सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
जी सहस्रशीर्षयाचें देखिलें । कोडीवरी होताति एकिवेळें । कीं परब्रह्मचि वदनफळें । मोडोनि आलें ॥269॥ तैसीं वक्त्रें जी जेउतीं तेउतीं । तुझीं देखतसे विश्वमूर्ती । आणि तयाचिपरी नेत्रपंक्ति । अनेका सैंघ ॥270॥ हें असो स्वर्ग पाताळ । कीं भूमी दिशा अंतराळ । हे विवक्षा ठेली सकळ । मूर्तिमय देखतसें ॥271॥ तुजवीण एकादियाकडे । परमाणुहि एतुला कोडें । अवकाशु पाहतसें परि न सांपडे । ऐसें व्यापिलें तुवां ॥272॥ इहीं नाना भूतीं सहितें । जेतुलीं साठविलीं होतीं महाभूतें । तेतुलाहि पवाडु तुवा अनंतें । कोंदला देखतसें ॥273॥ ऐसा कवणें ठायाहूनि तूं आलासी । एथ बैसलासि कीं उभा आहासि । आणि तूं कवणिये मायेचिये पोटीं होतासी । तुझें ठाण केवढें ॥274॥ तुझें रूप वय कैसें । तुजपैलीकडे काय असे । तूं काइसयावरी आहासि ऐसें । पाहिलें मियां ॥275॥ तंव देखिलें जी आघवेंचि । तरि आतां तुज देवा ठावो तूंचि । तूं कवणाचा नव्हेसि ऐसाचि । अनादि आयता ॥276॥ तूं उभा ना बैठा । दिघडु ना खुजटा । तुज तळीं वरी वैकुंठा । तूंचि आहासी ॥277॥ तूं रूपें आपणयांचि ऐसा । देवा तुझी तूंचि वयसा । पाठीं पोट परेशा । तुझें तूं गा ॥278॥ किंबहुना आतां । तुज तूंचि आघवें अनंता । हें पुढत पुढती पाहतां । देखिलें मियां ॥279॥ परि या तुझिया रूपाआंतु । जी उणीव एक असें देखतु । जे आदि मध्य अंतु । तिन्हीं नाहीं ॥280॥ एऱ्हवीं गिंवसिलें आघवां ठायीं । परि सोय न लाहेचि कहीं । म्हणोनि त्रिशुद्धी हे नाहीं । तिन्ही एथ ॥281॥ एवं आदिमध्यांतरहिता । विश्वेश्वरा अपरिमिता । तूं देखिलासि जी तत्त्वतां । विश्वरूपा ॥282॥
हेही वाचा – Dnyaneshwari : माजीं सापडलेनि अलिकुळें, जळावरी कमळकळिका जेवीं आंदोळे
अर्थ
महाराज, आपली हजारो मस्तके आहेत, (असे जे आपले श्रुतीने वर्णन केले आहे) त्याचा अनुभव या विश्वरूपात एकाच वेळी कोटीपेक्षाही अधिक वेळा मी घेतला, अथवा परब्रह्मच मुखरूपी फळांनी दाट भरून आले (असे दिसते). ॥269॥ त्याप्रमाणे हे विश्वरूपी परमेश्वरा, मी जिकडे तिकडे तुझी मुखे पाहात आहे आणि त्याचप्रमाणे डोळ्यांच्याही अनेक पंक्तीच्या पंक्ती जिकडे तिकडे पाहात आहे. ॥270॥ हे असो. हा स्वर्ग, हे पाताळ, किंवा ही पृथ्वी, या दिशा आणि हे आकाश असे बोलण्याची सोय राहिली नाही. सर्वच विश्वरूपाने भरलेले मी पाहात आहे. ॥271॥ तुझ्याशिवाय एखाद्या बाजूला परमाणूएवढी तरी जागा सापडेल म्हणून मी कौतुकाने शोधीत आहे, पण सापडत नाही, असे तू (सर्व) व्यापले आहेस. ॥272॥ या नाना प्रकारच्या प्राण्यांसहित जितकी महाभूते साठवली होती, तितकाही विस्तार, तू जो अनंत, त्या तुझ्याकडून पूर्ण भरलेला मी पाहात आहे. ॥273॥ असा तू कोणत्या ठिकाणाहून आलास? तू येथे बसलेला आहेस की उभा आहेस? आणि तू कोणत्या आईच्या पोटी होतास? तुझी आकृती तरी केवढी आहे? ॥274॥ तुझे रूप कसे, वय किती, तुझ्या पलीकडे काय आहे? आणि तू कशावर बसलेला आहेस? असे जेव्हा मी पाहू लागलो, ॥275॥ तेव्हा महाराज, हे मी सर्वच विचार करून पाहिले. तर देवा, आता तुझे ठिकाण तूच आहेस. तू कोणाचा नाहीस? तर तू अनादी आणि स्वत:सिद्ध असाच आहेस. ॥276॥ तू उभा नाहीस, अथवा बसलेला नाहीस. तू मोठा उंच नाहीस अथवा ठेंगणा नाहीस. देवा, तुझ्या खाली आणि तुझ्यावर तूच आहेस. ॥277॥ तू रूपाने आपल्यासारखाच आहेस. देवा, तुझे वय तूच आहेस आणि हे मायेच्या मालका, तुझी पाठ आणि पोट तूच आहेस. ॥278॥ आता फार काय सांगावे? हे अनंता, तुझे सर्व तूच आहेस. मी वारंवार विचार केल्यावर हेच मला कळले. ॥279॥ परंतु या तुझ्या रूपात जो एक कमीपणा मी पाहात आहे, तो हा की, तुझा आरंभ कोठे झाला आणि तुझा मध्य कोठे आहे आणि तुझा शेवट कोठे आहे, असे पाहू लागले असता, हे तिन्ही तुझ्या ठिकाणी नाहीत. ॥280॥ खरे म्हटले तर, तुझ्या विश्वरूपी मी हे (आदि, मध्य आणि अंत) सर्व ठिकाणी शोधले, पण त्यांचा कोठेच पत्ता लागत नाही. म्हणून तुझ्या स्वरूपी हे तिन्ही निश्चयेकरून नाहीत. ॥281॥ हे आरंभ, मध्य आणि शेवट नसलेल्या अमर्याद त्रैलोक्यनायका, मी याप्रमाणे तुला विश्वरूपा, खरोखर पाहिले. ॥282॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जी सत्यलोकु तुजमाजीं आहे, देखिला चतुराननु हा नोहे


