ञानें । केलीं येणें स्वप्नें । जैशा वातोर्मी गगनें । गिळिजती अंतीं ॥45॥ कां उदितें रश्मिराजें । लोपिलीं चंद्रादि तेजें । नाना प्रळयांबुमाजें । नदी नद ॥46॥ तैसें हें येणें पाहलेया । ज्ञानजात जाय लया । म्हणोनियां धनंजया । उत्तम हें ॥47॥ अनादि जे मुक्तता । आपुली असे पंडुसुता । तो मोक्षु हाता येता । होय येणें ॥48॥ जयाचिया प्रतीती । विचारवीरीं समस्तीं । नेदिजेचि संसृती । माथां उघडू ॥49॥ मनें मन घालूनि मागें । विश्रांति जालिया आंगें । ते देहीं देहाजोगे । होतीचि ना ॥50॥ मग तें देहाचें बेळें । वोलांडूनि एकेचि वेळे ।
संवतुकी कांटाळें । माझें जालें ॥51॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : प्रमेयमहापूरें, मतिगंगा ये थोरें
अर्थ
श्रीकृष्ण म्हणाले, ज्याला पर (ज्याला श्रुतींनी ‘पर’ म्हणजे दूरचा, परका) म्हणून म्हटले आहे, (पण जे आपलेच स्वरूप आहे), जे सर्व ज्ञानांमधे उत्तम आहे व जे जाणून सर्व मुनी या देहबंधनापासून मुक्त होऊन अत्यंत श्रेष्ठ सिद्धि (मुक्ती) पावले, असे हे ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो. ॥1॥
याकरिता श्रुतीने पर (सर्वांच्या पलीकडे) म्हणून जे (ज्ञान) वारंवार प्रसिद्ध केले आहे, ते ज्ञान तुला पुन्हा सांगण्यात येईल. ॥41॥ एऱ्हवी ज्ञान हे आपले रूपच आहे. परंतु संसार (मृत्युलोक) व स्वर्गलोक वगैरे आवडून घेतल्यामुळे (ते ज्ञान आपले स्वरूप असून) परके असे झाले आहे. ॥42॥ हे ज्ञान अग्नीसारखे व इतर ज्ञाने ही गवताप्रमाणे आहेत. म्हणून अर्जुना, हे ज्ञान सर्वां (ज्ञानां) पेक्षा उत्तम आहे. असे मी म्हणतो. ॥43॥ जी (इतर ज्ञाने) संसारस्वर्गाला विषय करतात व यज्ञच चांगले असे म्हणतात व द्वैतभावाची ज्यांना चांगली ओळख असते, ॥44॥ ती सर्व इतर ज्ञाने, या ज्ञानाने, स्वप्नासारखी मिथ्या केली आहेत. ज्याप्रमाणे वार्याच्या लाटा अखेरीस आकाशाकडून गिळल्या जातात, ॥45॥ अथवा सूर्य उगवला असता जशी चंद्रादिक तेजे लोपतात, अथवा प्रलयकाळच्या पाण्याच्या महापुराने जसे नदी व नद नाहीसे होतात ॥46॥ अर्जुना, त्याप्रमाणे हे ज्ञान उदय पावले असता इतर सर्व ज्ञाने लय पावतात. म्हणून अर्जुना, हे ज्ञान उत्तम आहे. ॥47॥ अर्जुना, आपली जी अनादि मुक्तता आहे, ती मुक्तता (मोक्ष) या ज्ञानाने हस्तगत होते. ॥48॥ ज्याच्या अनुभवाने सर्व विचारशूर पुरुष संसाराला डोके वर करूच देत नाहीत. ॥49॥ ते विचारशूर पुरुष, आपली विषयांकडे असलेली मनाची प्रवृत्ति मनानेच मागे हटवून, अंगाने विश्रांती झाल्यावर (स्वत: ब्रह्मरूप झाल्यावर) जरी देहांत असतात, तरी पण ते देहाजोगे होत नाहीत. (देहाएवढेच आपल्याला समजत नाहीत). ॥50॥ मग देहाचे दुबेळके (स्थूल व सूक्ष्म देहच) एकाच वेळेला ओलांडून (निरास करून) ते पुरुष वजनात माझ्या बरोबरीचे झाले. ॥51॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : गुण ते कैसे किती, बांधती कवणे रीती


