दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 09 नोव्हेंबर 2026; वार : सोमवार
- भारतीय सौर : 18 कार्तिक शके 1948; तिथि : अमावस्या 12:31; नक्षत्र : स्वाती 07:23;
- योग : सौभाग्य 26:56; करण : किंस्तुघ्न 25:12;
- सूर्य : तुळ; चंद्र : तुळ 26:47; सूर्योदय : 06:41; सूर्यास्त : 18:02;
- पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
अभ्यंगस्नान
सोमवती अमावस्या दुपारी 12:31 पर्यंत
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
कोरियन मार्शल आर्ट ‘तायक्वोंडो’चे जनक जनरल चोई हाँग हाय
टीम अवांतर
पारंपरिक कोरियन युद्धकला आणि कराटे यांचा मेळ घालून तायक्वोंडोची रचना करणाऱ्या जनरल चोई हाँग हाय यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1918 रोजी म्योंग चुंग जिल्ह्यातील ह्वा डीए (सध्याच्या उत्तर कोरियाचा भाग) येथे झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी संपूर्ण कोरियावर जपानी साम्राज्याचे नियंत्रण होते.
ते लहानपणी प्रकृतीने थोडे अशक्त होते. वयाच्या 12 व्या वर्षी जपानी राजवटीविरुद्ध आंदोलन केल्यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले. नंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना प्रसिद्ध कॅलिग्राफर हान इक-दोंग यांच्याकडे कॅलिग्रफी शिकण्यासाठी पाठवले. हान इक-दोंग यांनी चोई यांना ‘ताएक क्योन’ ही प्राचीन कोरियन युद्धकला देखील शिकवली. पुढे उच्च शिक्षणासाठी जपानला गेल्यावर त्यांनी तेथे ‘शोटोकान कराटे’चे प्रशिक्षण घेतले आणि त्यात ब्लॅक बेल्ट मिळवला.
हेही वाचा – साप्ताहिक राशीभविष्य : 08 ते 14 नोव्हेंबर 2026
दुसऱ्या महायुद्धादरम्यान त्यांना बळजबरीने जपानी सैन्यात भरती करण्यात आले. मात्र त्यांनी कोरियन स्वातंत्र्यासाठी गुप्तपणे लढा सुरू ठेवला, ज्यामुळे त्यांना जपानविरुद्ध कट केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आले. तुरुंगातही त्यांनी आपली मार्शल आर्टची साधना सोडली नाही.
युद्ध संपल्यानंतर त्यांची सुटका झाली. त्यानंतर ते नव्याने तयार झालेल्या दक्षिण कोरियन सैन्यात सामील झाले. सैन्यात 2 स्टार मेजर-जनरल पदावर कार्यरत असताना त्यांनी आपल्या हाताखालील सैनिकांना मार्शल आर्टचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांनी कराटे आणि कोरियन पारंपरिक पद्धती एकत्र करून एक नवीन युद्धकला विकसित केली. 11 एप्रिल 1955 रोजी त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या नवीन मार्शल आर्टला अधिकृतपणे ‘तायक्वोंडो’ हे नाव दिले. कोरियन भाषेत ‘ताय’ म्हणजे पाय, ‘क्वाण’ म्हणजे मुष्टी (हात) आणि ‘डो’ म्हणजे मार्ग किंवा कला असा होतो.
तायक्वोंडोचा जगभर प्रसार करण्यासाठी त्यांनी 1966 रोजी इंटरनॅशनल तायक्वोंडो फेडरेशनची स्थापना केली आणि ते त्याचे पहिले अध्यक्ष बनले. त्यांनी तायक्वोंडोच्या मूळ 24 पद्धती विकसित केल्या आणि या कलेचा पहिला सर्वसमावेशक ज्ञानकोश (Encyclopedia) लिहिला.
1970 च्या दशकात दक्षिण कोरियाचे तत्कालीन राष्ट्रपती पार्क चुंग-ही यांच्याशी झालेल्या राजकीय मतभेदांमुळे जनरल चोई दक्षिण कोरिया सोडून कॅनडाला स्थायिक झाले. त्यामुळे त्यांनी आय.टी.एफ.चे मुख्यालयही कॅनडाला हलवले.
