स्वामी अवधूतानंद उर्फ जगन्नाथ कुंटे यांनी नर्मदा परिक्रमेच्या अनुभवांवर ‘नर्मदेSS हर हर’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यांनी चार वेळा नर्मदा परिक्रमा केली. तिसरी परिक्रमा झाल्यावर त्यांनी हे पुस्तक लिहिले. नर्मदा परिक्रमा करण्याचे काही नियम असतात. तीन वर्षं तीन महिने तेरा दिवसांत एक परिक्रमा करायची असते आणि नर्मदा एकदाही ओलांडायची नसते. चुकून ओलांडली तर, परिक्रमा भंग होते. परिक्रमा आणि भ्रमंती यात फरक आहे.
नर्मदा परिक्रमेला हजार वर्षांची परंपरा आहे. परिक्रमा करणारे सर्वच नियम पाळतात, असे नाही. अमरकंटक ते अमरकंटक अशी एक परिक्रमा होते. नर्मदा गुजरातेत अरबी समुद्राला मिळते. तिथपर्यंत अर्धी परिक्रमा होते. तिथून पुन्हा अमरकंटक… आता नर्मदेवर धरणे बांधल्यामुळे पात्र रुंदावत आहे आणि परिक्रमा आणखी लांब होत आहे. साधारण 2600 किमीची परिक्रमा असते. नर्मदा भारताच्या मध्यातून वाहणारी पश्चिम वाहिनी नदी आहे. तिच्या दोन्ही किनाऱ्यांवर जंगले आहेत आणि विंध्य सातपुडा पर्वत आहेत. उंचावरून कोसळून ती नयनरम्य धबधबे तयार करते. नर्मदा परिक्रमा करताना निसर्गाचे सौंदर्य अनुभवता येते. नर्मदा अवखळ अल्लड कन्या आहे… ती अविवाहित आहे… नर्मदा पुराणात तिच्यासंबंधी कथा आहेत. नर्मदेची रूपे वर्णन करायला कालिदासाची प्रतिभा हवी, असं स्वामीजींनी लिहिलं आहे.
हे पुस्तक प्रवासवर्णन वाटले तरी, तसे नाही. त्यापेक्षा बरेच काही आहे. पुस्तक वाचायला सुरुवात करण्यापूर्वी लक्षात घ्यायला हवे की, ही श्रद्धा आहे, आस्था आहे… ‘जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण…’. प्रत्येक वेळी वैज्ञानिक कसोटी किंवा तर्क लावू नये अन्यथा पुस्तक वाचू नये. हे पुस्तक मानसशास्त्रज्ञ किंवा मनोचिकित्सकाने वाचले, तर मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून निष्कर्ष काढता येतील; पण तरीही या सर्वापुढे आहे ती नर्मदा मैय्यावरची भक्ती. मी मध्य प्रदेशात रहात असल्यामुळे नर्मदेचे इथल्या जनमानसात असलेले स्थान शब्दांत वर्णन करता येणार नाही… कारण आमच्याकडे रोज सकाळी पाणी येत नाही, नर्मदा येते! आमची जीवनरेखा नर्मदेशी जोडली आहे.
भंगू दे काठिन्य माझे आम्ल जाऊ दे मनीचे
येऊ दे वाणीत माझ्या सूर तुझ्या आवडीचे…
ही कविता पुस्तक वाचताना मनाशी येत राहिली आणि हेच या परीक्रमेचे फलित आहे, असे वाटले.
