अध्याय चौदावा
तत्र सत्त्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम् । सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ ॥6॥
तेवीं सत्त्वें लुब्धकें । सुखज्ञानाचीं पाशिकें । वोढिजती मग खुडके । मृगु जैसा ॥148॥ मग ज्ञानें चडफडी । जाणिवेचे खुरखोडी । स्वयंसुख हें धाडी । हातींचें गा ॥149॥ तेव्हां विद्यामानें तोखे । लाभमात्रें हरिखे । मी संतुष्ट हेंही देखे । श्लाघों लागे ॥150॥ म्हणे भाग्य ना माझें । आजि सुखियें नाहीं दुजें । विकाराष्टकें फुंजे । सात्त्विकाचेनि ॥151॥ आणि येणेंही न सरे । लांकण लागे दुसरें । जें विद्वत्तेचें भरे । भूत आंगीं ॥152॥ आपणचि ज्ञानस्वरूप आहे । तें गेलें हें दुःख न वाहे । कीं विषयज्ञानें होये । गगनायेवढा ॥153॥ रावो जैसा स्वप्नीं । रंकपणें रिघे धानीं । तो दों दाणा मानी । इंद्रु ना मी ॥154॥ तैसें गा देहातीता । जालेया देहवंता । हों लागे पंडुसुता । बाह्यज्ञानें ॥155॥ प्रवृत्तिशास्त्र बुझे । यज्ञविद्या उमजे । किंबहुना सुझे । स्वर्गवरी ॥156॥ आणि म्हणे आजि आन । मीवांचूनि नाहीं सज्ञान । चातुर्यचंद्रा गगन । चित्त माझें ॥157॥ ऐसें सत्त्व सुखज्ञानीं । जीवासि लावूनि कानी । बैलाची करी वानी । पांगुळाचिया ॥158॥ आतां हाचि शरीरीं । रजें जियापरी । बांधिजे तें अवधारीं । सांगिजेल ॥159॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : बंधु कां न बंधिजे, हें जाणणें मज माझें
अर्थ
त्याप्रमाणे सत्वगुण निर्मल असल्यामुळे प्रकाश करणारा व उपद्रवरहित आहे. पापरहिता, तो सत्त्वगुण सुखाच्या (मी सुखी) व ज्ञानाच्या संगतीने (मी ज्ञानी) या दोन पाशांनी प्राण्याला बद्ध करतो. ॥6॥
त्याप्रमाणे सत्त्वगुणरूपी पारध्याकडून सुखरूपी व ज्ञानरूपी पाश ओढले जातात मग हरिण जसा पारध्याच्या पाशात अडकतो, तसा तो सुख आणि ज्ञान या पाशांत अडकतो. ॥148॥ नंतर ज्ञानाने चरफडावयास लागतो व जाणीवरूपी लाथा झाडतो आणि अरे, आपल्यापाशी असलेले आपले आत्मसुख आपणच व्यर्थ घालवतो. ॥149॥ तेव्हा विद्येने व मानाने संतुष्ट होतो, कोणाताही लाभ झाला तर आनंद पावतो, आपण संतुष्ट आहोत हेही पाहतो व आपणास धन्य मानतो. ॥150॥ आणि म्हणतो, “माझे भाग्य उत्तम नाही काय? आज माझ्यासारखा दुसरा कोणी सुखी नाही” असा अष्टसात्विक भावांनी गर्वाला चढतो. ॥151॥ आणि एवढ्यानेच संपत नाही, तर त्याच्या मागे दुसरे बंधन लागते, ते हे की, त्याच्या अंगात विद्वत्तारूपी भूताचा संचार होतो. ॥152॥ आपण स्वत: ज्ञानरूप आहो, ते (आपले ज्ञानरूपत्व) गेले, त्याचे दु:ख मानीत नाही, तर उलट विषमज्ञानाने आकाशाएवढा होतो. (आपणास अत्यंत श्रेष्ठ मानतो). ॥153॥ जसा एखादा राजा स्वप्नात आपण भिकारी आहोत असे समजून नगरीत प्रवेश करतो व त्यास भिक्षा मागून दोन दाणे मिळाले असता, मी इंद्र नाही काय, असे मानतो. ॥154॥ अर्जुना, देहातीत जो आत्मा, त्याने देहाशी तादात्म्य केल्यावर त्याला बाह्य ज्ञानाने तसे होऊ लागते, ॥155॥ संसारसंबंधी शास्रे तो जाणतो, यज्ञविद्या त्यास समजते, फार काय सांगावे! त्यास स्वर्गापर्यंत सर्व दिसते. ॥156॥ आणि सांप्रत माझ्यावचून दुसरा कोणी जाणता नाही व माझे चित्त हे चातुर्यरूपी चंद्राला आकाश आहे, असे म्हणतो. ॥157॥ याप्रमाणे सत्त्वगुण हा जीवाला सुखरूपी व ज्ञानरूपी दावे लावून पांगुळाच्या बैलासारखी (नंदीबैलासारखी) त्याची स्थिती करतो. ॥158॥ आता हाच (आत्मा) देहामध्ये ज्या प्रकाराने रजोगुणाने बांधला जातो, तो प्रकार सांगण्यात येईल. तो ऐक. ॥159॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : येथ सत्त्व तें उत्तम, रज तें मध्यम


