तुझं असं आवेगाने येणं नेहमीचचं आहे.
वाट बघण्यासाठी जे धैर्य लागतं ते नाही तुझ्यात,
माहिती आहे मला.
अरे किती वर्षांची मैत्री आहे आपली.
अगदी लहानपणापासून ओळखते मी तुला…
तेव्हा आपण दोघंही किती निष्पाप होतो रे…
तू यायचास, आणि मी सगळं सोडून धावत बाहेर यायचे.
तुझ्याबरोबर नाचायचे काय, उड्या मारायचे काय,
आणि अभ्यासाच्या वहीचे पानं फाडून आपण सोबत केलेल्या होड्या,
त्या वेडेपणातही किती मजा होती ना?
हेही वाचा – सौंदर्याचा सुवर्णपाश!
हळूहळू वय वाढलं… आणि आपलं नातंही बदललं.
त्या निरागस धडपडीतला खट्याळपणा कमी झाला.
आता तू यायचास आणि मी कधी अंगणात तर कधी गच्चीवर फक्त शांतपणे उभी राहायचे.
तुला अनुभवायचे. तुझ्या येण्याने मनात एक वेगळीच शिरशीरी उमटायची.
नंतर माझं लग्न झालं आणि तू मात्र नंतरही दरवर्षी येत राहिलास.
पण तेव्हा मला मात्र वेळच मिळेना रे.
आणि काय योगायोग म्हणावा तू यायचास आणि
आमच्या इकडल्या स्वारींना नेमकं तेव्हाच चहा आणि कांदा भजी यांची तलफ यायची.
मग काय सगळं उरकून बाहेर येईपर्यंत तू गेलेला असायचास
कदाचित रागात… कदाचित कंटाळून.
पण आता वयाच्या या टप्प्यावर मला तू येण्याची बरोबर चाहूल लागते.
मग मी zomato वरून वडापाव बोलवते.
तो येईपर्यंत इकडे मस्त आल्याचा चहा टाकते.
आणि किशोरी आमोणकरांचं सहेला रे लावून देते.
चहाचा वाफाळता कप आणि गरम गरम वडापाव घेऊन खिडकीत येऊन बसते.
तोवर तूही आलेला असतोस माझ्यावर असलेला सारा राग विसरून
मला आपल्या कितीतरी छान आठवणी सांगतोस.
कधी बरसतोस, कधी कोसळतोस…
कधी गुपचूप माझ्या खिडकीच्या गजांवर येऊन बसतोस…
कधी मला अजूनही इंद्रधनुषी स्वप्न दाखवतोस…
‘सहेला रे’च्या स्वरांनी शरीराचा आणि मनाचा ताबा घेतलेला असतोच.
खरं सांगते त्या क्षणाचा सोहळा झालेला असतो…
असं वाटतं तुझ्या थेंबांचं पैंजण पायात बांधवेत
…आणि तुझ्याबरोबर मनसोक्त नाचावं.
…किंवा आधी सारखं अंगणात उभे राहून फक्त भिजत रहावं,
ही कात टाकून द्यावी आणि पुन्हा त्या वयात जावं.
पण हे सगळं वाटत असताना का कोणास ठाऊक
मी तुला खिडकीतून फक्त बघत राहते…
माझ्या मौनाला तुझ्या लयीची साथ मिळते.
आणि मग अचानक
“जनम जनम को संग न भूले
अब के मिले सो बिछूड ना जाये|”
सुरू झालं की, आपोआप दोन थेंब गालावर ओघळतात.
तू हसतोस आणि म्हणतोस,
“बघ तुझ्या गालांवर उमटलेले ते दोन थेंब माझंच अस्तित्व आहे.'”
हेही वाचा – सारंग आणि चित्रा यांच्या नात्यातील धुसर छटा…