नंतर त्यांनी उत्तर कोरियामध्येही तायक्वोंडोची ओळख करून दिली, ज्यामुळे दक्षिण कोरिया सरकारसोबतचे त्यांचे वाद अधिक वाढले. पुडे दक्षिण कोरिया सरकारने ‘वर्ल्ड तायक्वोंडो फेडरेशन’ ची स्थापना केली, जी आज ऑलिम्पिक खेळांचे संचालन करते.
15 जून 2002 रोजी वयाच्या 83 व्या वर्षी प्योंगयांग, उत्तर कोरिया येथे कर्करोगाने त्यांचे निधन झाले. मार्शल आर्ट्स जगतात त्यांना अत्यंत आदराने ‘तायक्वोंडोचे जनक’ म्हटले जाते. त्यांचे नाव ‘तायक्वोंडो हॉल ऑफ फेम’ मध्येही समाविष्ट करण्यात आले आहे.
आजचे राशिभविष्य
मेष – आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. दिवसभर तुम्हाला ताजेतवाने वाटेल. तुमच्या सभोवताली सकारात्मक ऊर्जा असेल आणि लोक तुमच्या वागणुकीने खूश होतील. आज एका मोठ्या व्यावसायिक समूहासोबत भागीदारी करण्याचा विचार कराल. आज अपेक्षेपेक्षा जास्त आर्थिक लाभ होईल. कला क्षेत्रातील लोकांना समाजात अधिक आदर मिळेल आणि लोक तुमच्या सर्जनशीलतेचे कौतुक करतील. वैवाहिक सुखात वाढ होईल. तुमचे आरोग्य देखील सुधारेल.
वृषभ – आज व्यवसायात नेहमीपेक्षा जास्त नफा होईल. आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. नोकरी करणाऱ्या जातकांना आपली कामे पूर्ण करण्यासाठी थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील मात्र तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले निकाल मिळतील. आरोग्याच्या दृष्टीने देखील आजचा दिवस चांगला आहे. नवविवाहित दांपत्याच्या नात्यात अधिक गोडवा येऊ शकतो.
मिथुन – आज तुम्ही उत्साही आणि आनंदी असाल, त्यामुळे जे काही काम हाती घ्याल, ते पूर्ण मनाने कराल. कामाच्या ठिकाणी नवीन अनुभव मिळेल. मानसिक त्रास दूर झाल्याने तुम्हाला आनंद मिळेल. तुमचे सामाजिक वर्तुळ आणि संपर्क वाढेल. अर्थात सार्वजनिक ठिकाणी बोलताना स्वतःच्या भाषेवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे, अन्यथा कोणाच्यातरी भावना दुखावल्या जातील. नातेवाईकांच्या घरी येण्यामुळे दैनंदिन वेळापत्रकात बदल होऊ शकतो. घरात आनंदी वातावरण राहील.
कर्क – आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक ठरणार आहे. विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे, परंतु त्यासाठी अभ्यासात अधिक मेहनत करण्याची तयारी ठेवा. आज दिवसभर तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. नोकरदार मंडळींना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. तुमचे कनिष्ठ देखील तुमच्याकडून काम शिकण्यास उत्सुक असतील. जोडीदारासोबतचे तुमचे नाते सुधारेल.
सिंह – तुम्ही जे काही काम हाती घ्याल, त्यात आज तुम्हाला यश मिळेल. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. एखादा नातेवाईक तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी उपयुक्त सूचना देईल. तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. वडीलधारी मंडळी देखील तुमच्या वागणुकीने खूश असतील. मात्र वाहन चालवताना आज विशेष सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. सुख आणि समृद्धीत वाढ होईल.संततीच्या अभ्यासासाठी आवश्यक साहित्य विकत घ्यावे लागेल.
कन्या – आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. तुम्ही काम आणि कुटुंब यात उत्तम संतुलन राखाल. एखादे काम पूर्ण करण्यासाठी नवीन मार्गांचा विचार कराल. व्यावसायिक आपला व्यवसाय वाढवण्यात यशस्वी होतील. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. आज नवीन वाहन खरेदीचा विचार कराल. एखाद्या कामात जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. विद्यार्थी पालकांच्या सोबतीने आणि पाठिंब्याने मन लावून अभ्यास करताना दिसतील.
