सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
यथा नदीनां बहवोऽम्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति । तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति ॥28॥
जैसे महानदीचे वोघ । वहिले ठाकिती समुद्राचें आंग । तैसें आघवांचिकडूनि जग । प्रवेशत मुखीं ॥423॥ आयुष्यपंथें प्राणिगणीं । करोनि अहोरात्रांची सोवाणी । वेगें वक्त्रामिळणीं । साधिजत आहाती ॥424॥
यथा प्रदीप्तं ज्वलनं पतङ्गा विशन्ति नाशाय समृद्धवेगाः । तथैव नाशाय विशन्ति लोकास्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः ॥29॥
जळतया गिरीचिया गवखा- । माजीं घापती पतंगाचिया झाका । तैसे समग्र लोक देखा । इये वदनीं पडत ॥425॥ परि जेतुलें येथ प्रवेशलें । तेतुलया लोहें पाणीचि पां गिळिलें । वहिवटींहि पुसिलें । नामरूप तयांचें ॥426॥
लेलिह्यसे ग्रसमानः समन्ताल्लोकान् समग्रान् वदनैर्ज्वद्भिः । तेजोभिरापूर्य जगत् समग्रं भासस्तवोग्राः प्रतपंति विष्णो ॥30॥
आणि येतुलाही आरोगण । करितां भुके नाहीं उणेपण । कैसें दीपन असाधारण । उदयलें यया ॥427॥ जैसा रोगिया ज्वराहूनि उठिला । का भणंगा दुष्काळु पाहला । तैसा जिभांचा लळलळाटु देखिला । आवाळुवें चाटितां ॥428॥ तैसें आहाराचेन नांवें कांहीं । तोंडापासूनि उरलेंचि नाहीं । कैसी समसमित नवाई । भुकेलेपणाची ॥429॥ काय सागराचा घोंटु भरावा? । कीं पर्वताचा घांसु करावा । ब्रह्मकटाहो घालावा । आसकाचि दाढे ॥430॥ दिशा सगळियाचि गिळाविया । चांदिणिया चाटूनि घ्याविया । ऐसें वर्तत आहे साविया । लोल्या बा तुज ॥431॥ जैसा भोगीं कामु वाढे । कां इंधनें आगीसि हाकाक चढे । तैसी खातखातांचि तोंडें । खाखांतें ठेलीं ॥432॥ कैसें एकचि केवढें पसरलें । त्रिभुवन जिव्हाग्रीं आहे टेकलें । जैसें कां कवीठ घातलें । वडवानळीं ॥433॥ ऐसीं अपारें वदनें । आतां येतुलीं कैंचीं त्रिभुवनें । कां आहारु न मिळतां येणें मानें । वाढविलीं असह्या ॥434॥
हेही वाचा – Dnyaneshwari : ऐसा अर्जुन दुःखें शिणतु, शोचित असे जिवाआंतु
अर्थ
ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक जलप्रवाह समुद्राकडेच तोंड करून धाव घेतात, त्याप्रमाणे सर्व बाजूंनी जळत असलेल्या तुझ्या मुखामध्ये हे नरवीर प्रवेश करित आहेत. ॥28॥
ज्याप्रमाणे मोठ्या नद्यांचे प्रवाह मोठ्या वेगाने समुद्रास येऊन मिळतात, त्याप्रमाणे सर्व बाजूंनी हे जग त्याच्या मुखात शिरत आहे. ॥423॥ आयुष्याच्या मार्गाने रात्रंदिवसाच्या पायर्या करून सर्व प्रकारच्या प्राण्यांचे समुदाय त्वरेने मुखात प्रवेश करण्याचे साधीत आहेत. ॥424॥
अत्यंत वेगाने युक्त असे पतंग ज्याप्रमाणे प्रदीप्त अग्नीमध्ये (स्वत:च्या) नाशाकरिताच प्रवेश करतात, त्याप्रमाणेच (हे) प्राणी अत्यंत वेगाने युक्त होऊन (स्वत:च्या) नाशाकरिताच तुझ्या मुखांमध्ये प्रवेश करीत आहेत. ॥29॥
पेट घेतलेले डोंगरांच्या दरीमध्ये ज्याप्रमाणे पतंगांचे समुदाय उड्या घालतात, त्याप्रमाणे पाहा, हे सर्व लोक या तोंडामध्ये येऊन पडत आहेत. ॥425॥ परंतु तापलेले लोखंड जसे पाण्याला शोषून टाकते, त्याप्रमाणे जेवढे म्हणून प्राणी या मुखात जात आहेत, तेवढ्यांचे वहिवाटीला सुद्धा नामरूप राहात नाही. ॥426॥
हे विष्णो, जळत असणार्या मुखांनी सर्व लोकांना सर्व बाजूंनी गिळत असणारा तू, (अतृप्तीमुळे) जिभा चाटीत आहेस. तुझी प्रखर तेजे (आपल्या) तेजाने सर्व जगाला व्यापून त्याला ताप देत आहेत. ॥30॥
आणि इतकेही खात असता भूक काहीच कमी होत नाही. याच्या जठराग्नीला कितीतरी विशेष प्रखरता आली आहे. ॥427॥ जसा एखादा रोगी तापातून बरा व्हावा (म्हणजे त्याला खा खा सुटते) अथवा जसे एखाद्या भिकारी मनुष्याला दुष्काळ संपून सुकाळ झाला म्हणजे खा खा सुटते, त्याप्रमाणे ओष्ठप्रांत चाटताना जिभेच्या हलण्याची गडबड दिसते. ॥428॥ तसेच खाण्याचा जेवढा म्हणून पदार्थ आहे, त्यापैकी तुझ्या तोंडापासून कशाचाच बचाव झाला नाही. खरमरीत भूक लागलेल्या स्थितीची ही कशी अपूर्वता आहे? ॥429॥ सर्व समुद्रच पिऊन टाकावा की काय किंवा पर्वतच गट्ट करावा की काय, अथवा हे संपूर्ण विश्वच दाढेखाली घातले की काय, ॥430॥ सगळ्या दिशाच गिळून टाकाव्या अथवा चांदण्या चाटून पुसून घ्याव्यात, अशी ही देवा तुला साहाजिकच हाव दिसत आहे. ॥431॥ ज्याप्रमाणे विषयभोगाने भोगण्याची इच्छा वाढते, अथवा सरपणाने अग्नीची खा खा अधिक होते, त्याप्रमाणे तुझी तोंडे सारखी खात असताही पुन्हा पुन्हा खा खा करीतच राहिली आहेत. ॥432॥ एकच तोंड (पण) कसे आणि केवढे पसरले आहे! ज्याप्रमाणे वडवानळामध्ये कवठ घालावे त्याप्रमाणे हे तिन्ही लोक तुझ्या जिभेच्या टोकालाच लागलेले दिसतात. ॥433॥ (एक तोंडाची अशी वाट झाली) अशी (आपल्या विश्वरूपात) असंख्य तोंडे आहेत! आता (इतक्या मुखांना) इतकी त्रिभुवनें कोठली? तेव्हा (ज्याच्या तेजाचा ताप) सहन करणे अशक्य आहे अशा तू, त्यांना खायला मिळत नसता ती इतकी कशाला वाढवलीस? ॥434॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : ब्रह्मादिक समस्त, उंचा मुखामाजीं धांवत