नर्मदा परिक्रमा करायची आज्ञा गुरूंकडून मिळाल्यावर स्वामीजी एकटेच परिक्रमेला निघाले. वाटेत एका गावात भिल्लमामांनी त्यांचे सामान चोरले. परिक्रमा करताना अगदी कमी सामान घ्यायचे असते. शूलपाणी जंगलातल्या या मामांनी लुटल्यावर फाटके कापड, त्यात देवाचे सामान, परिक्रमेचे प्रमाणपत्र, नित्यपाठ, काडेपेटी, उदबत्त्या आणि अंगावर फक्त लंगोटी उरली. त्यांना सिगारेटचे व्यसन असल्याने सिगारेटचे पाकीट होते. सुरवातीला असे लुटले गेल्यावर आसक्ती गळून पडते, असे त्यांनी लिहिले आहे. परिक्रमेत सहसा चोऱ्या होत नाहीत. झाल्या तरी काही न काही रूपाने आवश्यक सामान मिळत जाते.
परिक्रमेत नर्मदा मैय्या मानवी रुपात दर्शन देते आणि सांभाळून घेते असा सर्वांचा अनुभव आहे. स्वामीजींना वारंवार प्रत्यय आला. नर्मदेने लहान मुलीच्या रुपात दर्शन दिले आणि पाण्यात बुडण्यापासून वाचवले. कपड्याच्या चिंध्या झाल्यावर कोणी लुंगी दिली, भूक लागलेली असताना तर, न मागता अनेकांनी अन्न दिले. कधी मैय्याजवळ मिष्टान्नाचा हट्ट केला तेव्हा तेही मिळाले. पाय मुरगळला तेव्हा एका आदिवासीने सहज ठीक करून दिला. पावसाचा चमत्कार तर वाचायला हवा.
हेही वाचा – थँक यू मि. ग्लाड… क्रूरकर्म्याची हतबलता
नर्मदामाई परिक्रमा करणाऱ्यांना अन्नपाणी कमी पडू देत नाही. वाटेत अनेक महंत आणि त्यांचे आश्रम, धर्मशाळा, मंदिरे येतात. काही भोंदू साधू आणि लोभी महंतही त्यांना भेटले. स्वताच्या पादुकांची स्थापना करणाराही भेटला. तसेच, सतत नामस्मरणात मग्न असलेल्या ताई भेटल्या… नर्मदा परिक्रमा करून एका गावात राहणाऱ्या तेजपुंज माई भेटल्या. एकदा आव झाल्यामुळे मरणासन्न अवस्था झाल्यावर नर्मदेनेच वाचवले. तोही प्रसंग चकित करतो. काट्याकुट्यातून दगडांतून चालताना शरीरावर जखमा झालेल्या होत्या. काठाकाठाने चालताना एकदम तोल जाऊन स्वामीजी पडले. पण यातूनही ते वाचले. औषधं घ्यायचे टाळायचे, जे भोग आहेत ते भोगून संपवायचे, यावर त्यांचा विश्वास होता.
कुंतल चटर्जी हा तरतरीत तरुण मुलगा काही काळ त्यांच्या बरोबर परिक्रमा करत होता. कुंतलने हॉटेल मनेजमेंट केल्यावर पंचतारांकित जगाचं जवळून दर्शन झालं. त्याला वैताग आला आणि त्याने परिक्रमा सुरू केली. बंगाली असल्यामुळे लोक त्याच्याकडून बंगाली जादूची अपेक्षा करत. तो असा अचानक एक दिवस घरदार सोडून आईवडीलांना सोडून निघाला, पैसेही घेतले नाहीत, तेव्हा त्याच्या आईवडिलांची काय स्थिती झाली असेल? असा विचार मनात आला. पण संसार सोडून बाहेर पडणाऱ्यांना असे कठोर निर्णय घ्यावे लागतात.
स्वामीजी विवाह करून दोन मुले झाल्यावर परिक्रमेला बाहेर पडले. ते म्हणतात की, मी एक मुक्त पक्षी आहे. प्रपंचाची काळजी करत नाही. घरात कोणी कमावत नाही, तरी प्रपंच पार पडतो आहे… त्यांनी संन्यास घेतलेला नसला तरी, ते संन्यासी वृत्तीने राहिले.
