Saturday, August 2, 2025

banner 468x60

Homeअवांतरबँक व्यवहार आणि अधिकाऱ्यांच्या करामती

बँक व्यवहार आणि अधिकाऱ्यांच्या करामती

जी. भालचंद्र

आज-काल आपल्यापैकी प्रत्येकाचा बँकेतील व्यवहारांशी संबंध येतो. आपल्यापैकी अनेकजण नेट बँकिंग, Appवर आधारित बँकिंग सेवा, यूपीआय पेमेंट इत्यादी सुविधांचा वापर करीत आहेत. तरीपण काही ना काही कारणासाठी आपल्याला बँकेच्या जवळील शाखेत जाण्याचा प्रसंग येतो. अशावेळी मला आलेल्या अनुभवाचे मजेदार किस्से मी सांगणार आहे.


अनुभव एक

हा अनुभव मला एका खासगी बँकेतील मुदत ठेव व्यवहाराबद्दल आलेला आहे. या बँकेत मी आणि माझ्या बायकोच्या नावाने मुदत ठेव करताना, अखेरच्या दिवसानंतर मुदत ठेव पुढील काही दिवसांसाठी परत रिन्यू करावी असा पर्याय दिला होता. जसा मुदत ठेवीचा अखेरचा दिवस जवळ येत होता तसं माझ्या लक्षात आलं की, ज्या  कालावधीसाठी मुदत ठेव मी ठेवली आहे, त्या कालावधीकरिता व्याजाचा दर आता कमी झाला आहे व इतर मुदतींसाठी व्याजाचा दर जास्त आहे. म्हणून ती मुदत ठेव त्याच्या अखेरच्या तारखेनंतर मोडायची आणि परत नवीन कालावधीकरिता करायची, असे ठरविले.

बँकेच्या नियमाप्रमाणे मुदत ठेवीच्या अखेरच्या दिवसाच्या सात दिवस अगोदर आपण दिलेला पर्याय आपण बदलू शकतो. म्हणून बँकेत जाऊन बँकेच्या अधिकृत फॉर्मवर आमचा पर्याय देऊन आणि सही करून तो फॉर्म बँकेत एक दिवस अगोदर सबमिट केला. फॉर्ममध्ये स्पष्टपणे लिहिलं होतं की, बँक ठेवीची मुदत संपल्यानंतर ठेवीचे पैसे आमच्या खात्यात जमा करावे. परंतु बँकेने अतिहुशारीने त्याच दिवशी ती ठेव मोडून ठेवीचे पैसे आमच्या खात्यात जमा केले. ती ठेव मुदत तिच्या एक दिवस अगोदर मोडल्यामुळे बँकेने व्याजदरात कपात केली आणि जवळजवळ चारशे रुपये आम्हाला कमी दिले.

याबद्दल चौकशी करण्यासाठी बँकेत गेलो असताना आम्हाला सांगण्यात आले की, तुम्ही तुमच्या रिलेशनशिप मॅनेजरबरोबर याबाबतीत बोला आणि काय निर्णय होतो, ते आम्हाला सांगा. आता बँकेच्या शाखेत सगळा व्यवहार झाला असताना, या रिलेशनशिप मॅनेजरला मधेच का आणले, ते कळेना.

तरीपण रिलेशनशिप मॅनेजरला फोन केला. हे रिलेशनशिप मॅनेजर्स आपण फोन केला असताना कधीच जागेवर सापडत नाही आणि आपल्याला रेकॉर्ड मेसेज येतो – ‘युवर रिलेशनशिप मॅनेजर इज बिझी विथ अदर कस्टमर’ किंवा ‘ही इज बिझी इन मीटिंग. प्लीज कॉल आफ्टर सम टाइम…’ तुम्ही केव्हाही कॉल केला तरी, तुम्हाला कधीही रिलेशनशिप मॅनेजरबरोबर पहिल्या झटक्यात बोलता येईल, याची शाश्वतीच नसते आणि या रिलेशनशिप मॅनेजरबरोबर माझा अनुभव खूपच वाईट होता. कारण, माझ्या इन्कम टॅक्स एआयएसमध्ये  बँकेने काही रक्कम टीडीएस म्हणून कापलेली दिसत होती. पण माझ्या रेकॉर्डप्रमाणे अशी रक्कम कुठेच दिसत नव्हती. म्हणून मी रिलेशनशिप मॅनेजरची मदत घेण्याचे ठरवले. पण शेवटपर्यंत रिलेशनशिप मॅनेजरला याबद्दल खुलासा करता आला नव्हता.

शेवटी मी बँकेच्या कॉल सेंटरला फोन केला. माझ्या नशिबाने पहिल्याच झटक्यात फोन लागला आणि फोनवर आलेल्या व्यक्तीने माझे म्हणणे पूर्णपणे ऐकून घेतले. नंतर मला कॉन्फरन्स कॉलवर ठेवून, त्याने बँकेच्या शाखेला फोन केला. बँकेच्या शाखेतील एका महिला अधिकाऱ्याने माझे म्हणणे ऐकून घेतले. त्या बँक महिला अधिकाऱ्याने, कालावधी संपण्याअगोदर मुदत ठेव मोडण्याची बँकेतील स्टाफची चूक झाल्याचे कबूल केले. परंतु  कमी व्याज दिले असल्यामुळे त्याची भरपाई करता येणार नसल्याचे स्पष्ट केले.

शेवटी मी त्या बँक अधिकाऱ्याची बँकेच्या शाखेतच भेट घेण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे बँक अधिकाऱ्याला विनंती केली. बँक अधिकाऱ्यांनी मला बँकेच्या व्यवहाराची वेळ संपल्यानंतर संध्याकाळी बँकेत येण्यास सांगितले.

संध्याकाळी मी बँकेत गेल्यानंतर, बँक अधिकाऱ्याच्या कपाळावरती खूपच आठ्या पडल्या. त्यांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला. पण मी माझ्या म्हणण्यावर ठाम होतो की, मला  दिलेल्या कमी व्याजाची भरपाई करावी. शेवटी त्या अधिकाऱ्याने तिथल्या शाखा अधिकाऱ्याबरोबर काहीतरी चर्चा केली आणि मला सांगितले की, जे व्याज कमी दिलं आहे, तेवढी रक्कम आम्ही रोख स्वरुपात देऊ.

रक्कम रोख देणार म्हटल्यावर  मला जरा संशय आला. त्या अधिकाऱ्याने एक पेटी कॅश व्हाऊचर बनवलं, ज्यात बँकेतील फंक्शनसाठी हार-तुरे आणि नाश्ताकरिता पैशांची डिमांड करण्यात आली होती. त्या व्हाऊचरच्या आधारे अधिकाऱ्याने पैसे बँकेतील कॅशियरकडून काढून मला दिले.

यावरून, असे किती व्हाऊचर्स बनवून किती पैशांचा गैरव्यवहार बँकेत होत असेल, त्याची कल्पनाच करवत नाही.

(बँकेचा दुसरा अनुभव पुढील भागात)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!