सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
अगा हा लोकु बापुडा । जाहला वदनज्वाळां वरपडा । जैसी वणवेयाचिया वेढां । सांपडती मृगें ॥435॥ आतां तैसें विश्वासि जाहालें । देवो नव्हे हें कर्म आलें । कीं जगजळचरां पांगिलें । काळजाळें ॥436॥ आतां इये अंगप्रभेचिये वागुरे । कोणीकडूनि निगिजैल चराचरें । वक्त्रें नव्हतीं जोहरें । वोडवलीं जगा ॥437॥ आगी आपुलेनि दाहकपणें । कैसेनि पोळिजे तें नेणे । परि जया लागे तया प्राणें । सुटिका नाहीं ॥438॥ माझेनि तिखटपणें । कैसें निवटे हें शस्त्र कायि जाणें । कां आपुलियां मारा नेणे । विष जैसें ॥439॥ तैसी तुज कांहीं । आपुलिया उग्रपणाची सेचि नाहीं । परि ऐलीकडे मुखीं खाई । हों सरली जगाची ॥440॥ अगा आत्मा तूं एकु । सकळविश्वव्यापकु । तरी का आम्हां अंतकु । वोडवलासी ॥441॥ तरि मियां सांडिली जीविताची चाड । आणि तुवांही न धरावी भीड । मनीं आहे तें उघड । बोल पां सुखें ॥442॥ किती वाढविसी या उग्ररूपा । अंगींचें भगवंतपण आठवीं बापा । नाहीं तरि कृपा । मजपुरती पाहीं ॥443॥
आख्याहि मे को भवानुग्ररूपो नमोऽस्तु ते देववर प्रसीद । विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम् ॥31॥
परि एक वेळ वेदवेद्या । त्रिभुवनाचिया आद्या । विनवणी विश्ववंद्या । आइकें माझी ॥444॥ ऐसें बोलोनि वीरें । चरण नमस्कारिले शिरें । मग म्हणे तरि सर्वेश्वरें । अवधारिजो ॥445॥
हेही वाचा – Dnyaneshwari : ब्रह्मादिक समस्त, उंचा मुखामाजीं धांवत
अर्थ
अहो, बिचारे हे जगत तुझ्या तोंडातून निघणार्या ज्वाळांच्या भडक्यात सापडले आहे. ज्याप्रमाणे वणव्याच्या वेढ्यात जनावरे सापडावीत ॥435॥ आता त्याप्रमाणे जगाला झाले आहे. हा (तारणारा) देव नाही तर हे सर्वांचे अनिष्ट कर्मच विश्वरूपाने ओढवले आहे, अथवा जगद्रूपी जलचरांना (विश्वरूप) हे काळरूपी जाळेच पसरले आहे. ॥436॥ आता या विश्वरूपाच्या शरीराचे तेज हेच कोणी एक (पारध्याचे) जाळे आहे. त्यातून स्थावरजंगमाला कोणत्या बाजूने निसटून जाता येईल? ही तोंडे नाहीत तर ती पेटलेली लाखेची घरेच जगाला प्राप्त झाली आहेत! ॥437॥ आपल्या आगीने आपण (दुसर्याला) कसे पोळतो, हे अग्नीस जरी कळत नाही, तथापि ज्याला अग्नीची आग लागते, त्याचे प्राण वाचत नाहीत. ॥438॥ (किंवा) आपल्या तीक्ष्णपणाने (दुसर्याचा) कसा घात होतो, हे हत्यार काय जाणते? किंवा (ज्याप्रमाणे) विषास आपण किती प्राणघातक आहोत याची खबरही नसते ॥439॥ त्याप्रमाणे तुला आपल्या स्वत:च्या उग्रपणाची बिलकूल आठवणच नाही. पण (इकडे) अलीकडच्याच तोंडात सर्व जगाचा नाश होऊन राहिला आहे. ॥440॥ देवा, तू सर्व जगाला व्यापून असणारा जर एकच आत्मा आहेस, तर मग आम्हाला प्राण घेणार्या यमाप्रमाणे का पुढे आला आहेस? ॥441॥ मी तर आपल्या जगण्याची आशाच सोडली आहे आणि तूही काही भीडभाड धरू नकोस. तुझ्या मनात जे काय असेल, ते खुशाल स्पष्ट सांगू पाहू. ॥442॥ या उग्र रूपाला तू किती वाढवीत आहेस? देवा, आपल्या स्वत:च्या अंगी असलेले भगवंतपण (पालन करण्याचा स्वभाव) आठव, नाही तर (तसे करण्याचे आपल्या मनात नसेल तर) माझ्यापुरती तरी कृपा कर. ॥443॥
(हे) उग्र रूप धारण केलेला तू कोण आहेस मला सांग. हे देवश्रेष्ठा, मी तुला नमस्कार करतो. माझ्यावर अनुग्रह कर. हे आदिदेवा, तुला जाणण्याची मी इच्छा करीत आहे, कारण तुझी ही प्रवृत्ती (अभिप्राय) मला समजत नाही. ॥31॥
परंतु वेदाकडून जाणल्या जाणार्या, त्रैलोक्याच्या मूळकारणा आणि सर्व जगाला नमस्कार करण्याला योग्य अशा (हे श्रीकृष्णा), एक वेळ माझी विनंती ऐक. ॥444॥ त्या शूर अर्जुनाने याप्रमाणे बोलून प्रभूच्या चरणांवर मस्तक ठेवले आणि मग म्हणाला, हे जगत्प्रभो श्रीकृष्णा आपण ऐकावे. ॥445॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जैसा रोगिया ज्वराहूनि उठिला, का भणंगा दुष्काळु पाहला


