अध्याय पंधरावा
अंगत्वचेचे वेलपल्लव । स्पर्शांकुरीं घेती धांव । तेथ बांबळ पडे अभिनव । विकारांचें ॥101॥ पाठीं रूपपत्र पेलोवेलीं । चक्षु लांब तें कांडें घाली । तेथ व्यामोहता भली । पाहाळीं जाय ॥102॥ आणि रसाचें आंगवसें । वाढतां वेगें बहुवसें । जिव्हे आर्तीची असोसें । निघती बेंचें ॥103॥ तैसेंचि कोंभैलेनि गंधें । घ्राणाची डिरी थांबुं बांधे । तेथ तळु घे स्वानंदें । प्रलोभाचा ॥104॥ एवं महदहंबुद्धि । मनें महाभूतसमृद्धी । इया संसाराचिया अवधी । सासनिजे ॥105॥ किंबहुना इहीं आठें । आंगीं हा अधिक फांटे । परी शिंपीचि येवढें उमटे । रुपें जेवीं ॥106॥ कां समुद्राचेनि पैसारें । वरी तरंगता असारे । तैसें ब्रह्मचि होय वृक्षाकारें । अज्ञानमूळ ॥107॥ आतां याचा हाचि विस्तारु । हाचि यया पैसारु । जैसा आपणपें स्वप्नीं परिवारु । येकाकिया ॥108॥ परी तें असो हें ऐसें । कावरें झाड उससे । यया महदादि आरवसें । अधोशाखा ॥109॥ आणि अश्वत्थु ऐसें ययातें । म्हणती जे जाणते । तेंही परिस हो येथें । सांगिजेल ॥110॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : घन अज्ञानसुषुप्ती, तो बीजांकुरभावो म्हणती
अर्थ
शरीरातील त्वगिंद्रियाचे वेल आणि पाने स्पर्शांकुरापर्यंत धाव घेतात. त्यावेळी नव्या नव्या विकारांची पुष्कळ वृद्धी होते. ॥101॥ यानंतर रूपाविषयीची पाने वाढली असता तेथपर्यंत चक्षु-इंद्रिय लांबलचक कांडे घालते, त्यावेळी भ्रमाचा चांगला विस्तार होतो. ॥102॥ आणि रसविषयरूपी ढगळे फार वेगाने वाढले असता जिव्हेला इच्छेची अतिशय पानात पाने फुटतात. ॥103॥ त्याचप्रमाणे गंधविषयरूप अंकुराची वाढ होण्यास लागली म्हणजे घ्राणेंद्रियाचा शेंडा बळ बांधण्यास लागतो, तेव्हा घ्राणेंद्रिय आनंदाने अतिशय लोभाचा तळ घेते, म्हणजे घ्राणेंद्रियास गंधाचा अतिशय लोभ सुटतो. ॥104॥ याप्रमाणे महतत्वापासून उत्पन्न झालेला अहंकार, बुद्धि, मन व पंचमहाभूतांचा समुदाय ही सर्व संसाराची मर्यादा तयार होते. ॥105॥ फार काय सांगावे! या आठ अंगांनी हा संसारवृक्ष अधिक वाढतो, परंतु जसे शिंपीवर भासणारे रूपे, हे आपले अधिष्ठन जी शिंप, तेवढेच भासते. ॥106॥ अथवा समुद्राच्या विस्ताराइतका त्यावर लाटपणा पसरतो, त्याप्रमाणे ब्रह्मच अज्ञानमूळ असलेल्या संसारवृक्षाच्या आकाराने तयार होते. ॥107॥ जसा एखादा पुरुष स्वप्नात आपण एकटाच आपला सर्व परिवार बनतो, त्याप्रमाणे एकाकी जे ब्रह्म, त्याचा सर्व परिवार हाच संसारवृक्ष आहे व त्याचा सर्व अवकाश हाच आहे. ॥108॥ परंतु हे वरील वर्णन करणे राहू दे. अशा या तर्हेने हा भ्रमात्मक संसारवृक्ष वाढत असून, महत्-तत्वादिकांच्या अंकुरापासून यास खाली फांद्या उत्पन्न होतात. ॥109॥ आणि ज्ञाते पुरुष याला अश्वत्थ असे म्हणतात. (याचे कारण काय?) तेही येथे सांगण्यात येईल, ऐक. ॥110॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : तो बुद्धीची घेऊनि आगारी, भेदाची वृद्धि करी