तुळ – आजचा दिवस अनुकूल आहे. थांबलेले व्यावसायिक प्रकल्प पुन्हा सुरू होतील, त्यामुळे तुमची व्यस्तता वाढेल. नोकरदार जातकांना त्यांची नेमून दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील, अन्यथा त्यांना वरिष्ठांकडून कानउघाडणीला सामोरे जावे लागू शकते. जोडीदारासोबत एखाद्या लांबच्या प्रवासाला जाण्याचा निर्णय घ्याल. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्याल आणि तुमच्या निर्णयाला इतर सदस्य पाठिंबा देतील.
वृश्चिक – आजचा दिवस चांगला आहे. अनावश्यक चिंतांपासून मुक्तता मिळेल. मोकळा वेळ एखाद्या मंदिरात किंवा धार्मिक स्थळी घालवाल. सहलीला जाण्याचीही शक्यता आहे, जी आनंददायक असेल. मोकळ्या वेळेत, तुम्ही स्वतःच्या सामर्थ्यांवर आणि कमतरतेवर चिंतन कराल. आज स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि आपल्याच व्यक्तिमत्त्वाचे मूल्यांकन करा. संध्याकाळी आवडत्या नातेवाईकांचे घरी आगमन होईल. त्यामुळे परिवारात आनंदाचे वातावरण असेल.
हेही वाचा – Homeopathy : मटेरिया मेडिकाची पार्श्वभूमी
धनु – आज नवीन आर्थिक संधी उपलब्ध होतील. कौटुंबिक सुखसोयी आणि आनंदात वाढ होईल. आज पूर्ण आत्मविश्वासाने तुम्ही तुमची सर्व प्रलंबित कामे वेगाने पूर्ण कराल. व्यवसाय विषयक योजनांसाठी तुम्हाला अतिरिक्त आर्थिक मदतीची आवश्यकता भासू शकते. घरातील वडीलधाऱ्यांकडून ही मदत आणि मार्गदर्शन मिळेल.आज तुमचे सर्व प्रयत्न यशस्वी होतील.
मकर – आज तुम्हाला संयम बाळगण्याची गरज आहे. वाहनविषयक व्यवसायात असणाऱ्या जातकांना नफा होईल. प्रशासकीय सेवेतील एखाद्या मित्रामुळे लाल फितीत अडकलेल्या एखाद्या कामाबाबत तुम्हाला फायदा होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्याची शक्यता आहे. नातेवाईकांसोबत तुमचा संवाद वाढेल. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी तुम्ही उत्साही असाल. स्पर्धा परीक्षेचा अर्ज भरण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांना आजचा दिवस चांगला आहे.
कुंभ – आज दिवसभर तुमच्यात सकारात्मकता टिकून राहील. तुम्ही जे काही काम सुरू कराल, ते वेळेवर पूर्ण होईल. नवीन नातेसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. जवळच्या नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण झाला असेल तर ते सुधारण्याचाही प्रयत्न कराल, ज्यात तुम्हाला यश मिळेल. आज ऑफिसमध्ये तुमच्या कामाची प्रशंसा होईल. संततीच्या करिअरबद्दल थोडी चिंता वाटू शकते आणि याबाबत तुम्ही मुलांशी संवाद साधाल. प्रिय व्यक्तीच्या अचानक भेट देण्यामुळे परिवारात आनंदाचे वातावरण असेल.
मीन – आज तुम्ही आईला एखादी भेटवस्तू देऊ शकता, ज्यामुळे तिला आनंद होईल. तुमची प्रलंबित कामे अज पूर्ण होतील. बोलण्यापेक्षा ऐकण्यावर अधिक लक्ष केंद्रित करा; यामुळे तुम्हाला काहीतरी महत्त्वाचे शिकायला मिळू शकते. काही लोक तुमच्या शब्दांनी प्रभावित होतील आणि तुमच्याशी संपर्क साधतील. या राशीत जन्मलेल्या कवींना त्यांच्या एखाद्या कवितेसाठी प्रशंसा मिळू शकते, ज्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित होईल. आज खर्च वाढू शकतो. त्यामुळे बजेटवर लक्ष ठेवा.