अपशब्द बोलणारे, अंगावर धावून जाणारे, वस्तू फेकून मागणारे, हाकलून देणारे साधू, महंत भेटले तरी त्यांचा राग केला नाही किंवा उलट प्रतिक्रियाही दिली नाही. त्यांनी जे वाईट वर्तन केले, ते देहाशी केले, माझ्याशी नाही ही भावना बाळगली. बंगालमधून खूप साधू इथे येऊन राहिलेले त्यांनी पाहिले. एका बंगाली साधूने सांगितले की, बंगालमध्ये कम्युनिस्ट राजवट असल्यामुळे हिंदूंना धर्माचे पालन करणे कठीण झाले आहे. साधूंना राहायला जागा मिळत नाही.
हेही वाचा – एव्हरग्रीन… ‘सारे प्रवासी घडीचे’!
परिक्रमा सुरू करताना आणि पूर्ण झाल्यावर ‘कढाई’ करण्याची पद्धत आहे म्हणजे भरपूर शिरा करून सर्वांना वाटायचा आणि पंचकन्यांचे पूजन करायचं, अशी प्रथा आहे. घरी आल्यावर केलेल्या कढाईच्या वेळी एक वृद्ध व्यक्ती जेवायला आली आणि त्यांनी पांढरे वस्त्र मागितले. हीच नर्मदा मैय्या. तिने स्वामीजींना या रूपात दर्शन दिले. स्वामीजींना कढाईसाठी दोन्ही वेळा आर्थिक चणचण भासली नाही. कोणी न कोणी सोय करून दिली.
परिक्रमा करून परत आल्यावर काही दिवसांनी त्यांना पुन्हा गुरूंची आज्ञा झाली. यावेळी अमरकंटकपासून परिक्रमा करावी, असे सांगितले. त्यांनी पुन्हा परिक्रमा सुरू केली. या परिक्रमेत त्यांनी एका अघोरी साधूला मगरीने गिळताना पाहिले. प्रसंग वाचताना काटा आला. नर्मदा परिक्रमेत अश्वत्थामा भेटतो, तसा यांनाही भेटला तो प्रसंग वाचण्यासारखा आहे. पण दारू प्यायल्यानंतर आदिवासी लोकांनी त्यांची सांगितलेली व्यथा मात्र मनात घर करून गेली. स्वामीजींनाही प्रश्न पडला, यांचे दुख निवारण केले नाही तर, मला मोक्ष मिळून काय उपयोग?
परिक्रमेत कधी भिक्षा मागावी लागते तर कधी अपशब्द ऐकावे लागतात. सगळीच अनिश्चतता असते. भविष्याची काळजी न करता क्षणस्थ व्हायचे असते, आत्ताचा क्षण जगायचा असतो. आपले रोजचे जीवन बंदिस्त चौकटीत बरेचसे सुरक्षित, निश्चित असते… दोन वेळच्या जेवणाची भ्रांत नसते. परिक्रमेत असे नसते!
भिरभिरणारे पाय घेउनी भटकंतीचे विहंग व्हावे
चराचराचे रूप पाहता माझे मी पण गळून जावे…
जिथे एक परिक्रमा करणे कठीण असते, तिथे स्वामीजींनी चार प्रदक्षिणा पूर्ण केल्या. पुस्तकाच्या शेवटी ते म्हणतात, देव आहे की नाही, यावर वाद घालू नये. अनुभव देणारा मोठा आहे, तुमचा तुम्ही अनुभव घ्या.
पुस्तक वाचून पूर्ण झाल्यावर वाटले की, परिक्रमा करायची असेल तर, पायीच करायला हवी… बसने किंवा कारने नव्हे. सामान्य माणसांत असलेल्या देवत्वाचे दर्शन नर्मदामाई घडवते. निसर्गरम्य परिसर, शांतता, आस्था आणि माणुसकीचे विलोभनीय दर्शन घडवणाऱ्या नर्मदा परिक्रमेचा अनुभव देणारे हे पुस्तक वाचायला हवे.


